घरमहाराष्ट्रआरोग्य केंद्राची तीनदा ‘नारळफोडी’

आरोग्य केंद्राची तीनदा ‘नारळफोडी’

Subscribe

इमारतीचे काम जैसे थे

तालुक्यातील जनतेला आधार असणारे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आजही दुरवस्थेत असून, निवडणुकीच्या तोंडावर सुसज्ज इमारतीसाठी तब्बल तीनदा नारळ फोडण्यात आले. मात्र इमारत जैसे थे आहे. त्यामुळे नारळ फोडीच्या लागलेल्या स्पर्धेचा पुढचा भाग येत्या निवडणुकीच्या निमित्ताने पहावयास मिळणार का, याकडे आता सर्वांचेच लक्ष आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या या केंद्रावर 43 हजार 81 नागरिक आरोग्य सेवेसाठी अवलंबून आहेत. या केंद्रांतर्गत ७ उपकेंद्रे असून, वाढत्या लोकसंख्येला या सर्वच केंद्रांची सुविधा अपुरी पडत आहे. खासगी औषधोपचार न परवडणारे रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत असले तरी पडणार्‍या ताणामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळतील याची शाश्वती नसते. यातून प्राथमिक केंद्राऐवजी ग्रामीण रुग्णालय असावे ही संकल्पना पुढे आली आहे. मात्र असे रुग्णालय होणार म्हणजे भूमिपूजनाचा नारळ दणक्यात फुटला पाहिजे या मानसिकतेतून लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांचा मोका साधण्यात येऊन तीनवेळा नारळ फोडण्यात आले.

- Advertisement -

शेवटचा नारळ अलिकडच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सन 2018 मध्ये खुद्द आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते धुमधडाक्यात फुटला. दस्तुरखुद्द आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते नारळ फुटल्याने काही महिन्यातच 30 खाटांचे रुग्णालय पूर्ण होईल, अशी आशा निर्माण झाली. परंतु त्याची साधी वीटही रचली गेली नाही, ना यासाठी पुढाकार घेणार्‍या स्थानिक नेत्यांनी त्याकरिता पाठपुरावा केला. स्वाभाविक एका जीर्ण व गैरसोयीच्या ठरत असलेल्या इमारतीत डॉक्टर, कर्मचारी व उपचाराकरिता येणारे रुग्ण यांना एकमेकांना सांभाळून घेण्याची वेळ आली आहे. शस्त्रक्रियागृहाची अवस्था गोदामासारखी झाली आहे. एकूणच इमारतीचे स्वरुप अवकळा आल्यासारखे झाले आहे. वरवर रंगरंगोटी केली जात असली तरी तो प्रकार हस्यास्पद ठरत आहे.

येत्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नारळ फुटणार काय, किंवा आचारसंहितेचा अडसर आला तर या रुग्णालयाबाबत आश्वासनांचा पाऊस पडणार काय, याकडे सुधागड तालुक्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून संभाव्य खर्चाचा तपशील आला नसल्याने रखडल्याची चर्चा आहे. नव्याने रूजू झालेले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मोरे हे याबाबत अनभिज्ञ आहेत. तर नेमके कुठे काम अडले याची माहिती नाही, परंतु येत्या ६ महिन्यांत या रुग्णालयाचे काम मार्गी लागेल, असा विश्वास तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -