प्रीतम कांगणेने पटकावले ‘हे’ दोन पुरस्कार

एकाच दिवशी दोन पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी खरंच अविश्वसनीय आणि अत्यंत आनंददायी अशी घटना आहे. असा योग वारंवार जुळून येत नाही.

mumbai

अभिनेत्री प्रितम कांगणेचा आनंद सध्या गगनात मावत नाहीये. कारण “अहिल्या” या चित्रपटातील भूमिकेसाठी प्रीतमला दोन पुरस्कार जाहीर झाले आणि तेही एकाच दिवशी!

साईश्री क्रिएशनच्या सुधीर चारी निर्मित या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन राजू पार्सेकर यांनी केलं आहे. नितीन तेंडुलकर यांच्या गीतांना प्रवीण कुंवर यांनी संगीतबद्ध केलं आहे. चित्रपटात प्रीतमसह प्रिया बेर्डे, रोहित सावंत, अमोल कागणे, प्रमोद पवार, नूतन जयंत, निशा परूळेकर अशी उत्तम स्टारकास्ट आहे. प्रचंड कष्ट करून आयपीएस झालेल्या एका महत्त्वाकांक्षी महिला पोलिस अधिकाऱ्याची रंजक कथा “अहिल्या” चित्रपटात मांडण्यात आली आहे. या भूमिकेसाठी प्रीतमने घेतलेल्या कष्टांचा प्रीतमला ११ मे रोजी दादासाहेब फाळके आश्वासक अभिनेत्री पुरस्कार आणि त्याच दिवशी संस्कृती कलादर्पणचा लक्षवेधी अभिनेत्री पुरस्काराच्या रुपाने सन्मान झाला.

एकाच दिवशी दोन पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी खरंच अविश्वसनीय आणि अत्यंत आनंददायी अशी घटना आहे. असा योग वारंवार जुळून येत नाही. या चित्रपटासाठी घेतलेल्या कष्टांचं या पुरस्कारांनी चीज झालं आहे. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकही त्यांच्या प्रतिसादातून खरा पुरस्कार देतील याची खात्री वाटते, अशा शब्दांत प्रीतमनं आपल्या भावना व्यक्त केल्या.

प्रीतमनं या पूर्वी हलाल, ३१ ऑक्टोबर, संघर्षयात्रा अशा चित्रपटातून आपल्या समर्थ अभिनयानं लक्ष वेधून घेतलं आहे. अहिल्या चित्रपटात तिनं साकारलेल्या डॅशिंग भूमिकेविषयी चित्रपटसृष्टीट चर्चा आहे.