घरमनोरंजनमुंबईत नेपाळ संस्कृतीचा उत्सव

मुंबईत नेपाळ संस्कृतीचा उत्सव

Subscribe

मुंबई ही अशी नगरी आहे की, जिने भारतातील विविध राज्यांतील नागरिकांना आपल्यात सामावून घेतलेले आहे. शेजारी राष्ट्रातील लोकांनीही मुंबईत वस्ती करणे महत्त्वाचे मानलेले आहे. नेपाळ त्यापैकी एक आहे. संपूर्ण भारतात पासष्ट लाख नेपाळी समाज विखुरलेला आहे. सोळा लाख महाराष्ट्रात आहेत आणि मुंबईत पाच लाखांहून अधिक लोक अनेक पिढ्या वस्ती करून आहेत. मुंबईतील या नेपाळींना एकत्र आणण्याचे काम आंतरराष्ट्रीय नेपाळी विश्वकर्मा आणि प्रवासी नेपाळी श्रमजीवी संघटना यांनी केलेले आहे. लालबाग, परळ, शिवडी भागात कामाच्या निमित्ताने स्थिरावलेले नेपाळींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. लालसिंग दिवेकर, प्रवीणसिंग विश्वकर्मा, राजेंद्र फलार यांच्याबरोबर इंद्रबहादुर सिंग कार्यरत आहेत. इंद्रबहादुर यांची चौथी पिढी शिवडीत वास्तव्य करत आहे. शिवडी मध्य विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या मंडळाच्यावतीने जे विविध उपक्रम राबविले जातात, त्यात हे नेपाळी बांधव प्रत्येक वर्षी सक्रिय असतात. या मंडळाच्यावतीने प्रत्येक वर्षी कला महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.

मधल्या काळामध्ये काही कारणास्तव महोत्सव करण्याचे थांबवले होते. यंदा मात्र थोडीशी काटकसर करून कला महोत्सव ८ ते १६ डिसेंबर या दरम्यान आयोजित करण्याचे ठरवलेले आहे. यातून खर्च वजा करून जी रक्कम उपलब्ध होणार आहे ती समाजकार्यासाठी सत्कारणी लावली जाणार आहे. यंदाचे महोत्सवाचे आकर्षण काय तर नेपाळी संस्कृतीचा उत्सव मुंबईकरांना अनुभवायला मिळणार आहे. जवळजवळ पंचवीस-तीस कलाकारांचा ताफा ही कलाकृती सादर करणार आहे. नेपाळी लोककला, संगीत यांना प्राधान्य देताना हे नेपाळी कलाकार राष्ट्रगीतापासून तर ते गणेशवंदनापर्यंत अनेक मराठी गीते सादर करणार आहेत. कमलजित सिंग यांच्या संगीतात हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. श्वेता लोहार ही मूळची नेपाळची. छबिलदासमध्ये तिचे शालेय शिक्षण झालेले आहे. तीसुद्धा मराठीत काही गीते सादर करणार आहे. उत्सव मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत जाधव यांनी मुंबईकरांना नेपाळी जीवनमान कळावे या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. १४ डिसेंबरला दुपारी ३ ते १० असा भरगच्च कार्यक्रम शिवडीच्या प्रबोधन ठाकरे क्रीडांगणात आयोजित केलेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -