घरदेश-विदेशपाकिस्तानी मास्टरमाईंड गाझी अद्यापही काश्मीरमध्ये?

पाकिस्तानी मास्टरमाईंड गाझी अद्यापही काश्मीरमध्ये?

Subscribe

खोर्‍यात मोठी शोध मोहीम

पुलवामा येथील दहशतवादी हल्ला करण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराकडून स्फोटकांचे प्रशिक्षण घेतलेला दहशतवादी अब्दुल रशीद गाझी हा काश्मीरमध्ये आला होता. जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या मसूर अझहर याने गाझी याला काश्मीरमध्ये पाठवले होते. हा गाझी अद्यापही काश्मीर खोर्‍यात लपून असल्याची शक्यता सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केली आहे. त्याला ठार मारण्यासाठी भारतीय लष्कराने काश्मीर खोर्‍यात मोठी शोध मोहीम हाती घेतली.

पुलवामामध्ये गेल्या गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या एक दिवस अगोदर काश्मिरमध्ये दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक उडाली होती. त्यात एक स्थानिक दहशतवादी ठार तर भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला होता. त्या चकमकीतून गाझी उर्फ रशीद अफगाणी हा बचावला असल्याचे गुप्तचर खात्याच्या माहितीवरून स्पष्ट होत आहे.

- Advertisement -

गाझी हा अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी कारवाया करत होता. अफगाणिस्तान युद्धासाठी त्याला पाकिस्तानी लष्कराने स्फोटकांचे प्रशिक्षण दिले होते. या गाझीने अदील अहमद दार या आत्मघाती दहशतवाद्याला तयार केल्याचे समजते. तसेच अदीलच्या गाडीत जी स्फोटके भरण्यात आली होती त्याची रचनाही गाझीने केल्याचे सांगितले जाते.

पूर्वी अफगाणिस्तानमध्ये कार्यरत गाझीची ओळख पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयने, जैशचा म्होरक्या मसूद अझहर याच्याशी करून दिली. अझहरने त्याला काश्मीरमध्ये पाठवले. मागील वर्षी ९ डिसेंबरला तो पाक व्याप्त काश्मिरमधून काश्मीरमध्ये आल्याचे सांगितले जाते. हा गाझी अद्यापही पुलवामा परिसरात लपून असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांकडे आहे. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी अथवा ठार मारण्यासाठी भारतीय लष्कराने मोठी शोध मोहीम हाती घेतली आहे. आयएसआयने गाझीची ओळख करून दिल्यानंतर मौलाना मसूद अझहर आणि गाझी एकमेकांच्या जवळ आले.

- Advertisement -

अझहर आणि आयएसआयच्या विनंतीवरून गाझी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेसाठी काम करू लागला. अफगाणिस्तानमधील युद्धासाठी गाझीला पाकिस्तानच्या लष्कराने प्रशिक्षित केले आहे. विशेषत: स्फोटकांची रचना करण्यात तो मातब्बर आहे.

गाझी हा अफगाणिस्तानमधील खैबर पखतून विभागात नाटो फौजांशी लढत होता. तेथून तो २०११ साली पाकव्याप्त काश्मिरमध्ये परतला. तेव्हापासून तो पाकव्याप्त काश्मिरमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांच्या तळांवर दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देत आहे. हा गाझी तरुणांची माथी भडकवून त्यांना आत्मघाती हल्ल्यासाठी तयार करण्याचे काम करतो.

मसूद अझहर याचे भाचे उस्मान आणि तलहा रशीद यांना भारतीय लष्कराने काश्मीरमध्ये ठार मारले होते. त्यानंतर गाझीला अझहरने काश्मिरमध्ये पाठवले. अझहरने गाझीसोबत दोन कमांडरही दिले होते. हे तिघे डिसेंबर महिन्यात काश्मीरमध्ये आले आणि त्यांनी पुलवामा हल्ल्यासाठी कट रचल्याचे सांगितले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -