घरमनोरंजनवैभवसंपन्न इतिहासाचा मराठमोळा रंगसोहळा

वैभवसंपन्न इतिहासाचा मराठमोळा रंगसोहळा

Subscribe

हिंदी ऑर्केस्ट्रा तसा खर्चिक कार्यक्रम. कोणी बाहेर ठेवायला मागत नाही. त्यातल्यात्यात मराठी वाद्यवृंद आणि लोककलेचे दर्शन घडवणारे कार्यक्रम आयोजकांकडून ठेवले जातात. साधारण एक दशकापूर्वी महाराष्ट्राचे सांस्कृतिक दर्शन घडवणारे कार्यक्रम सर्वाधिक होत होते. पुढे अशोक हांडे यांचा भव्यदिव्य मराठी बाणा हा कार्यक्रम व्यावसायिक रंगमंचावर दाखल झाला आणि प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या. काही निर्मात्यांनी त्या तोडीच्या कार्यक्रमाची निर्मिती करून महाराष्ट्रातील प्रेक्षकांची सांस्कृतिक भूक भागवलेली आहे, परंतु खुल्या रंगमंचावर असे भव्यदिव्य कार्यक्रम करायचे म्हणजे थोडेसे अवघडच असते, पण गेल्या आठवडाभराचा मागोवा घेतला तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचे, परंपरेचे, लोककलेचे दर्शन घडवणारे कार्यक्रम एकामागोमाग येत असल्याने सांस्कृतिक क्षेत्रात पुन्हा उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

मी मराठी कार्यक्रमाच्या निमित्ताने नंदेश उमप घराघरात पोहोचलेले आहेत. आता त्यांच्याच संकल्पनेत गौरव महाराष्ट्राचा ज्यात महाराष्ट्राच्या वैभवसंपन्न इतिहासाचा मराठमोळा रंगसोहळा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. नेहरु सेंटरने यासाठी पुढाकार घेतलेला आहे. शाहीर साबळे यांच्या संकल्पनेतला महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम आपल्या चांगलाच स्मरणात असेल. त्यांची कन्या चारुशिला साबळे-वाच्छानी यांनी पुढाकार घेऊन पुन्हा ही लोकधारा प्रेक्षकांसमोर सादर करण्याचे ठरवलेले आहे. मध्यंतरीच्या काळात ज्या लोकधारेतून खर्‍या अर्थाने कलाकार प्रसिद्धीला आले त्यांनी एकत्र येऊन लोकधारातील आठवणी नृत्यातून जागवल्या होत्या. रमेश कोळी हे तसे तेलगु समाजातील. समर्पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण भारतातील लोककलेचे दर्शन घडवताना स्वतंत्रपणे महाराष्ट्राच्या लोककलेला, त्यातल्या गाण्यांना प्राधान्य देऊन चाळीस कलाकारांच्या संचात त्यानेसुद्धा महाराष्ट्राचे सांस्कृतिक दर्शन घडवणे सुरू केलेले आहे. एकंदरीत सांस्कृतिक क्षेत्रात पुन्हा गर्जा महाराष्ट्र असे काहीसे वातावरण तयार झालेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -