घरदेश-विदेशराहुल अमेठी आणि वायनाडमधून लढणार

राहुल अमेठी आणि वायनाडमधून लढणार

Subscribe

 काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठीसोबतच केरळमधील वायनाड मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. वायनाड हा मतदार संघ राहुल गांधींसाठी सर्वाधिक सुरक्षित मतदार संघ मानला जातो. येथे मुस्लिमांची लोकसंख्या जास्त असल्यामुळे राहुल गांधी यांनी हा मतदार संघ निवडल्याची टीका भाजपने केली आहे. तर केरळ काँग्रेसचे सरचिटणीस अब्दुल माजीद यांनी राहुल गांधी येथून निवडणुकीला उभे राहिले तर त्यांना प्रचाराची गरज भासणार नाही, असे म्हटले आहे.

काँग्रेस अध्यक्षांचा पराभव करू -पी. विजयन
केरळचे मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ डावे नेते पी. विजयन यांनीही राहुल गांधी यांच्या वायनाड येथून निवडणूक लढवण्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ’’ राहुल गांधी हे केरळमधील 20 पैकी एका जागेवरून निवडणूक लढवत आहेत. त्यातून काही वेगळा अर्थ घेण्याची गरज नाही. राहुल गांधी यांना दोन ठिकाणांहून लढायचे होते तर त्यांनी जिथे विरोधात भाजपाचा उमेदवार असेल, अशा मतदारसंघातून निवडणूक लढवली पाहिजे होती. काँग्रेसने आज घेतलेला निर्णय म्हणजे डाव्यांशी पुकारलेला थेट लढा आहे. त्यामुळे राहुल गांधींविरोधात लढून आम्ही त्यांचा पराभव करणारच, असे विजयन म्हणाले.

- Advertisement -

काँग्रेसचा बालेकिल्ला
वायनाड हा मतदार संघ कर्नाटक आणि तामिळनाडूच्या सीमारेषेवर उत्तर केरळमध्ये आहे. जेव्हा अखिल भारतीय काँग्रेस समितीने केरळ प्रदेश काँग्रेस समितीला राहुल गांधी यांच्यासाठी सुरक्षित मतदार संघ सुचवण्यास सांगितले तेव्हा वायनाड या मतदार संघाचा पर्याय पुढे आला. २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी हा मतदार संघ स्थापन करण्यात आला. पहिल्या निवडणुकीत या मतदार संघातून काँग्रेसचे नेते एम आय शाहनवास १.५३ लाखांच्या फरकाने निवडून आले होते. त्यानंतर २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत शाहनवासच पुन्हा निवडून आले मात्र त्यांचे मताधिक्य २० हजारांपर्यंत खाली आले होते.

मुस्लिमांची संख्या सर्वाधिक
हा मतदार संघ तीन विधान सभा मतदार संघांपासून तयार झाला आहे. वायनाड, मलाप्पुरम आणि कोझीकोडे जिल्ह्यातील हे तीन मतदार संघ आहेत. या मतदार संघात मुस्लिम मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. १३ लाख २५ हजार ७८८ मतदार असलेल्या या मतदार संघात ५६ टक्के मुस्लिम मतदार आहेत. राहुल गांधी यांना उमेदवार देण्यामागे अल्पसंख्यांक मुस्लिमांची मते मिळवण्याचे राजकारण आहे. या मतदार संघात मुस्लिम लीगचे प्राबल्य मोठे आहे. जवाहरलाल नेहरूंनी मुस्लिम लीगला जातीय पक्ष मानले असले तरी त्या वंशजांनी मुस्लिम लीगसोबत सौहार्दाचे संबंध ठेवले आहेत. विशेष म्हणजे मुस्लिम लीगने राहुल गांधी यांचे स्वागत केले आहे.

- Advertisement -

सीपीआयचे कडवे आव्हान
राहुल गाधांची समोर एलडीएफचे पी. पी. सुनीर यांचे आव्हान असणार आहे. सुनीर हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे युवा नेते आहेत. भाजपने ही जागा बीजीजेएसला दिली आहे. मात्र राहुल गांधी या मतदार संघातून उभे रहाणार असल्यामुळे वरिष्ठ भाजप नेत्याकडून ही निवडणूक लढवली जाण्याची दाट शक्यता आहे.

वायनाडमधील समीकरण
2011 च्या जनगणनेनुसार वायनाड जिल्ह्याची एकूण लोकसंखा 8 लाख 17 हजार 420 एवढी आहे. त्यात 4 लाख 01 हजार 684 पुरुष आणि 4 लाख 15 हजार 736 महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यातील साक्षरतेचे प्रमाण 89.03 टक्के एवढे आहे. एकूण लोकसंख्येपैकी 4 लाख 4 हजार 460 (49.48टक्के) हिंदू आहेत. तर 2 लाख 34 हजार 135 (28.65 टक्के) मतदार मुस्लिम आहेत. 1 लाख 74 453 (21.34 टक्के) मतदार ख्रिश्चन आहेत.

घाबरून पळाले

अमेठी मतदारसंघात आपला पराभव होणार याची खात्री असल्यानेच घाबरलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी केरळच्या वायनाड मतदारसंघात पळून जात आहेत, अशी टीका भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे. उत्तर प्रदेशातील धामपूरमधील एका जाहीर सभेत शहा बोलत होते.काँग्रेस आणि विरोधकांवर जोरदार हल्ला चढवताना शहा म्हणाले की, काँग्रेसच्या ’व्होटबँके’च्या राजकारणाने देशाच्या सुरक्षेशी तडजोड केली आहे.

यामुळेच राहुल वायनाड मतदारसंघात गेले. अमेठीत आपला पराभव निश्चित आहे हे त्यांना चांगलेच माहीत आहे हे त्याचे कारण असल्याचे सांगत, केरळमधील वायनाडमध्ये मतांचे ध्रुवीकरण करण्याचा राहुल यांचा खरा उद्देश आहे.

’विरोधी पक्षांच्या नेत्यांनी कितीही लांगुलचालनाचे कितीही राजकारण केले तरी त्यांचे पोट भरत नाही. काही दिवसांपूर्वी पंचकुलाच्या एका कोर्टाने सन २००७मध्ये समझोता एक्स्प्रेसमध्ये झालेल्या स्फोटप्रकरणी निर्णय दिला. त्यावेळी समझोता एक्स्प्रेसमधील स्फोट हे हिंदू दहशतवादाचे उदाहरण आहे, असे काँग्रेसच्या सरकारने म्हटले होते. संपूर्ण जगात विश्व बंधुत्व वाढणार्‍या हिंदू समुदायाला दहशतवादाशी जोडून बदनाम करण्याचे काम काँग्रेसने केले आहे.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -