घरमुंबईउत्तर मुंबईत दहिसरच्या गडासाठी मागाठाणेचे आंदण

उत्तर मुंबईत दहिसरच्या गडासाठी मागाठाणेचे आंदण

Subscribe

उत्तर मुंबई हा तसा भाजप आणि शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मागील दोन लोकसभा निवडणुका पाहता खासदार गोपाळ शेट्टींच्या पारड्यात युतीच्या मतदारांनी जे भरभरुन मतांचे दान टाकले आहे, ते पाहता या मतदार संघातील कोणत्याही विधानसभा क्षेत्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे किंवा अन्य पक्षाच्या उमेदवाराला उभे राहण्यास जागा उरलेली नाही. या लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभांपैकी ४ भाजप, १ शिवसेना आणि एक काँग्रेसचा आमदार आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसचा हा एकमेव गड जावून युतीचा अभेद्य गड निर्माण होणार आहे. मात्र, युतीच्या फॉर्म्युलात या मतदार संघात शिवसेनेला कोणतीही अधिक जागा मिळण्याची शक्यता कमी आहे. परंतु मागाठाणे आणि दहिसरच्या मतदार संघाची अदलाबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रथम २०१४ आणि त्यानंतर २०१९चा उत्तर मुंबई लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीमध्ये ही निवडणुकीत लढली. त्यामुळे २०१४च्या तुलनेत २०१९मध्ये युतीचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या मतदानामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. दहिसर, बोरीवली, मागाठाणे, कांदिवली पूर्व, चारकोप आणि मालाड पश्चिम हे सहा विधानसभा मतदार संघ या उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघात येतात. मागील २०१४च्या विधानसभा निवडणुकीत युतीत काडीमोड घेत शिवसेना आणि भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली होती. परंतु यंदा स्वबळाऐवजी लोकसभेप्रमाणेच विधानसभाही युतीत लढली जाणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे वारंवार सभांमधून जाहीर करत आहेत. त्यामुळे युती करण्याची शिवसेनेची प्रबळ इच्छा आहे. परंतु प्रश्न आहे तो जागा वाटप व काही मतदार संघांच्या अदलाबदलीचे.

- Advertisement -

त्यामुळे या निवडणुकीत युती झाल्यास भाजपचे आधीच चार आमदार असल्याने हाती काही अधिक मतदार संघ लागण्याची शक्यता नाही. काँग्रेसच्या ताब्यात असलेला मालाड पश्चिम या मतदार संघात मागील वेळी भाजपचे उमेदवार राम बारोट हे दुसर्‍या क्रमांकावर होते. त्यामुळे या मतदार संघावर पहिला हक्क भाजपचा राहणार आहे. मालाडचे काँग्रेस आमदार अस्लम शेख हे पक्षांतराच्या मनस्थितीत आहेत. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे दरवाजे ठोकवत आहे. परंतु भाजपने त्यांच्यासाठी दरवाजे बंद केले आहेत. उत्तर मुंबईचे भाजप जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक विनोद शेलार हे या मतदार संघातून इच्छुक आहेत. त्यामुळे जागा वाटपात हा मतदार संघ शिवसेनेला सोडण्याची शक्यता कमी आहे. तरीही भाजपकडून हा मतदार संघ घेण्याचा शिवसेनेचा डाव असून तसे झाल्यास अस्लम शेख हे शिवसेनेत प्रवेश करू शकतील,असेही बोलले जात आहे.

सध्या मागाठाणे हा एकमेव मतदार संघ शिवसेनेकडे आहे. मराठी बहुल वस्ती असलेल्या या मतदार संघातून यापूर्वी मनसेतून प्रविण दरेकर निवडून आले होते. परंतु २०१४च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रकाश सुर्वे यांनी पराभव केला. परंतु मनसेकडून ही निवडणूक लढवताना प्रविण दरेकर तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले होते. तर भाजपचे रतीलाल मेहता हे दुसर्‍या क्रमांकावर होते. परंतु आता दरेकर यांनी भाजपात प्रवेश केला असून ते मुख्यमंत्र्यांच्या विशेष मर्जीतील समजले जातात. त्यामुळे मागाठाणे मतदार संघ भाजपकडे घेण्याची गळ घातली जात आहे. तसे झाल्यास दहिसर मतदार संघ भाजपला देवून मागाठाणे घेता येईल,असा विचार पुढे आलेला आहे. त्यामुळे मागाठाणे भाजपकडे आल्यास उत्तर मुंबईचे टोक वगळता सलग मतदार संघावर भाजपची पकड राहील,असे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मागाठाणे भाजपने घेतल्यास प्रविण दरेकर यांचे पुनर्वसन होईल.

- Advertisement -

तर दहिसर मतदार संघ सध्या भाजपकडे आहे. शिवसेनेच्या अंतर्गत वादाचा फटका त्यांना बसला आणि याच वादाचा फायदा उठवत नगरसेविका मनिषा चौधरी या आमदार झाल्या. माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी बंडखोरी करत मनसेकडून उमेदवारी मिळत निवडणूक लढवली. परंतु घोसाळकर यांच्या विरोधातील मते माजी महापौर असलेल्या तसेच विभागांमध्ये चांगले नाव असूनही राऊळ यांच्या पारड्यात पडली नाही. उलट ती भाजपकडे वळली गेली. शिवसेनेचा गड असून या मतदार संघात घोसाळकर यांना ३८ हजार ६६० मते मिळाली होती. तर भाजपच्या मनिषा चौधरी यांना दुप्पटपेक्षा अधिक म्हणजे ७७ हजार २३८ मतदान झाले होते. परंतु पुन्हा एकदा दहिसरचा गड शिवसेनेला उभा करायचा आहे.

यासाठी मागाठाणे मतदार संघाची अदलाबदल करण्याची खुद्द शिवसेनेचीही इच्छा आहे. तसे झाल्यास विद्यमान आमदार मनिषा चौधरी यांना पालघर जिल्ह्यातील मतदार संघातून उमेदवारी देण्याचा भाजपचा विचार आहे. तर दहिसरमधून पुन्हा एकदा विनोद घोसाळकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेच्या दोन महिला नगरसेविकांनी केलेल्या आरोपांमधून घोसाळकर निर्दोष सुटल्यानंतर पक्षाने त्यांची वर्णी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अध्यक्षपदी केली. या अध्यक्षपदाला ते चांगल्याप्रकारे न्याय देतानाच पक्ष संघटनेची धुराही समर्थपणे पेलत आहेत. त्यामुळे घोसाळकर यांच्या पुनर्वसनासाठी मतदार संघाची अदलाबदल आवश्यक असून दहिसरचा गड पुन्हा काबिज करण्यासाठी शिवसेनेलाही जोरदार मोर्चेबांधणी करावी लागणार आहे.

दहिसर विधानसभा मतदार संघ – मनिषा चौधरी (भाजप) : ७७,२३८, विनोद घोसाळकर(शिवसेना) :३८,६६०;
बोरीवली विधानसभा मतदार संघ : विनोद तावडे (भाजप) : १,०८,२३८, उत्तमप्रकाश अग्रवाल(शिवसेना) : २९,०११; मागाठाणे : प्रकाश सुर्वे (शिवसेना) : ६५,०१६, रतीलाल मेहता (भाजप) : ४४,६३१; कांदिवली                           विधानसभा मतदार संघ : अतुल भातखळकर (भाजप) : ७२,४२७, रमेश सिंह ठाकूर (काँग्रेस) : ३१,२३९;
चारकोप विधानसभा मतदार संघ : योगेश सागर(भाजप) : ९६,०९७, शुभदा गुडेकर(शिवसेना) : ३१,७३०; मालाड पश्चिम : अस्लम शेख (काँग्रेस) : ५६,५७४; राम बारोट (भाजप) : ५४,२७१.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -