घरमुंबईअजून ३ आमदार राष्ट्रवादीकडे परतले, अजित पवारांकडे आता एकच आमदार

अजून ३ आमदार राष्ट्रवादीकडे परतले, अजित पवारांकडे आता एकच आमदार

Subscribe

अजित पवार यांच्या गोटातले अजून ३ आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात परतले असून आता अजित पवारांसोबत असलेल्या आमदारांची संख्या एक झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोणतीही कल्पना न देता अजित पवार यांनी परस्पर भाजप आणि पर्यायाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सोबत ११ प्रत्यक्ष आमदार आणि इतर आमदारांच्या सह्यांचं पत्र देखील होतं. या आधारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला. अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, आता अजित पवारांसोबत गेलेले आमदार पुन्हा स्वगृही अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात येऊ लागले आहेत. शपथविधी झाल्यानंतर विशेष विमानाने दिल्लीला नेण्यात आलेले आमदार दौलत दरोडा, अनिल पाटील आणि नरहरी जिरवळ हे तिघे मुंबईत राष्ट्रवादीच्या गोटात परतले आहेत. त्यामुळे आता अजित पवार यांच्यासोबतच्या आमदारांची संख्या अवघी एक राहिली आहे. अजित पवारांसोबत आता अण्णा बनसोडे हे एकमेव आमदार शिल्लक राहिले आहेत.

- Advertisement -

शुक्रवारी संध्याकाळपर्यंत शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेणार हे चित्र असताना शनिवारी भल्या सकाळी अजित पवार यांच्या गटातल्या आमदारांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यांच्यासोबतच अजित पवार यांनी देखील शपथ घेतली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप झाला. ‘पक्षाच्या अंतर्गत कामासाठीचे आमदारांच्या सह्यांचे कागद अजित पवारांनी पाठिंब्यासाठी दिले असण्याची शक्यता आहे’, असा खुलासा नंतर शरद पवारांनी उद्धव ठाकरेंसोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये केला. त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री उशिरा दिल्लीहून तीन आमदारांना परत आणण्यात आलं आहे. दरम्यान, रविवारी रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांना रेनिसाँ हॉटेलमधून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच्या हॉटेल हयातमध्ये हलवण्यात आलं आहे.


हेही वाचा – ‘हा’ तर अजित पवार रूपी टोणग्याचे दूध काढण्याचा प्रयत्न-शिवसेना

दरम्यान, रविवारी अजित पवारांनी ‘अजूनही मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असून शरद पवार हेच माझे नेते आहेत’, असं ट्वीट करून गोंधळ उडवून दिला होता. या पार्श्वभूमीवर आमदारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रमाचं वातावरण होतं.

- Advertisement -

मात्र, त्यावर लागलीच शरद पवारांनी उलट ट्वीट करून ‘अजित पवार दिशाभूल करत असून राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबतच आहे’, असं सांगितल्यामुळे रविवारी काका-पुतण्यामध्ये ट्वीटर वॉर पाहायला मिळालं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -