‘सोहळा’ नेटका झालाच पाहिजे

mumbai
सोहळा चित्रपट

‘सोहळा’ हे गजेंद्र अहिरेच्या नव्या चित्रपटाचे नाव आहे. लेखन, दिग्दर्शन, कथा, गीत याचे अचूक ज्ञान असलेल्या या दिग्दर्शकाला चित्रिकरणाला आवश्यक असणार्‍या स्थळांची, त्यातल्या प्रसंगांची समज आहे. महत्त्वाचे म्हणजे कथेला आवश्यक अशा कलाकारांची निवड ही त्याची आणखी एक जमेची बाजू आहे. त्यामुळे २१ डिसेंबरला प्रदर्शित होणारा हा ‘सोहळा’ नीटनेटका झालाच पाहिजे अशा वृत्तीचा हा दिग्दर्शक आहे. सचिन पिळगावकर प्रथमच गजेंद्रसोबत काम करत आहे.

मधल्या काळामध्ये आपल्या दिग्दर्शनात एकामागोमाग एक चित्रपट देणारा गजेंद्र अहिरे हा एकमेव दिग्दर्शक होता. फक्त आशयघन चित्रपटांची निर्मिती करायची नाही तर प्रेक्षकांना काही नवीन, कल्पक असे पाहिल्याचे समाधानही मिळाले पाहिजे, असा ठाम निश्चय करून चित्रपटांचे दिग्दर्शन त्याने आजवर केलेले आहे. जागतिक पातळीवरील महोत्सवात त्याच्या चित्रपटाची वर्णी लागलेली आहे. प्रतिष्ठेचे म्हणावेत असे अनेक पुरस्कार त्याच्या चित्रपटाला लाभलेले आहेत. त्यामुळे त्याचा स्वत:चा असा प्रेक्षकवर्ग आहे. त्याच्या चित्रपटात आपलाही सहभाग असावा हे प्रत्येक कलाकाराला वाटत आलेले आहे. सचिनबरोबर या चित्रपटात विक्रम गोखले, मोहन जोशी, शिल्पा तुळसकर, लोकेश गुप्ते, आस्मा खामकर यांच्या यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

विभक्त कुटुंबपद्धत ही वाढते आहे. चांगल्याबरोबर वाईट गोष्टीचे अधिक घडताना दिसत आहेत. यापूर्वीच्या बर्‍याचशा चित्रपटांमध्ये हाच विषय हाताळला गेला असला तरी ‘सोहळ्या’ मध्ये मात्र थोड्या वेगळ्या पद्धतीने तो पहायला मिळणार आहे. मानवी नातेसंबंध मात्र तेच परंतु एका विशेष व्यक्तीला काही डोळस माणसांकडून दिली गेलेली वागणूक नाहक त्रास देणारी वाटते तेव्हा जगणे असहाय्य होतेच. परंतु, संघर्ष करण्याची ऊर्जाही त्यात असते. अशी विशेष व्यक्तीरेखा सचिन पिळगावकर यांनी यात साकार केलेली आहे. ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाच्या निमित्ताने सचिन धीर गंभीर भूमिकाही तेवढ्याच सक्षमतेने सादर करू शकतो या जाणीवेने अनेक निर्मात्यांनी थोडी हटके भूमिका त्याच्यावर सोपवणे सुरू केलेले आहे. सोहळ्यातील भूमिका अशीच काहीशी असणार आहे.