Hathras Rape Case : उत्तर प्रदेश सरकारचे सर्वोच्च न्यायालयात गंभीर दावे!

shivsena criticized yogi govt on hathras rape case

गेल्या काही दिवसांपासून देशभरातलं वातावरण उत्तर प्रदेशमधल्या हथरसमध्ये झालेल्या सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे (Hathras Rape Case) ढवळून निघालं आहे. महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून सर्वच स्तरातून उत्तर प्रदेश सरकार आणि उत्तर प्रदेश पोलीस यांच्यावर टीका केली जात आहे. पीडितेचा मृतदेह रात्रीच्या अंधारात जाळणे, पीडितेच्या नातेवाईकांवर केस मागे घेण्यासाठी दबाव टाकणे आणि पीडितेच्या कुटुंबीयांना माध्यमांना भेटू न देणे अशा प्रकारांमुळे उत्तर प्रदेश पोलीस आणि सरकार देशभरात बदनाम होत असतानाच आता या प्रकरणाच्या सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) सुनावणीदरम्यान उत्तर प्रदेश सरकारने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात गंभीर दावे करण्यात आले आहेत. पीडितेचं कुटुंब आणि आरोपी यांच्यामध्ये पूर्ववैमनस्य असल्याचा दावा यात करण्यात आलेला आहे. तसेच, ३ वेळा पीडितेचा जबाब नोंदवण्यात आल्याचं देखील प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या या प्रतिज्ञापत्रामुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रतिज्ञापत्रात? वाचा सविस्तर मुद्दे!

१. काही लोकं पीडितेचा मृतदेह रस्त्यावर ठेऊन हिंसक कारवाया करण्याचा कट करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. म्हणून पीडितेच्या मृतदेहावर रात्रीच अंत्यसंस्कार करण्यात आले.

२. सोशल मीडिया, प्रसार माध्यमं आणि राजकीय पक्षांचा एक गट जातीय हिंसा आणि दंगल घडवण्याचा प्रयत्न करत होते.

३. १४ सप्टेंबरला पीडिता स्वत:, तिचा भाऊ आणि तिची आई पोलीस स्थानकात आले होते. संदीपने (प्रकरणातील प्रमुख आरोपी) पीडितेला मारण्याचा प्रयत्न केला, तिचा गळा दाबला अशी तक्रार त्यांनी केली. या दोन्ही कुटुंबांचं जुनं वैमनस्य आहे. २००२-०३ मध्ये पीडितेच्या आजोबांच्या तक्रारीवरून संदीपला एक वर्ष तुरुंगवास देखील झाला होता.

४. पीडितेला त्यानंतर अलिगढ मेडिकल हॉस्पिटलला उपचारांसाठी दाखल केलं. तिचा मणका फ्रॅक्चर झाल्याचं आणि ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्याचं तिथे दिसून आलं. २८ सप्टेंबरपर्यंत तिथेच उपचार सुरू होते.

५. यादरम्यान १९ सप्टंबरला पीडितेचा दुसऱ्यांदा जबाब घेण्यात आला. यामध्ये संदीपनं तिच्यासोबत छेडछाड केल्याचं पीडितेनं सांगितलं. यावेळी FIR मध्ये छेडछाडीचं कलम जोडण्यात आलं. त्याला लागलीच अटक देखील करण्यात आली.

६. २२ सप्टेंबरला पुन्हा एकदा कुटुंबीयांच्या विनंतीवरून पीडितेचा जबाब तिसऱ्यांदा नोंदवण्यात आला. यावेळी पीडितेने तिच्यावर सामुहिक बलात्कार (Gang Rape) झाल्याचं सांगितलं. आधीच्या जबाबावेळी पुरेशी शुद्धीत नसल्यामुळे तेव्हा बलात्काराबद्दल सांगितलं नसल्याचं पीडितेनं सांगितलं. पोलिसांनी सामुहिक बलात्काराचं कलम जोडत संदीप, लवकुश, रवी आणि रामू या चौघांना अटक केली.

७. २२ सप्टेंबरलाच पीडितेची आरोग्य तपासणी करण्यात आली. मात्र, त्यात सामुहिक बलात्काराचे पुरावे मिळाले नाहीत. त्यानंतर तिचे नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले.

८. २८ सप्टेंबरला पीडितेला दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, २९ सप्टेंबरला तिचा मृत्यू झाला.

९. पीडितेचा पोस्टमार्टम सुरू होताच माजी खासदार उदितराज, भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आणि काँग्रेस-आपचे काही नेते हॉस्पिटल आवारात पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. मृतदेह (Deadbody) ताब्यात न घेण्याबद्दल नातेवाईकांना गळ घालू लागले. तिथे जवळपास ४०० लोकं जमा झाली. शेवटी रात्री ९ वाजता पीडितेचा मृतदेह गावी नेण्यात आला.

१०. रात्री १ वाजता मृतदेह तिच्या गावी हथरसला पोहोचला. तिथे आधीपासूनच २०० ते ३०० लोकं जमा झाले होते. त्यांनी रुग्णवाहिका थांबवली आणि अंत्यसंस्कार करू न देण्याबाबत बोलू लागले. रात्री २.३० वाजेपर्यंत मृतदेह परिवारासोबतच होता.

११. काही लोकं यावरून जातीय हिंसा भडकवण्याची शक्यता असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. तसेच, दुसऱ्या दिवशी सकाली मोठ्या संख्येने तिथे गर्दी जमू शकते असंही समजलं. शिवाय बाबरी मशिदीसंदर्भात निकाल येणार असल्यामुळे सगळेच हाय अलर्टवर (High Alert) होते. पीडितेचा मृत्यू होऊन २० तास उलटले होते. मात्र, तेव्हाच काही प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मृतदेह ताब्यात न घेण्याबाबत कुटुंबीयांना भरीस पाडू लागले. शेवटी पूर्ण विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पीडितेचे कुटुंबीय देखील तिथे उपस्थित होते.

१२. सरकारची प्रतिमा खराब करण्यासाठी हा सगळा कट रचला जात आहे. जेणेकरून तपास खंडित व्हावा आणि पीडितेला न्याय मिळू नये. सरकारविरोधात चुकीच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात १९ खटले दाखल करण्यात आले आहेत.

या प्रतिज्ञापत्रात काही राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची देखील नावे सादर करण्यात आली आहेत.