ठाणे पूर्व येथील सॅटिस, नवीन उपनगरीय स्टेशनचे काम प्रभावीपणे करावे

बाधितांचे पुनर्वसन करण्याबाबत महापौरांच्या सूचना

ठाणे पूर्व येथील सॅटिस, नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाचे काम हे नियमितपणे सुरू आहे, परंतु हे काम अधिक प्रभावीपणे करण्याबरोबरच सॅटिसच्या कामामध्ये बाधित होणारी घरे, दुकाने यांचे तातडीने पुनर्वसन करण्याच्या सूचना महापौर नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीदरम्यान प्रशासनास दिल्या. तसेच रेल्वेस्थानकालगतच्या डेकच्या कामाचाही शुभांरभ लवकरच पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याचे महापौरांनी पुढे म्हटले.

ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या सॅटिस पूर्व व नवीन उपनगरीय स्टेशन कामाचा आढावा घेण्यासाठी महापौर म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त मारुती खोडके, अश्विनी वाघमळे, सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, विधी सल्लागार मकरंद काळे, कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड, धनाजी मोदे, मुख्य तांत्रिक अधिकारी प्रवीण पापळकर, स्थावर मालमत्ता विभागाचे कार्यालयीन अधीक्षक महेश आहेर, उद्यान विभागाचे धावडे एसएमसी- एनसीसी (सॅटिस जेव्ही) यांचे प्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग, सरकारी अधिकारी उपस्थित होते.

ठाणे महापालिकेच्यावतीने कोपरी विभागातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीकोनातून महत्वाकांक्षी असा प्रकल्प स्मार्टसिटी अंतर्गत सुरू आहे. या कामामध्ये काही निवासी घरे, दुकाने तसेच झाडांमुळे कामास विलंब होत आहे, यावर चर्चा करुन घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रकल्पात होणाऱ्या बाधित होणाऱ्या नागरिकांचे तातडीने महापालिकेने पुनवर्सन करावे, तसेच बाधित गाळेधारकांना उपलब्ध असलेल्या ठिकाणी गाळे हस्तांतरीत करावे व बाधित होणाऱ्या वृक्षांचे पुनर्रोपण करुन हे काम अधिक गतीने करावे अशाही सूचना महापौरांनी दिल्या. या प्रकल्पातंर्गत महत्वाचा टप्पा म्हणजे ठाणे पूर्व रेल्वेस्थानकाबाहेरील पार्किंगच्या जागेवर तयार करण्यात येणा-या डेकच्या बांधकामासाठी रेल्वे प्रशासनानेही परवानगी दिली असून या कामास तातडीने मंजुरी मिळावी यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे व डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी याकामी सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे महापौरांनी आभार व्यक्त केले आहेत.

भूमिगत पार्किंगसह चार्जिंग स्टेशन
ठाणे पूर्व येथे सॅटिस प्रकल्पातंर्गत उभारण्यात डेकवर अद्ययावत अशा सेवासुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या ठिकाणी भूमिगत पार्किंगची व्यवस्था असून तळमजल्यावर प्रवाशांसाठी वाहतूक व्यवस्था असणार आहे. मिड डेकवर रेल्वे प्रवाशांसाठी विश्रांती कक्ष व आदी सुविधा असणार असून ठाणे पश्चिचेमप्रमाणे पूर्वेला देखील सर्वांत वरच्या डेकवर बसेसची वाहतूक होणार आहे. ठाणे स्थानकातून वरच्या डेकवर जाण्यासाठी उद्ववाहनाची सोय देखील असणार आहे.या सॅटिस प्रकल्पातंर्गत कन्हैयानगर कोपरी येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयालगत असलेल्या जागेत बस आगार तयार करण्यात येणार असून या ठिकाणी इलेक्ट्रीक बसेस चार्जिंग स्टेशन असणार आहे.

प्रकल्प पूर्ण होईपर्यत सहकार्य करावे
सॅटिस प्रकल्पाची सुरूवात ही ठाणे पश्चिमेकडील पूर्व द्रुतगती मार्गावरील सेवा रस्तयालगत असलेल्या तुळजाभवानी मंदिर येथून होणार असून पुढे कोपरी रेल्वे पूल- सिद्धार्थ नगर- ठाणे पूर्व रेल्वेस्थानक फलाट क्र. १०- मंगला हायस्कूल- नाखवा हायस्कूल –कन्हैयानगर असा असून संपूर्ण प्रकल्प २.२४ कि.मी.चा उन्नत मार्ग आहे. तसेच नवीन उपनगरीय रेल्वेस्थानक हे मनोरुग्णालयाच्या जागेत होणार असून त्याचा फायदा ठाणे व मुलुंड या उपनगरीय रेल्वेस्थानकावरील प्रवाशांची गर्दी कमी होण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. हे दोन्ही प्रकल्प महत्वाकांक्षी ठरणार असून भविष्यात या प्रकल्पाचा फायदा ठाणेकरांना होणार आहे, तरी या कामामुळे सद्यस्थितीत आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे, परंतु नागरिकांनी आजवर जसे सहकार्य केले आहेत तसेच सहकार्य हा प्रकल्प पूर्ण होईपर्यत करावे असे आवाहनही महापौरांनी केले आहे.