घरमहाराष्ट्रमध्यावधी निवडणुका नाहीच, सरकार स्थापन होणार - शरद पवार

मध्यावधी निवडणुका नाहीच, सरकार स्थापन होणार – शरद पवार

Subscribe

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्यात मध्यावधी निवडणुका होणार का? अशी भीती अनेकांना वाटू लागली होती. सत्ता स्थापनेच्या अगदी जवळ पोहोचलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये देखील संभ्रमाचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक पार पडली. या बैठकीत बोलत असताना शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुका होणार नसून आमदारांनी आपापल्या मतदारसंघात जाऊन काम करावे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या आमदारांना दिला आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची काल (दि. १२ नोव्हेंबर) देखील बैठक झाली होती. मात्र त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. तसेच संध्याकाळी काँग्रेसच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. याबद्दल माध्यमांतून विविध चर्चांना उधाण आले असताना आपल्या आमदारांना माहिती देण्यासाठी आज पुन्हा राष्ट्रवादीने आमदारांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत काँग्रेससोबत झालेल्या चर्चेचा आणि राष्ट्रपती राजवटीसंबंधीची माहिती देण्यात आली. बैठकीपुर्वी अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना की, “आमदारांनी मतदारसंघात जाऊन काम करावे. तसेच राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आमदारांचे काय होणार? त्यांचे हक्क अबाधित राहणार का? याबद्दलही आमदारांना आम्हाला सांगायचे आहे.”

- Advertisement -

 

तसेच या बैठकीत काँग्रेस सोबत समान कार्यक्रम ठरवण्यासाठी ५ जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -