लोकशाहीवर भन्नाट भाषण करणारा तो मुलगा आहे तरी कोण?

मोबाईलची स्क्रीन चाळता चाळता एका लहान चिमुरड्याचा लोकशाहीवरील भाषणाचा व्हिडीओ तुमच्या नजरेस पडला असलेच. लोकशाहीवर विनोदी भाषण करणारा हा चिमुकला नक्की आहे तरी कोण याची लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. जाणून घेऊया या चिमुकल्या पुढारीबाबत....

Lokshahi-Speech-Boy-Viral-Video
तुम्ही जर सोशल मीडियावर सक्रिय असाल तर मोबाईलची स्क्रीन चाळता चाळता एका लहान चिमुरड्याचा लोकशाहीवरील भाषणाचा व्हिडीओ तुमच्या नजरेस पडला असलेच.

तुम्ही जर सोशल मीडियावर सक्रिय असाल तर मोबाईलची स्क्रीन चाळता चाळता एका लहान चिमुरड्याचा लोकशाहीवरील भाषणाचा व्हिडीओ तुमच्या नजरेस पडला असेलच. या चिमुकल्याचं सोज्वळ भाषण ऐकून अक्षरशः लोक पोट धरून हसू लागले आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंडिंगमध्ये आहे. लोकशाहीवर विनोदी भाषण करणारा हा चिमुकला नक्की आहे तरी कोण याची लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. जाणून घेऊया या चिमुकल्या पुढारीबाबत….

एकीकडे देश प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना दुसरीकडे सोशल मीडियावर मात्र एका लहान मुलाने दिलेल्या ‘लोकशाही’ या विषयावर भन्नाट भाषणाने पोट धरून हसायला भाग पाडलंय. या छोट्या पुढारीच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर लोक मोठ्या प्रमाणात पाहत असून, व्हायरल देखील होतोय. सोशल मीडियावर लाखोंमध्ये हिट मिळवणारा हा चिमुकला आहे तरी कोण?, त्याचा शोध माय महानगरनं घेतलाय. हा शोध आम्हाला जालन्याच्या अंबडपर्यंत घेऊन गेला. लोकशाहीवर भाषण करणारा तो मुलगा कार्तिक जालिंदर वजीर असल्याचं समोर आलं. कार्तिक जालना जिल्ह्यात्या अंबड तालुक्यातील रेवलगावात राहतो. रेवलगाव हे केवळ साडेसहाशे लोक वस्ती असलेलं गाव आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी त्याच्या रेवलगावातील त्याच्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी भाषण स्पर्धा ठेवण्यात आली होती. या स्पर्धेत प्रमुख पाहूणे म्हणून अनेक प्रतिष्ठीत मंडळी आणि नेते उपस्थित होते. “खरं तर आज लोकशाही दिन आहे. या दिवसापासून देशात लोकशाही सुरु झाली. मला लोकशाही खूप आवडते. या लोकशाहीमध्ये तुम्ही काही पण करु शकता. भांडू शकता, दोस्ती करु शकता, प्रेमाने राहू शकता. पण मला तर मोक्कार धिंगाणा करायला, खोड्या करायला, रानात फिरायला, माकडासारखे झाडावर चढायला खूप आवडते. असं केल्यामुळे माझे बाबा मला मारत नाहीत. कारण ते लोकशाही मानतात.” असं म्हणत त्याने आपल्या खोडकर अंदाजात भाषणाला सुरूवात केली. हे ऐकून तिथले सर्व नागरिक खदखदून हसू लागले. “माझ्या गावातले बारकाले पोरं माझं नाव सरांना सांगतात. लोकशाहीची मूल्ये आतंकवादी जसे पायदळी तुडवतात तसे सर मला कधी कधी पायदळी तुडवतात. कधी कधी कोंबडा बनवतात आणि म्हणतात तुझं वागणं लोकशाहीला धरुन नाही. तुझ्या तक्रारी फार येतात. पण खरं सांगतो माझ्यासारखा गरीब पोरगा तालुक्यात शोधून सापडणार नाही. एवढं बोलून मी माझे अनमोल विचार थांबवतो. जय लोकशाही,” असं देखील तो आपल्या भाषणात म्हणतो.

पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

चिमुकल्याचं हे खोडकर अंदाजातलं भाषण लोकांना इतकं आवडू लागलंय की हा व्हिडीओ एकदा पाहून लोकांचं मन भरत नाहीय. कार्तिक हा इयत्त पहिलीत शिकत असून तो अत्यंत गरीब कुटूंबातून आहे. त्याचे वडील शेती करून आपल्या कुटूंबाचं पोट भरवतात. तो दिसायला खूपच गोरा असल्यामुळे शाळेत सर्वजण त्याला ‘भोऱ्या’ नावाने हाक मारत असतात. कार्तिक हा मुळतः खोडकर स्वभावाचा आहे. परंतू शाळेतल्या सर्व गुरूजींचा तो लाडका सुद्धा आहे. या लाडक्या विद्यार्थ्यांसाठी भारत मस्के या गुरूजींनी एक स्क्रिप्ट बनवली. ही स्क्रीप्ट भाषणात रूपांतर झालं आणि याचं पाठांतर करून आपल्या खोडकर अंदाजात भाषण करण्याची जबाबदारी या गुरूजींना कार्तिकवर सोपवली. गुरूजींना आपल्यावर दाखवलेला विश्वास कार्तिकने सार्थ करून दाखवला.

कार्तिकला रातअंधळेपणाचा आजार आहे. त्याला दूरचं दिसत नाही. त्यामुळे वर्गात सुद्धा शिक्षक त्याला थेट फळया समोर बसवतात. कार्तिक अभ्यास खूपच हुशार आहे. त्याला खेळाचीही आवड आहे. त्याच्या तल्लक बुद्धीला पुस्तकाची आणि आत्मविश्वासाची जोड मिळाल्याने त्याने ही किमया साध्य केली, असे कार्किकचे वडील जालंदर वजीर म्हणतात.

आपल्या गरीब परिस्थितीची आणि रातांधळेपणाची सहानुभूती न मिळवला हा चिमुकला आपल्या खोडकर अंदाजात भाषण करून संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हिरो बनलाय. कर्तिकच्या निष्पाप आणि हसऱ्या चेहऱ्या मागचं दुःख जाणून घेतल्यानंतर लोक आणखीनच त्याचं भऱभरून कौतुक करू लागले आहेत.