‘या’ TiK Tok स्टारच्या बॉलिवूडकर प्रेमात, ‘हा’ दिग्दर्शक देणार चित्रपटात संधी

Mumbai

सध्या तरूणांमध्ये टिक टॉकची जास्त क्रेझ आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच फोनमध्ये टिक-टॉक पहायला मिळतं. टिक टॉकमुळे अनेकजण आज स्टार झाले आहेत. . टिक टॉकवर विष्णूप्रिया ही तरुणी कमी वेळात लोकप्रिय झाली होती. तिचा प्रत्येक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. तिच्यानंतर आता एका टिक टॉक डान्सचा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे या टिक टॉक डान्सरची भुरळ चक्क बॉलिवूडच्या सुपरस्टार्सलाही पडली आहे.

टिक टॉकवर सध्या बाबा जॅक्सन या व्यक्तीच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा डान्सर हुबेहूब मायकल जॅक्सन यांच्याप्रमाणे डान्स करतो. त्यामुळे बऱ्याचदा त्याचा डान्स पाहिल्यानंतर मायकल जॅक्सन डोळ्यासमोर उभे राहतात. या डान्सरचा व्हिडीओ व्हायरल होऊन त्याची चर्चा बॉलिवूडपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे अभिनेता अमिताभ बच्चन आणि हृतिक रोशन यांनी त्याच्या डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत अमिताभ यांनी ‘व्वा’ असं म्हटलं आहे. तर ‘हा व्यक्ती नक्की आहे तरी कोण?’ असा प्रश्न हृतिकने विचारला आहे.

सध्या हा व्हिडीओला नेटकऱ्यांची प्रचंड पसंती मिळत आहे.  यापूर्वी ‘आर्टिकल १५’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव सिन्हा यांनीदेखील या डान्सरचा व्हिडीओ शेअर केला आहे. सोबतच त्यांनी नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझाला टॅग करत, ‘देखा क्या’ असं कॅप्शन दिलं. त्याचं हे कॅप्शन वाचल्यानंतर रेमोनेदेखील ‘भाइया नेक्स्ट फिल्म’ असं म्हटलं. त्यामुळे सध्या या डान्सरची भुरळ बॉलिवूड सेलिब्रिटींना पडली असून खरंच रेमो त्याला आगामी चित्रपटातून ब्रेक देणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.