घरमुंबई'मुख्यमंत्र्यांनी 'ते' विधान करायला नको होतं', उद्धव ठाकरेंची नाराजी

‘मुख्यमंत्र्यांनी ‘ते’ विधान करायला नको होतं’, उद्धव ठाकरेंची नाराजी

Subscribe

उद्धव ठाकरेंनी दिवाळीच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीच्या फॉर्म्युल्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

एकीकडे राज्यात शिवसेना-भाजपची सत्ता स्थापन होणार का? आणि होणार तर कधी होणार? याची चर्चा राज्यात सुरू असताना आता युतीच्या चर्चेतला मिठाचा खडा सगळयांसमोर आला आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या एका वक्तव्याचा संदर्भ देत, ‘मुख्यमंत्र्यांनी दिवाळीच्या दिवशी ते वक्तव्य करायला नको होतं. पण तरी आम्ही मित्रपक्षांना शत्रूपक्ष मानत नाही’, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं आहे. शिवसेनेच्या विजयी आमदारांची बैठक बुधवारी शिवसेना भवनावर आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी त्यांनी आमदारांशी बोलताना ही नाराजी बोलून दाखवली आहे.

दिवाळीच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधींशी अनौपचारिक संवाद साधला होता. यावेळी, त्यांनी युतीच्या फॉर्म्युल्यासंदर्भातली चर्चा फेटाळून लावली होती. ‘युतीचा कोणताही ५०-५० फॉर्म्युला ठरलेला नाही. मुख्यमंत्रीपदाविषयी अडीच वर्षांबद्दल काहीही ठरलं नव्हतं. अमित शहांनी देखील फॉर्म्युल्याविषयी कोणतीही चर्चा झाली नाही असं मला सांगितलं’, असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. मात्र, त्याच वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंनी आमदारांशी बोलताना नाराजी व्यक्त केली आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी ते वक्तव्य करायला नको होतं’, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी पुन्हा निवड

‘पर्याय सगळ्यांकडे असतात’

दरम्यान, दोन्ही पक्षांनी एकमेकांनी पर्याय खुले असल्याचे इशारे दिले आहेत. एकीकडे भाजपकडून शिवसेनेला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिल्याचं सांगितलं जात असतानाच संजय राऊत यांनी देखील बुधवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन ‘भाजपने दिलेला शब्द पाळावा. पर्याय सगळ्यांकडे असतात’, अशा आशयाचं वक्तव्य करून बहुमत मिळवलेल्या दोन्ही मित्रपक्षांमध्ये काहीही आलबेल नसल्याचं दाखवून दिलं होतं. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी केलेलं वक्तव्य नव्या चर्चांना तोंड फोडणारं ठरण्याची दाट शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -