घरमुंबईईशान्य मुंबईतील सहाही लढतीत एकतर्फीचे चित्र !

ईशान्य मुंबईतील सहाही लढतीत एकतर्फीचे चित्र !

Subscribe

प्रस्थापितांना उमेदवारी नाकारून त्यांचा पत्ता कापण्याचे प्रकार यावेळी शिवसेना व भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात झाले. त्याचा फटका युतीला ठिकठिकाणी बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईतील ईशान्य मुंबई या लोकसभा मतदारसंघातील मुलुंडमध्ये आमदार सरदार तारासिंग व घाटकोपर पूर्वमधून प्रकाश मेहता यांना भाजपने तर शिवसेनेचे भांडुपमधील अशोक पाटील यांना उमेदवारी नाकारून अन्य उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले. मात्र असे असले तरी हे मतदारसंघ भाजप व शिवसेनेचे बालेकिल्ले समजले जात असल्याने या मतदारसंघात त्यांना फारसा फटका बसणार नाही. त्यामुळे ईशान्य मुंबईतील सहाही विधानसभा मतदारसंघात एकतर्फी लढती होण्याच्या शक्यता अधिक आहेत.

ईशान्य मुंबईतील सहा मतदारसंघापैकी तीन मतदारसंघांमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. त्यातील मुलुंड मतदारसंघामध्ये 1990 पासून भाजपचे वर्चस्व दिसून येते. मुलुंड मतदारसंघ हा गुजराती व मराठी भाषिकांचा मतदारसंघ असला तरी गुजराती भाषिकांचे प्रमाण येथे अधिक आहे. 1990 मध्ये भाजपचे वामनराव परब या मतदारसंघातून निवडून आल्यानंतर त्यांनी या मतदारसंघात भाजपची बांधणी उत्तम पद्धतीने केली. त्याचा फायदा पुढे 1995 मध्ये किरीट सोमय्या यांना झाला. त्यानंतर 1999 पासून 2014 पर्यंत सलग चार वेळा भाजपचे सरदार तारासिंग हे एकतर्फी निवडून येत आहेत. सलग तीन दशके भाजपचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघामध्ये यावेळीही तारासिंग यांनाच उमेदवारी देण्याचे निश्चित झाले होते.

- Advertisement -

परंतु उमेदवारी वाटपात ऐनवेळी सरदार तारासिंग यांना वगळून मिहीर कोटेचा यांना येथून उमेदवारी देण्यात आली. मिहीर कोटेचा यांनी 2014 मध्ये वडाळा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे यावेळी त्यांना भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघातून उमेदवारी देत त्यांचे एकप्रकारे पुनर्वसन केले आहे. मात्र हे पुनर्वसन करताना भाजपकडून सरदार तारासिंग यांना वयाचे कारण देत डावलण्यात आल्याची प्रतिक्रिया स्थानिकांमधून व्यक्त केली जात आहे.

मुलुंडप्रमाणेच घाटकोपर पूर्व हा मतदारसंघही भाजपाचा बालेकिल्ला समजला जातो. या मतदारसंघातून माजी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता हे सलग सहा वेळा निवडून आले. परंतु मंत्रीपद मिळाल्यानंतर मेहता यांच्याकडून गृहनिर्माण प्रकल्पामध्ये झालेल्या काही गैरव्यवहार प्रकरणामुळे त्यांना मंत्रीपद गमवावे लागले. तसेच त्याचाच फटका त्यांना उमेदवारी मिळवण्यातही बसला. आपल्याला उमेदवारी मिळत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी आपल्या मुलासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली. पण त्यातही त्यांना यश आले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघातून सर्वाधिक श्रीमंत उमेदवार असलेले पराग शहा यांना उमेदवारी जाहीर केली. पराग शहा यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर मेहता यांच्या समर्थकांनी शहा यांच्यावर हल्ला करत त्यांच्या गाडीची तोडफोड केली. त्यामुळे पराग शहा यांना भाजपच्या अंतर्गत बंडाळीचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु घाटकोपर पूर्व या मतदारसंघात गुजराथी भाषिक वर्ग मोठ्या प्रमाणात असून, हा वर्ग उमेदवारापेक्षा पक्षाला प्राधान्य देतो. त्यामुळे पराग शहा यांच्यासाठी मेहता यांची अडचण ठरण्याची शक्यता नाही. तसेच या मतदारसंघात अन्य कोणत्याही पक्षाचे फारसे अस्तित्व नसल्याने शहा यांच्यासाठी ही निवडणूक एकतर्फीच ठरण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

भाजपचे आमदार राम कदम यांचा घाटकोपर पश्चिम मतदारसंघात दबदबा आहे. घाटकोपर पश्चिम हा मराठीबहुल मतदारसंघ आहे. 2009 मध्ये राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राज्यात हवा असताना आमदार राम कदम हे मनसेच्या तिकिटावरून या ठिकाणी निवडून आले. पण त्यानंतर त्यांनी राजकारणातील बदलती हवा लक्षात घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला व 2014 मध्ये भाजपच्या तिकिटावर घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून निवडून येत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. मागील दहा वर्षांत राम कदम यांनी विविध कार्यक्रमातून मतदारांच्या संपर्कात राहून त्यांच्याशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्यात यश मिळवले. त्यामुळेच त्यांना मानणारा एक वर्ग या मतदारसंघात निर्माण झाला आहे. त्यामुळे घाटकोपर पश्चिम हा मतदारसंघ भाजपचा नव्हे तर राम कदम यांचाच बालेकिल्ला समजला जातो. दहिहंडीच्या व्यासपीठावर त्यांनी महिलांसदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे यावर्षी त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी झाली होती. परंतु राम कदम यांना उमेदवारी न दिल्यास ते अपक्ष निवडणूक लढवण्याची चर्चा सुरू झाली. राम कदम दूर जाणे हे भाजपला परवडणारे नसल्याने त्यांनी अखेर राम कदम यांना उमेदवारी जाहीर केली.

भाजपप्रमाणे ईशान्य मुंबईतील भांडुप पश्चिम व विक्रोळी या दोन मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व आहे. विक्रोळी मतदारसंघ हा मध्यमवर्गीय मराठीबहुल भाग आहे. त्यामुळे या भागामध्ये शिवसेना व मनसेला मानणारा एक मोठा वर्ग आहे. 2009 च्या निवडणुकीत या मतदारसंघातील तरुणाई मनसेकडे आकर्षित झाल्याने मनसेचे मंगेश सांगळे हे मोठ्या मताने निवडून आले. 2014 च्या निवडणुकीत राज ठाकरे यांचा करिष्मा ओसरल्याने तरुण वर्ग पुन्हा शिवसेनेकडे वळला. त्याचा फायदा सुनील राऊत यांना झाला. विक्रोळीमध्ये अनुसूचित समूह मोठ्या प्रमाणात आहे. याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेल्या उमेदवाराला मिळालेल्या मतांतून स्पष्ट झाले. त्यातच विक्रोळीतून मनसेकडून फेसबूक फेम नितीन नांदगावकर किंवा आपल्या कार्याने विक्रोळी परिसरात ओळखले जात असलेले शाखाध्यक्ष जयंत दांडेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती.

मनसेकडून नितीन नांदगावकर किंवा जयंत दांडेकर यांना उमेदवारी मिळाल्यास मतदारसंघात कडवी झुंज पाहायला मिळाली असती. परंतु मनसेकडून विभागध्यक्ष विनोद शिंदे यांना उमेदवारी दिली. विनोद शिंदे यांना मतदारसंघात फारशी ओळख नसल्याने सुनील राऊत यांचा पेपर पुन्हा सोपा झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय पिसाळ यांनी महिनाभरापासून मतदारसंघात जोरदार प्रचाराला सुरुवात केली. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते अधिक जोमाने कामाला लागले आहेत. पिसाळ हे कांजूरमार्गमध्ये नगरसेवक असल्याने त्यांना या भागात मानणारा मोठा वर्ग आहे. परंतु विक्रोळी, भांडुप पूर्व, नाहूर पूर्व, पवई या भागामधील नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी त्यांना मेहनत घ्यावी लागणार आहे.

विद्यमान आमदार अशोक पाटील यांना शिवसेनेकडून उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे सध्या भांडुप पश्चिम मतदारसंघ गाजत आहे. भांडुप हा शिवसेेनेचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे अशोक पाटील यांना उमेदवारी नाकारून रमेश कोरगावकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने कोरगावकर यांना फारसा फरक पडणार नसल्याची शक्यता स्थानिकांकडून वर्तवण्यात येत आहे. अशोक पाटील हे आगरी समुदायाचे असल्याने शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने भांडुप गावातील आगरी समुदाय दुखावण्याची शक्यता होती. परंतु शिवसेनेने संजय पाटील यांना पक्षात घेऊन त्या समाजालाही चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच भांडुपमध्ये अन्य पक्षामध्ये प्रबळ उमेदवार नसल्याने रमेश कोरगावकर यांना त्याचा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ईशान्य मुंबई भाजपचे तीन तर शिवसेनेच्या दोन मतदारसंघावर वर्चस्व असताना मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघात समाजवादी पक्षाचे वर्चस्व आहे. या मतदारसंघात मुस्लिमबहुल समुदाय मोठ्या प्रमाणात असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पक्षाचे वर्चस्व असल्याचे वारंवार दिसून येते. आघाडीकडून प्रत्येकवेळी ही जागा समाजवादी पक्षाला सोडण्यात येते. त्यामुळे 2009 व 2014 च्या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी यांचे वर्चस्व दिसून येते.

2009 च्या निवडणुकीत अबु आझमी यांनी 14 हजार मतांनी विजय मिळवला होता. मात्र 2014 च्या निवडणुकीत त्यांना शिवसेनेच्या सुरेश पाटील यांनी कडवी झुंज दिली. 2009 च्या तुलनेत 2014 च्या त्यांच्या मतांमध्ये तब्बल पाच हजार मतांनी घट झाली. 2014 च्या निवडणुकीत अबु आझमी यांचा 9 हजार मतांनी विजय झाला होता. यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे विठ्ठल लोकरे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र त्याचवेळी शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपाच्या गौतम सोनावणे यांनीही अर्ज भरला आहे. त्यामुळे युतीला अंतर्गत बंडाळीचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -