घरमनोरंजन‘मला आई व्हायचंय’ चित्रपटाचा हिंदी रिमेक!

‘मला आई व्हायचंय’ चित्रपटाचा हिंदी रिमेक!

Subscribe

समृद्धी पोरे दिग्दर्शित 'मला आई व्हायचंय' या मराठी चित्रपटाचा लवकरच हिंदी रिमेक प्रेक्षकांसमोर येत आहे. या आधी तेलुगू भाषेत हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

समृद्धी पोरे यांनी २०११ मध्ये आपला पहिला चित्रपट बनवला ‘मला आई व्हायचंय. या चित्रपटाचा विषय होता ‘सरोगेशन’ म्हणजेच गर्भ भाडयाने देणे/घेणे. ज्यावेळी या विषयावर जास्त बोललंही जात नव्हतं तेव्हा या विषयावर त्यांनी ह्या चित्रपटाची कथा लिहिली आणि दिग्दर्शक म्हणून जबाबदारी सांभाळली. अशा विषयावर कुणीच निर्माता मिळत नाही बघून स्वत:च निर्मिती क्षेत्रातही पहिले पाऊल टाकले. पदार्पणातच समृद्धी पोरे यांना राष्ट्रीय पुरस्कार, राज्य पुरस्कार व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. मात्र तब्बल आठ वर्षांनंतर या चित्रपटाची जादू कमी झालेली नाही. आता याच चित्रपटाचा हिंदीत रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे!

पूर्वी गाजलेल्या हिंदी सिनेमाची कॉपी बऱ्याचदा मराठीत केली जात असे. पण मराठीचा हिंदीत रिमेक होऊन जास्त दर्शकांपर्यंत चित्रपट पोहचणं ही खरच अभिमानाची गोष्ट आहे. एका गहन विषयावर आधारित असलेला मला आई व्हायचंय हा सिनेमा निर्माता दिनेश विजान यांनी विमानात पाहिला आणि इतका सुंदर चित्रपट मराठीशिवाय इतर लोकांपर्यंत पोहोचला कसा नाही? याबद्दल खंत वाटली. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या बहुचर्चित ‘स्त्री’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अमर कौशिक आणि निर्माता दिनेश विजान यांनी मला आई व्हायचंय या मराठी सिनेमाचा हिंदी रिमेक बनवण्याची इच्छा जाहीर केली. त्यानुसार समृद्धी पोरे यांनी त्यांना कायदेशीर हिंदी रिमेकचे राईट दिले आहेत. यामध्ये हिंदीतीली आणि हॉलिवूड मधल्या गाजलेल्या नायिका काम करणार आहेत. कहाणीचे लेखन स्वतः समृद्धी पोरे करणार आहेत.

- Advertisement -

अनेक भाषांमध्ये चित्रपटाची निर्मिती

याच चित्रपटाचे तेलुगु रिमेक हक्क त्यांनी या आधीच दिले होते. त्यावर ‘वेलकम ओबामा’ हा तेलुगू चित्रपट साऊथमध्ये गाजला आहे. समृद्धी पोरे यांनी इतर सर्व भाषांतले हक्क स्वतःकडेच ठेवले आहेत. हिंदी सिनेमाच्या कामाला सुरुवात झाली असून आता लवकरच शूटिंगला सुरुवात होणार आहे.

अशी तयार झाली कथा…

समृद्धी पोरे या पेशाने वकील आहेत. हायकोर्टात प्रॅक्टिस करत असताना त्यांच्याकडे एक केस आली. प्रचंड भावनिक गुंतागुंत असलेल्या या केसचा विषय खूप महत्त्वाचा असून त्यावर चित्रपट होऊ शकतो हे समृद्धी पोरे यांनी जाणलं. त्यानंतर त्यांनी मोठ्या धाडसाने वकिली करत असतानाच मला आई व्हायचंय या सिनेमाचं लेखन-दिग्दर्शन आणि निर्मितीही केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -