घरमुंबईइतना सन्नाटा क्यों है भाई? उद्धव ठाकरेंचा सवाल!

इतना सन्नाटा क्यों है भाई? उद्धव ठाकरेंचा सवाल!

Subscribe

एकीकडे राज्यात सत्ता स्थापनेचं घोडं शिवसेनेच्या ठाम भूमिकेमुळे अडलं असतानाच आता सामनातून शिवसेनेनं सरकारवर निशाणा साधला आहे.

एकीकडे राज्यातल्या विधानसभा निवडणुकांमध्ये जागा कमी होऊन देखील शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत आहे. सर्वाधिक जागा जिंकून देखील बहुमताची मॅजिक फिगर गाठू न शकलेल्या भाजपला शिवसेनेच्या अटींपुढे झुकावं लागण्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शिवसेनेचं वजन आणखीनच वाढलं असतानाच भाजपनं स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्याची चर्चा भाजपच्या अंतर्गत वर्तुळात सुरू आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘सामना’ या आपल्या अग्रलेखातून शिवसेनेनं अर्थात उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला देखील परखड सवाल केला आहे… इतना सन्नाटा क्यों है भाई?

निवडणुकांमध्ये शुकशुकाटच जास्त

देशात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात सध्या दिवाळीचा सण सुरू आहे. मात्र, बाजारपेठेत दिवाळीचं वातावरण दिसत नाही. आर्थिक निकषांवर परिस्थिती बिकट आहे. या मुद्द्यांवर सामनाच्या आजच्या अग्रलेखातून सरकारवर तोंडसुख घेण्यात आलं आहे. ‘देशाच्या आर्थिक क्षेत्रामध्ये दिवाळी साजरी करावी असं वातावरण कुठेच दिसत नाही. ऐन दिवाळीत बाजारपेठांमध्ये शुकशुकाट आहे. ऑनलाईन शॉपिंगमधून पैसा परदेशी कंपन्यांच्या तिजोरीत जात आहे. राज्यात झालेल्या निवडणुकांचा धुमधडाका कमी आणि शुकशुकाटच जास्त होता’, असं परखड मत या अग्रलेखात मांडण्यात आलं आहे.

- Advertisement -

शेतकरी हवालदील

परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या केलेल्या नुकसानीवरून देखील सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. ‘पावसाळा संपून महिना झाला तरी पाऊस धो धो कोसळतोय. हाताशी आलेल्या पिकांची नासाडी होत आहे. दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांचं हे मोठं नुकसान आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे कित्येकदा शेतीवर केलेल्या खर्चाइतकं देखील उत्पन्न येत नाही. आणि त्यावर उपाय काय करायचा, हे कोणीही सांगत नाही’, असं यात नमूद करण्यात आलं आहे.


हेही वाचा – कोल्हापुरातील पराभवास शिवसेनेचे संजय मंडलिक जबाबदार-चंद्रकांत पाटील

सरकारवर ओढवली नामुष्की

दरम्यान, आर्थिक दुरवस्थेमुळे आलेल्या अरिष्टावर अग्रलेखात भाष्य करण्यात आलं आहे. ‘खरेदी कमी झाल्यामुळे बाजारातली रौनकच हरवली आहे. नोटबंदी आणि जीएसटीमुळे ओढवलेलं आर्थिक संकट कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस अधिकाधिक उग्र होत आहे. कारखानदारी धोक्यात आली आहे. उद्योगधंदे बंद पडत आहेत. रोजगारनिर्मिती ठप्प आहे. कंपन्या दिवाळखोरीत जात आहेत. बँकांचं दिवाळं वाजत आहे. त्यात सरकारी तिजोरीत खडखडाट झाल्यामुळे युद्धकालीन परिस्थितीसाठी रिझर्व्ह बँकेने राखून ठेवलेल्या निधीतून पावणेदोन लाख कोटींची रक्कम काढण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे. रिझर्व्ह बँक स्वत:कडचं सोनं मोडायला निघाली आहे. या सगळ्या परिस्थितीत एकच सवाल निर्माण होतो. इतना सन्नाटा क्यों है भाई?’ असं या अग्रलेखाच्या शेवटी म्हणण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -