घरमुंबईकलानींसमोर आव्हान आयलानी

कलानींसमोर आव्हान आयलानी

Subscribe

उल्हासनगर विधानसभा मतदार संघ

एकेकाळी सिंधी बहुल असलेला हा मतदार संघ आता संमिश्र मतदार संघ झालेला आहे, या मतदार संघात कलानी कुटुंबियांचे वर्चस्व आहे. पप्पू कलानी हे 3 वेळा तर त्यांची पत्नी ज्योती कलानी या दोन वेळा निवडून आलेल्या आहेत. 2014 मध्ये ज्योती कलानी या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या . त्यावेळी शिवसेना व भाजपची युती न झाल्याने भाजप उमेदवार कुमार आयलानी यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. अवघ्या 1800 मतांच्या फरकाने ज्योती कलानी यांचा विजय झाला होता .

या मतदार संघात आता ज्योती कलानी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढण्यास इच्छूक नसून भाजपच्या तिकिटावर त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत. दुसरा पर्याय म्हणजे त्यांना तिकीट न मिळाल्यास त्यांचा मुलगा ओमी कलानी किंवा सून पंचम कलानी ( विद्यमान महापौर ) यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी कलानी कुटुंबियांनी केली आहे.

- Advertisement -

माजी आमदार व भाजप शहराध्यक्ष कुमार आयलानी हे देखील भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून जंग – जंग पछाडीत आहेत. 2009 मध्ये भाजपच्या कुमार आयलानी यांनी पप्पू कलानी यांच्या आश्चर्यकारक रित्या पराभव केल्याने आयलानी यांचे पक्षातील स्थान भक्कम झाले होते. यंदा ते भाजपचे प्रबळ दावेदार असून पक्षातील बहुसंख्य नगरसेवक आणि पदाधिकारी त्यांच्या सोबत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्योती कलानी यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याने या पक्षाचे नगरसेवक भरत गंगोत्री यांना उमेदवारी मिळणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे. शिवसेनेतर्फे नगरसेवक व शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष भगवान भालेराव हे देखील येथून निवडणूक लढण्यास इच्छूक आहे आणि हा मतदारसंघ रिपाईंला मिळावा अशी त्यांची मागणी आहे.

- Advertisement -

उल्हासनगर हे निर्वासितांचे शहर अशी या शहराची ओळख होती. देशाच्या फाळणीनंतर सिंधी समाजाचे येथे पुनर्वसन करण्यात आले होते. आता मात्र चित्र हळूहळू बदलत चालले आहे. सिंधी मतदारांची संख्या आता 50 टक्क्यांवर आली आहे . शहरातील अनेक समस्यांमुळे सिंधी नागरिक अंबरनाथ, कल्याण , नवी मुंबई या शहरात स्थलांतरण करीत आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तुलनेत यंदा 80 हजार मतदारांची घट झाली आहे. यात बोगस मतदार , काही मतदारांचा मृत्यू व अन्य कारणे आहेत .

मतदार संघातील समस्या
उल्हासनगर शहरातील अनधिकृत इमारती , पाणी समस्या, वाढती गुन्हेगारी, डबघाईला आलेला जीन्स उद्योग, वाहतूक समस्या, निकृष्ट दर्जाचे रस्ते , शहरातून जाणार्‍या कल्याण – कर्जत महामार्गाचे रखडलेले काम

2014 च्या निवडणुकीचे निकाल
उमेदवार पक्ष एकूण मते
ज्योती कलानी ( राष्ट्रवादी काँग्रेस ) 43,760
कुमार आयलानी ( भाजप ) 41,897
धनंजय बोडारे ( शिवसेना ) 23,868

141 विधानसभा मतदार संघ
एकूण मतदार 2 लाख 32 हजार 873
1,27,839 पुरुष
1,04,899 स्त्रिया

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -