काळीज पिळवटून टाकणारी घटना! ६ हॉस्पिटल्सनी नाकारलं, गर्भवतीचा अॅम्ब्युलन्समध्येच मृत्यू!

women force to give a birth in movieng bus
प्रातिनिधिक छायाचित्र

गेल्याच आठवड्यात मुंबईजवळच्या मुंब्र्यामध्ये एका महिलेचा हॉस्पिटल्समध्ये बेड न मिळाल्यामुळे रिक्षामध्येच दुर्दैवी मृत्यू ओढवल्याची घटना ताजी असतानाच आता उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये देखील अशीच एक घटना समोर आली आहे. एका ८ महिन्यांच्या गर्भवती महिलेला परिसरातल्या ६ रुग्णालयांनी बेड नसल्याचं कारण देत दाखल करून घ्यायला नकार दिल्यामुळे त्या महिलेचा अखेर अॅम्ब्युलन्समध्येच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तब्बल १३ तास ही महिला आणि तिचा पती रुग्णालयाच्या शोधात फिरत राहिल्याची बाब देखील समोर आली आहे. या घटनेमुळे नोएडा आणि आसपासच्या परिसरातल्या या रुग्णालयांची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या प्रकारामुळे पुन्हा एकदा माणुसकी खरंच मेली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शनिवारी विजेंद्र सिंह यांच्या पत्नी नीलम यांना प्रसूतीकळा जाणवू लागल्यामुळे त्यांनी तातडीने खासगी अॅम्ब्युलन्सने नीलम यांना रुग्णालयात नेण्यासाठी प्रवास सुरू केला. सर्वात आधी ते नीलम यांची ट्रीटमेंट आधीपासून सुरू असलेल्या नोएडा-गाझियाबाद सीमेवरच्या शिवालिक हॉस्पिटलमध्ये गेले. मात्र, त्यांनी बेड उपलब्ध नसल्याचं कारण देत अॅडमिट करून घ्यायला नकार दिला. त्यानंतर ते इएसआय हॉस्पिटलमध्ये गेले, तिथेही नकार मिळाला. पुढए पीजीआय हॉस्पिटलमध्ये गेले. तिथेही नकार. शारदा हॉस्पिटल, जीआयएमएस हॉस्पिटल, जेपी हॉस्पिटल, फोर्टिस हॉस्पिटल अशा सर्व रुग्णालयात गेल्यानंतर तिथेही त्यांना नकारच ऐकायला मिळाला. सर्वच ठिकाणी एकच कारण दिलं जात होतं. बेड उपलब्ध नाहीत. अखेर ते पुन्हा जीआयएसएममध्ये गेले. तिथे नीलम यांची परिस्थिती पाहून त्यांना अॅडमिट करून घेण्यात आलं आणि व्हेंटिलेटर लावण्यात आलं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. नीलम यांचा तोपर्यंत मृत्यू झाला होता.

या प्रकरणी गौतम बुद्ध नगर जिल्हा दंडाधिकारी सुहास एल वाय यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी या प्रकरणी चौकशी करत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र, या प्रकारामुळे पुन्हा एकदा रुग्णालयांची असंवेदनशीलता किंवा वेगाने वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे येणारी असहायता समोर आली आहे.