कलम ३७०चा निर्णय घटनात्मक नाही – प्रियंका गांधी

कलम ३७० हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय असंवैधानिक असल्याची टीका काँग्रेसच्या पूर्वांचलच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली आहे.

Lucknow
Priyanka Gandhi Vadra
प्रियंका गांधी वाड्रा

संसदेमध्ये कलम ३७० हटवण्याची घटनादुरूस्ती मंजूर झाल्यानंतर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. एकीकडे विरोधकांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली असतानाच सत्ताधारी आणि मित्रपक्षांनी मात्र उत्साहात या निर्णयाचं स्वागत केलं आहे. राहुल गांधींनी केंद्र सरकारच्या या निर्णयावर टीका केलेली असतानाच आता काँग्रेसच्या पूर्वांचलच्या सरचिटणीस प्रिंयका गांधी यांनी या प्रकरणावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. ‘केंद्र सरकारने असंवैधानिक पद्धतीने कलम ३७० हटवलं आहे’, अशी टीका प्रियंका गांधींनी केली आहे.

‘ज्या पद्धतीने कलम ३७० हटवण्यात आलं आहे, ते पूर्णपणे असंवैधानिक आहे. लोकशाहीविरोधी आहे. जेव्हा तुम्ही असे बदल करता, तेव्हा त्याची एक विशिष्ट पद्धत राज्यघटनेत नमूद करण्यात आली आहे. मात्र, ती यावेळी पाळण्यात आलेली नाही’, असं प्रियंका गांधी म्हणाल्या आहेत. दरम्यान, ईदच्या निमित्ताने प्रियंका गांधींनी ट्वीटवर दिलेल्या शुभेच्छांमध्ये देखील त्यांनी अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. ‘तुम्हा सगळ्यांना ईदच्या शुभेच्छा. विशेषत: आत्ता काश्मीरमध्ये त्रास सहन करत असलेल्या माझ्या बंधू-भगिनींना शुभेच्छा’, असं प्रियंका गांधी या ट्वीटमध्ये म्हणत आहेत.

मागच्याच आठवड्यामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यामध्ये जम्मू-काश्मीरला असलेला विशेष राज्याचा दर्जा काढून घेण्यता आला असून जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले आहेत.