प्लास्टिकबंदी कारवाईसाठी गेलेल्या पथकावर लाईट बंद करून कांदे फेकले

कल्याण बाजार समितीमधील प्रकार

प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असताना कल्याण बाजार समितीच्या भाजीपाला बाजारात कारवाई गेलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांसह पथकावर भाजीपाला विक्रेत्यांनी लाईट बंद करत कांद्याने हल्ला केले. तसेच कर्मचा-यांना पिटाळून लावल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने याबाबत निषेध व्यक्त करण्यात आला.

कल्याण डोंबिवली महापालीकेचे एक पथक सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिक पिशव्यांविषयी कारवाई करण्यासाठी बाजार समितीमध्ये गेले होते. त्यावेळी अचानक लाईट बंद करत शिवीगाळ पथकावर कांदे फेकून मारले. दुसरीकडे या घटनेचा कामगार संघटनेकडून निषेध व्यक्त करण्यात  आला. महापालिका प्रशासनाकडून प्लास्टिक बंदीवर कारवाईसाठी ठिकठिकाणच्या प्रभागात पथके नेमण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर सहाय्यक आयुक्त सुधीर मोकल आपल्या पथकासह  कल्याण बाजार समितीमध्ये प्लास्टिक पिशव्यांविषयी कारवाई करण्यास गेले. यावेळी भाजीपाला विक्रेत्यांनी  सहाय्यक आयुक्त मोकल आणि महापालिका पथकाशी हुज्जत घालून गोंधळ सुरु केला. पथक कारवाई करीत असतानाच एका विक्रेत्याच्या सांगण्यावरून काही क्षणातच भाजीपाला बाजारातील  लाईट बंद करून या पथकाला शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर कांदे फेकून पिटाळून लावले.

पोलिसांत तक्रार करणार
याबाबत  सहाय्यक आयुक्त सुधीर मोकल यांच्याशी संपर्क साधला असता बाजारपेठ पोलीस ठाण्यात घडलेल्या घटनेची तक्रार दाखल करणार असल्याचे  सांगितले.