घरUncategorizedकधीही कोसळेल वांद्र्यातला 'हा' भुयारी मार्ग; हजारो विद्यार्थी धोक्यात!

कधीही कोसळेल वांद्र्यातला ‘हा’ भुयारी मार्ग; हजारो विद्यार्थी धोक्यात!

Subscribe

वांद्र्याच्या कार्डिनल स्कूल ते खार पाईपलाईन, निर्मल नगरपर्यंतच्या भुयारी मार्गाची झालेली अवस्था पाहाता अंधेरी पूल दुर्घटनेचं गांभीर्य अद्याप कुणाला आल्याचं फारसं दिसत नाही. गव्हर्नमेंट कॉलोनीजवळच्या या भुयारी मार्गाची अवस्था इतकी वाईट झाली आहे की पावसाचं पाणी मुरून या भुयारी मार्गावरचा स्लॅब कधीही कोसळू शकतो. गंभीर बाब म्हणजे या मार्गाचा वापर परिसरातले सुमारे अडीच हजाराहून जास्त शाळकरी मुलं करतात.

अंधेरीच्या गोखले पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील फ्लायओव्हरचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचं काम मुबंई महापालिका, रेल्वे आणि PWD विभागाने सुरू केले आहे. पण या समस्येचं गांभीर्य अद्यापही लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाला आलेलं दिसत नाही. वांद्र्याच्या कार्डिनल स्कूल ते खार पाईपलाईन, निर्मल नगरपर्यंतच्या भुयारी मार्गाची झालेली अवस्था पाहाता अंधेरी पूल दुर्घटनेचं गांभीर्य अद्याप कुणाला आल्याचं फारसं दिसत नाही. गव्हर्नमेंट कॉलोनीजवळच्या या भुयारी मार्गाची अवस्था इतकी वाईट झाली आहे की पावसाचं पाणी मुरून या भुयारी मार्गावरचा स्लॅब कधीही कोसळू शकतो. गंभीर बाब म्हणजे या मार्गाचा वापर परिसरातले सुमारे अडीच हजाराहून जास्त शाळकरी मुलं करतात. शिवाय इथले स्थानिकही मोठ्या संख्येने या मार्गचा वापर करतात. त्यामुळे जर इथे कोणती दुर्घटना घडली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.

दरवर्षी मुरतंय पाणी!

पश्चिम द्रुतगती मार्गावर असणाऱ्या सांताक्रूझ वांद्रे इथल्या भुयारी पादचारी मार्गावर पावसाच्या पाण्यामुळे गळती सुरू झाली आहे. मात्र, इथल्या शाळकरी मुलांना आणि रहिवाशांना दुसरा कुठला पर्यायच नसल्यामुळे याच परिस्थितीमध्ये त्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दरवर्षी या भुयारी मार्गावर अशाच प्रकारे पाणी गळती होत असून ‘हे नेहमीचंच आहे’ अशा प्रकारची व्यथा इथल्या रहिवाशांनी मांडली आहे. मात्र, ही परिस्थिती जर नेहमीची आणि दर वर्षीची असेल, तर पाणी मुरल्यामुळे भुयारी मार्गाच्या भिंती आणि छत कमकुवत झालं असण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत हे छत कधीही पडू शकते.

- Advertisement -

भुयारी मार्गातली बत्तीही गुल!

एकीकडे पाणीगळती सुरू असतानाच दुसरीकडे या भुयारी मार्गामध्ये लाईटही नाही. त्यामुळे साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत या विद्यार्थ्यांना आणि रहिवाशांना हा टप्पा पार करावा लागतो. यामध्ये अंधारामुळे जर कुणी पडलं किंवा ठेचकाळलं, तर गंभीर इजा होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

मनसेने घेतला आंदोलनाचा पवित्रा!

कार्डिनल ग्रेशिअस हायस्कूल आणि न्यू इंग्लिश स्कूल ते खार स्टेशनला जाण्यासाठी हा एकमेव पर्यायी भुयारी पादचारी मार्ग आहे. इथल्या भिंतींना तडे गेले असून पाण्याची गळती मोठ्या प्रमाणावर होत आहे. या सर्व समस्यांचा पाढा गुरुवारी मनसेच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य अखिल चित्रे यांनी काही मनसेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत जाऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात वाचला.

विधानसभेत वांद्रे पूर्वमधील शिवसेनेचे २ आमदार, ५ नगरसेवक आणि खुद्द महापौर असताना, पीडब्ल्यूडीचं कार्यालयही याच परिसरात असतानाही दररोज हजारो विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन का प्रवास करावा लागत आहे?

अखिल चित्रे, सदस्य, मनसे राज्य कार्यकारिणी

- Advertisement -

PWD ला ४८ तासांचा अल्टिमेटम!

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी पाहणी करून येत्या ४८ तासांमध्ये या मार्गाची दुरुस्ती करावी असा अल्टिमेटम मनसेने दिला आहे. यासंदर्भात मनसेने पीडब्ल्यूडी विभाग, महापालिका आणि शिवसेनेला लक्ष्य केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -