आकांड-तांडव करून सिनेमागृह सुरू केले आणि प्रेक्षक आले फक्त ४!

Cinema halls to reopen Oct 15 onwards with 50% capacity, one-seat distance: Prakash Javadekar

गेल्या ६ महिन्यांपासून देशभरातल्या सिनेमागृहांना टाळं लागलेलं आहे. कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊन अंतर्गत देशभरातली सिनेमागृह बंद करण्यात आली होती. मात्र, गेल्या दोन महिन्यांत अनलॉक अंतर्गत अनेक गोष्टी पुन्हा सुरू करण्यात आल्या. मात्र, त्यामध्ये सिनेमागृहांचा समावेश करण्यात आलेला नव्हता. अखेर नुकत्याच केंद्र सरकारने जाहीर केलेल्या Unlock 5 अंतर्गत शुक्रवार १६ ऑक्टोबरपासून सिनेमागृह पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली. यासाठी सरकारकडून आवश्यक त्या नियमावली देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं सक्तीचं करण्यात आलं आहे. सिनेमागृह पुन्हा सुरू व्हावीत, यासाठी देशभरातल्या सिनेमागृह चालकांनी अनेकदा मागणी करून, प्रसंगी आंदोलनाचा मार्ग पत्करून मागणी केली होती. मात्र, जेव्हा सिनेमागृह सुरू झाली, तेव्हा प्रत्यक्षात प्रेक्षक मात्र फक्त ४ आल्याचं दिसून आलं!

५० टक्के क्षमतेने चित्रपटगृह सुरू

राजधानी दिल्लीमध्ये मोठमोठी सिनेमागृह आहेत. या सिनेमागृहांची संख्या किमान १५० ते कमाल ४५० पर्यंत आहे. दिल्लीमध्ये एकूण १३० थिएटर स्क्रीन्स आहेत. गेल्या ६ महिन्यांपासून सिनेमागृहाचं तोंड देखील न पाहिलेले प्रेक्षक परवानगी मिळताच मोठ्या संख्येने गर्दी करतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, प्रत्यक्षात परिणाम उलटा पाहायला मिळाला. दिल्लीच्या ग्रेटर कैलाश सिनेमागृहाची प्रेक्षक मर्यादा १५० असताना सकाळी ११.३० च्या शोची फक्त ४ तिकिटं विकली गेली, तर दुपारी २.३० च्या शोची फक्त ५ तिकिटं विकली गेली. दरम्यान, चित्रपट गृहांच्या मालकांना मात्र हळूहळू प्रेक्षकांचा प्रतिसाद वाढण्याची खात्री वाटत आहे.

केंद्र सरकारने जारी केलेल्या नियमावलीनुसार..

५० टक्के क्षमतेने चित्रपटगृह सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच, दिवसभरात कमी शो लावण्याची देखील अट ठेवण्यात आली आहे. हे शो दुपारी १२ ते रात्री ८ वाजेपर्यंतच चालवण्याची मुभा देण्यात आली आहे. सध्या दिल्ली, हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, बिहार, पंजाब, चंदीगड, उत्तराखंड, कर्नाटक आणि जम्मू-काश्मीर या राज्यांनी चित्रपटगृहांना परवानगी दिली आहे. महाराष्ट्रात अजूनही सिनेमागृहांना अजून परवानगी देण्यात आलेली नाही.