घरमनोरंजनप्रेमातली घुसमट रेडीमिक्स

प्रेमातली घुसमट रेडीमिक्स

Subscribe

एखादा बीग बजेट हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला, ज्यात अनेक सेलिब्रिटी कलाकार आहेत त्याचवेळी थिएटर मिळत नाही, अशी मराठी चित्रपटांची आरडाओरड सुरू होते. अगदी मराठी भाषेच्या न्यायहक्कासाठी लढणारे पक्षही याकामी उभे रहात असतात, पण कधीकधी अशी अवस्था येते की थिएटरला एखाददुसरा मराठी चित्रपट प्रदर्शित होत असतो. हा मुद्दा आवर्जून मांडण्याचे कारण म्हणजे या शुक्रवारी पाच-सहा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. आता येवढ्या मोठ्या संख्येने मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रत्येकाला अपेक्षीत थिएटर मिळणे कठीणच. अशा पार्श्वभूमीवर अमय खोपकर यांच्या एव्हीके फिल्म्सच्या वतीने ‘रेडीमिक्स’ हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. शेखर ढवळीकर हे याचे लेखक असून, जालिंदर कुंभार याने त्याचे दिग्दर्शन केलेले आहे. वयाच्या एका ठरावीक टप्प्यावर प्रत्येक व्यक्तीला प्रेम करावेसे वाटते. तशी तो आपल्याला साजेल अशी तरुणी हेरतोसुद्धा. प्रेम व्यक्त केल्यानंतर होकार मिळेल असे त्याला काहीसे वाटायला लागते, पण या एकतर्फी प्रेमात समोरच्या व्यक्तीच्या अडचणीचे आकलन होत नाही. काहीतरी निमित्त करून तो अधिक सानिध्यात येण्याचा प्रयत्न करतो. प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेक युक्त्या लढवतो, पण त्यातून वेगळेच काही घडायला लागते. निस्तरायचे कसे हा प्रश्न उद्भवायला लागतो. एक प्रियकर-दोन प्रेयसी यांच्यातील घुसमट म्हणजे ‘रेडीमिक्स’ हा चित्रपट सांगता येईल.

समीर हा इंटिरिअर डेकोरेटर आहे जो आजीच्या सानिध्यात राहतो, तिचा सांभाळ करतो. आजीचा सांभाळ करणारी मावशी येत नाही त्यामुळे ठरवून दिलेल्या रूपरेषेप्रमाणे समीर आपल्या आजीला गार्डनमध्ये फिरायला आणतो. तिथे नुपूर नावाची युवती त्याच्या नजरेस पडते. छान व्यवसाय करून स्थीर व्हावे असे नुपूरला वाटते असते, पण प्रत्येक ठिकाणी तिला अपयशच येते. पुढे समीरच्या मदतीने सलून सुरू करण्याचे ती ठरवते. त्याच्या इंटिरिअर डेकोरेशनची जबाबदारी दोघेही उचलतात. ज्याने या दोघांना सलून उभारण्यासाठी मदत केलेली असते, त्याला इंटिरिअर डेकोरेशन काही आवडत नाही. साहेबांची नाराजी म्हणजे नुपूरचे हतबल होणे, असा काहीसा अर्थ समीर लावतो. तो तिची समस्या सोडवतो. त्याबदल्यात तो आपले प्रेमही व्यक्त करतो. हे करण्यापूर्वी नुपूरने समीरच्या अनेक भेटवस्तू नाकारलेल्या असतात. सानिका ही नुपूरची बहीण जी घटस्फोटीत आहे. तिच्या विक्षिप्त वागण्याचा घरातल्यांना त्रास होत आहे. आपल्या जीवनात चांगला प्रियकर यावा असे सानिकाला वाटत असते. समीरची निनावी भेटवस्तू नुपूर सानिकाला देते. कोणीतरी आपल्यावर प्रेम करते आहे अशा एका मनिषेने तिच्या वागण्यात बदल होतो. तो इतका होतो की तो नुपूरला घातक ठरतो.

- Advertisement -

शेखर ढवळीकरची ही कथा आहे. दिग्दर्शक जालिंदर कुंभार याला ती प्रभावीपणे मांडता आली नाही. प्रेम म्हटलं की भावना येतात. त्या व्यक्त करायच्या म्हणजे जबरदस्त अशी अभिनयाची समज असावी लागते. दिग्दर्शकाने कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेली आहे, पण प्रेम व तडजोडीतले जे बारीकसारीक तपशील हवे असतात ते न दाखवल्यामुळे चित्रपट फक्त कथा सांगणारा होतो. समीरची व्यक्तीरेखा वैभव तत्त्ववादी याने केलेली आहे. त्याने भूमिका निभावली, परंतु भूमिकेची दखल घ्यावी असा फारसा काही प्रयत्न झालेला दिसला नाही. नुपूर साकारणार्‍या प्रार्थना बेहेरेच्या बाबतीतही हेच सांगता येईल. सानिका साकारणार्‍या नेहा जोशीच्या भूमिकेबाबतीत अजून विचार व्हायला हवा होता. तिचा अतिविक्षिप्तपणा तिला स्वत:ला आणि प्रेक्षकांनाही त्रास देणारा वाटतो. सुनिल तावडे, आनंद इंगळे, नेहा शितोळे यांच्या भूमिका यात पहायला मिळतात. अविनाश, विश्वजीत यांचे संगीत या चित्रपटाला लाभलेले आहे.

वृद्धाश्रमातून चित्रपटात
आशा पाटील यांनी तुमचं आमचं जमलं, बन्याबापू, माहेरची साडी, शुभ बोल नार्‍या, गावरान गंगू, सामना अशा दीडशेहून अधिक हिंदी, मराठी चित्रपटात काम केलेले आहेत. उतरत्या वयात गरिबी आणि अनेक आजारांनी त्या व्याकूळ झाल्या होत्या. त्यांची देखभाल करण्यासाठी कुणीही पुढे येत नव्हते. त्यामुळे वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांना वृद्धाश्रमाचा आधार घ्यावा लागला होता. ‘रेडीमिक्स’ या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते प्रवीण वानखेडे हा त्यांच्या संपर्कात होता. आशाताईंनी त्यांच्याकडे या उतरत्या वयात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक जालिंदर कुंभार यांनी शक्कल लढवून चालता-बोलता येत नसतानाही त्यांची ही इच्छा या चित्रपटात पूर्ण केलेली आहे. वैभव तत्त्ववादी याच्या आईची व्यक्तीरेखा आशाताईंनी केलेली आहे. या चित्रपटामध्ये त्यांनी स्वत:हून एकही संवाद साधलेला नाही. त्या प्रत्यक्ष बोलत असल्याचे भासवले गेलेले आहे. त्यांचे या चित्रपटात असणे जुन्या पिढीला सुखद आनंद देणारे ठरणार आहे. कायम स्मरणात राहणार्‍या या अभिनेत्रीला वृद्धाश्रमातून चित्रपटात यावे लागले याची खंतही वाटणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -