Ganesh Acharya untold story: कोरियोग्राफर गणेश आचार्य झाला हिरो, जाणून घेऊया त्याचा नृत्यप्रवास

प्रसि्द्ध कोरियोग्राफर गणेश आचार्य लवकरच हिरोच्या भूमिकेत झळकणार आहे. आतापर्यंत अनेक बड्या बॉलीवूड स्टार्सला नृत्याचे धडे देणारे गणेश आचार्य ‘देहाती डिस्को’ या चित्रपटातून पहील्यांदाच हिरोची भूमिका साकारणार आहेत. २७ मे ला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

गणेश आचार्य यांनी आतापर्यंत माधुरी दिक्षितपासून शाहरुख खान, काजोल ते आताच्या अनुष्का, करिनाला नृत्याचे धडे दिले आहेत. आज बॉलीवूडमधील प्रसिद्ध कोरियाग्राफर म्हणून गणेश आचार्य यांची वेगळी ओळख आहे. त्यांनी कोरियाग्राफ केलेली अनेक गाणी सुपरडुपर झाली आहेत. मात्र आज जरी गणेश आचार्य य़शस्वी कोरियाग्राफर असले तरी त्यांचा हा प्रवास संघर्षमय आहे. ज्याबद्दल त्यांच्या चाहत्यांना फारसे काही माहित नाही.

गरीबीत गेले लहानपण
गणेश आचार्य याचे वडील दाक्षिणात्य तर आई मुंबईकर आहे. सांताक्रुझमधील प्रभात कॉलोनीत गणेशचे लहानपण गेले. गणेश १० वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. यामुळे घराची संपूर्ण जबाबदारी गणेशवर आली. यामुळे गणेशला शिक्षण अर्धवट सोडावे लागले.

अचानक लहान वयात घराची जबाबदारी अंगावर पडल्याने गणेशने सुरुवातीला मिळेल ते काम करण्यास सुरुवात केली. पण त्यातून घरातील खर्च भागत नव्हता. तसेच तो काळ हा जितेंद्र, अमिताभ बच्चन आणि मिथुन चक्रवर्ती या हिंरोंचा होता. यामुळे गणेशला चित्रपटात काम करण्याची इच्छा होती. तसेच चित्रपटात काम करण्याचे पैसेही जास्त मिळतात. यामुळे गणेशने चित्रपटात काम करण्याचे ठरवले. नशीबाने साथ दिली आणि १२ वर्षाच्या गणेशला ज्युनियर आर्टीस्ट म्हणून चित्रपटात पहीली संधी मिळाली.

नंतर त्याने ग्रुप डान्सर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. गणेशचे नाचण्याचे कौशल्य बघून १७ व्या वर्षी त्याला असिस्टंट डान्स डायरेक्टर म्हणून काम मिळाले. तर १९ व्या वर्षी गणेश डान्स डायरेक्टर बनला. विशेष म्हणजे गणेशचे वडील मुंबईत डान्स डायरेक्टर बनण्यासाठीच आले होते. पण त्यांचे स्वप्न गणेशने पूर्ण केले.

गणेशला पहीला मोठा ब्रेक मिळाला तो अनाम या चित्रपटात. अभिनेता अरमान कोहली आणि अभिनेत्री आयशा जुल्का या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होत्या.

त्यानंतर के सी बोकाडिया यांच्या आओ प्यार करे या चित्रपटातील हाथो में आ गया जो कल रुमाल आप का हे गाण गणेशला मिळालं. सैफ अली खान आणि शिल्पा शेट्टी यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्याची कोरियाग्राफी गणेशने केली. गाणे सुपर डुपर हीट झालं आणि गणेशही.

 

नंतर गोविंदाने गणेशची ओळख दिग्दर्शक डेविड धवन यांच्याबरोबर करुन दिली. या भेटीने गणेशचे नशीब बदलले. कुली नंबर वन, या चित्रपटातील गोरिया चुरा ना मेरा जिया हे गाणं आणि त्यावरील नृत्य प्रेक्षकांनी अक्षरश डोक्यावर घेतलं. त्यानंतर गणेश आणि गोविंदा ही जोडी हिट झाली.

 

त्यानंतर घातक चित्रपटातील ममता कुलकर्णीवर चित्रित करण्यात आलेले कोई जाए तो ले आए हे गाणे गणेशला मिळाले. त्यात नृत्य करण्याची संधीही त्याला मिळाली .

त्यानंतर गणेशने कधीही मागे पाहीले नाही. २००७ साली त्याला ओंकारा मधील बिपाशाचे बिडी जलइले जिगर से पिया या गाण्यानेही धूम उडवली होती. बिपाशाच्या हॉट बोल्ड अदांनी प्रेक्षक घायाळ झाले.. त्यानंतर अनेक चित्रपट गणेशने केले. भाग मिल्खा भागमध्येही मस्तो का झुंड या गाण्यासाठी गणेशला राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला.