डिसेंबरमध्ये ठामपाला लक्ष्मी पावली

पालिकेकडे २१० कोटी रुपये शिल्लक

कोरोनामुळे ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती खूपच खालावली होती. त्यातून आता कुठे महापालिका सावरताना दिसत आहे. चालू आर्थिक वर्षाचे दिलेल्या टार्गेटपैकी २ हजार ४०० कोटींचा भरणा महापालिका तिजोरीत ३१ डिसेंबर पर्यंत झाला आहे. तसेच उर्वरित ३५५ कोटींचा भरणा झाल्यास  १०० टक्के टार्गेट पूर्ण होणार आहे. याच दरम्यान ठाणे महापालिका तिजोरीत आलेल्या ‘लक्ष्मी’ मुळे सद्यस्थितीत २१० कोटी रुपये शिल्लक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये शहर विभागाने आघाडी घेतल्याने हे टार्गेट १०० टक्के पूर्ण होईल असे दिसत आहे.

विविध स्त्रोतांकडून येणाऱ्या उत्पन्नाच्या आधारावर यंदा २ हजार ७५५ कोंटीचे उत्पन्न महापालिकेला मिळेल अशी आशा होती. त्यानुसार डिसेंबर अखेर २ हजार ४०० कोटींची समाधानकारक वसुली झाली आहे. यंदाच्या आर्थिक वर्ष पूर्ण होण्यासाठी जेमतेम तीन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे, त्यात एकूण उद्दीष्टाच्या केवळ ३५५ कोटींची वसुली पालिकेला करावी लागणार आहे. त्यामध्ये मालमत्ता कर विभागाला ७४० कोटींचे लक्ष्य असून त्यानुसार ४६६ कोटींची वसुली डिसेंबर अखेरपर्यंत झाली आहे.

अग्निशमन विभागाला दिलेल्या ९८ कोटीपैकी ७३ कोटींची वसुली झाली आहे. पाणी पुरवठा विभागाला २०८ कोटींचे लक्ष असताना या विभागाने आतापर्यंत ५४ कोटींचीच वसुली केली आहे. मीटर पध्दतीमुळे वसुलीवर परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे मागील दोन वर्षे पिछाडीवर पडलेल्या शहर विकास विभागाने यंदा दिलेल्या लक्षाच्या दुप्पट वसुली केल्याने पालिकेचे उत्पन्न पुन्हा वाढल्याचे दिसून आले आहे. शहर विकास विभागाला ३४२ कोटींचे लक्ष देण्यात आले होते. त्यानुसार या विभागाने आतार्पयत ७७० कोटींचे लक्ष्य पार केले आहे. तर जानेवारी महिन्यात आजच्या घडीला पालिकेच्या तिजोरीत उत्पन्न आणि खर्चाची सांगड घातल्यानंतर आजही २१० कोटींची शिल्लक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

९५ कोटी पैकी २५ टक्के बिले अदा
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून मागील वर्षी म्हणजेच २०२०-२१ या आर्थिक वर्षात प्रभाग सुधारणा निधी अंतर्गत सुमारे ९५ कोटींची कामे करण्यात आली आहेत. त्यानुसार या कामांची २५ टक्के बिले डिसेंबर महिन्यात काढण्यात आली आहेत. उर्वरीत बिले मात्र केव्हा निघणार याचे उत्तर ठेकेदारांना मिळत नसल्याने त्यांची चिंता वाढली आहे.