‘सुशांतच्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबाबत संजय राऊत खोटे बोलतायत’

sanjay raut
संजय राऊत

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं आणि सुशांतला ते मान्य नव्हतं, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातील रोखठोक  सदरात म्हटलं आहे. यावरून सुशांतसिंहचे मामा आर.सी.सिंह यांनी राऊत यांच्यावर या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. सुशांतच्या वडिलांनी दोन विवाह कधीच केले नाहीत. संजय राऊत चुकीची माहिती देत आहेत, असे सिंह यांनी म्हटले आहे.

आदित्य ठाकरेंच्या सांगण्यावरून चुकीचा आरोप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच खासदार संजय राऊत यांनी चुकीचं विधान केलं आहे, असा आरोप सुशांतसिंहचे काका आर.सी.सिंह यांनी म्हटलं आहे. या चुकीच्या माहितीमुळे आमची प्रतिमा खराब होत आहे. एखाद्याची प्रतिमा खराब करणे चांगली गोष्ट आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. बिहारमधील प्रत्येकाला माहित आहे की सुशांतसिंह याच्या वडिलांनी केवळ एकच विवाह केलेला आहे.

काय म्हटलं रोखठोकमध्ये

सामनामधील रोखठोक या सदरात खासदार संजय राऊत म्हणतात, ‘सुशांतसिंह राजपूत याचे कुटुंब म्हणजे त्याचे वडील पाटण्यात राहतात. त्याच्या वडिलांशी त्याचे चांगले संबंध नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते. त्यामुळे वडिलांशी त्याचे भावनिक नाते उरले नव्हते. याच वडिलांना फूस लावून बिहारमध्ये एफआयआर दाखल करायला लावला गेला आणि मुंबईत घडलेल्या गुन्ह्याचा तपास करायला बिहारचे पोलिस मुंबईला आले.

मुंबई पोलिसांनी हा तपास खुपच लांबवला, असे संजय राऊत त्यांनी रोखठोकमधून मत व्यक्त केले आहे. शिवाय सुशांत आणि अंकिता लोखंडे विभक्त का झाले, याचा तपास घ्यायला हवा, असेही राऊत यावेळी म्हणाले. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधतानाच मुंबई पोलिसांनाही कानपिचक्या दिल्या आहेत. शिवाय या प्रकरणी राऊत यांनी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत.