लॉकडाऊनने वधूपित्यांना कर्जापासून वाचवले!

करोनामुळे लॉकडाऊन झाले... सोशल आणि फिजिकल डिस्टन्सिंग सक्तीचे झाले, नव्हे करोनानेच माणसामाणसाला एकमेकांकडे संशयाने पहायला लावून विसरलेल्या स्वच्छतेचा परिपाठ आखून दिला, जगण्याची चौकट घालून दिली, आचार-विचारांची जाणीव करून दिली. महत्त्वाचे म्हणजे काटकसर आणि नियोजन शिकवले. गेल्या दोन महिन्यात महाराष्ट्रात फिजिकल डिस्टन्सिंग राखून शेकडो विवाह संपन्न झाले. उभय पक्षांचे मिळून जेमतेम पाच पन्नास लोकांच्या उपस्थितीत हे विवाह उरकले. ना वाजंत्री, ना जेवनावळी आणि ना मानपान...! अवघ्या काही हजारात लॉकडाऊनमध्ये संपन्न झालेल्या साध्या पद्धतीच्या लग्नांमुळे कित्येक वधूपिते कर्जबाजारी होण्यापासून वाचले.

Marriage
प्रातिनिधिक छायाचित्र

महाराष्ट्रातील विवाहपद्धती साधारणपणे १९८० पर्यंत अगदी साधी सोपी आणि अल्प खर्चिक होती. मानपानाचा किरकोळ अपवाद वगळता डामडौल आणि बडेजाव, दिखावा, पैशांची वारेमाप उधळण, अलिशान मंडप आणि जेवणावळी सिनेमातही क्वचितच दिसायच्या. जवळपास ९० टक्के विवाह घराच्या अंगणात सनईच्या चौघड्यांच्या मंगलमय सुरावटींमधे संपन्न झाल्याचे आम्ही साक्षीदार आहेत. हा जुना म्हणजे ४० वर्षांचा ‘फ्लॅश बॅक’ आज उजागर करण्यास कारणीभूत ठरलाय करोना…! हो, करोनाने सारे जगच हादरवून टाकले आहे….! मानवजातीला नामोहरम करून टाकले आहे…! त्याच्या दहशतीने दोन अडीच महिने स्वच्छंदी माणसाला बंदिस्त करून घेत ‘लॉकडाऊन’मध्ये रहावे लागत आहे. एकीकडे करोना जसजसा आपला पसारा सर्वदूर पसरवत आहे, तसा दुसरीकडे माणूस आपल्या गरजा आणि साधनसुचिता मर्यादित करून काटकसरीने जगायला शिकतोय, ही जमेची बाजू निश्चितपणे नाकारता येणार नाही.

करोनाने महाराष्ट्रात शिरकाव करण्याआधी म्हणजे फेब्रुवारी २०२० मध्ये आपण जंगी लग्न सोहळ्यांना हजेरी लावल्याचे आठवत असेलच. दहा ते वीस लाखांचा टोलेजंग खर्च करून दिमाखात साजरे होणारे विवाह सोहळे मध्यमवर्गीयांचे दिवाळे काढणारे निश्चित होते. मात्र, खोटी प्रतिष्ठा, बेगडी मानपान, एकदमच साधारण लग्न उरकले, तर लोक काय म्हणतील, या भ्रामक समजुतीमुळे कर्ज काढून दरवर्षी लग्नाचे बार उडताना सर्वांनीच उघड्या डोळ्यांनी पाहिले. मात्र, ही अनावश्यक उधळपट्टी थांबावी म्हणून कोणीही कोणत्याच लग्न समारंभात ‘ब्र’ शब्द उच्चारलेला आढळला नाही. रोशनाईने झगमगलेल्या महागड्या मंगल कार्यालयात किंवा अलिशान लॉन्समध्ये लाख दोन लाखांची सुपारी दिलेल्या बँड आणि डीजेच्या कर्णकर्कश्श संगीताच्या धुंदीत दहा बारा मेनुच्या भोजनाचा खाणे कमी नि नुकसान जास्त या शिरस्त्याने आस्वाद घेत या उधळपट्टीला आपणही मुकसंमतीच देत आलो ना…!

मात्र, दोनच महिन्यात डोळ्याला न दिसणार्‍या करोना या विषाणूने मातब्बरांना जमिनीवर आणून पुन्हा ऐंशीच्या दशकात नेले. करोनामुळे लॉकडाऊन झाले… सोशल आणि फिजिकल डिस्टन्सिंग सक्तीचे झाले, नव्हे करोनानेच माणसामाणसाला एकमेकांकडे संशयाने पहायला लावून विसरलेल्या स्वच्छतेचा परिपाठ आखून दिला, जगण्याची चौकट घालून दिली, आचार-विचारांची जाणीव करून दिली. महत्त्वाचे म्हणजे काटकसर आणि नियोजन शिकवले. गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात फिजिकल डिस्टन्सिंग राखून शेकडो विवाह संपन्न झाले. उभय पक्षांचे मिळून जेमतेम पाच पन्नास लोकांच्या उपस्थितीत हे विवाह उरकले. ना वाजंत्री, ना जेवनावळी आणि ना मानपान…! अवघ्या काही हजारात लॉकडाऊनमध्ये संपन्न झालेल्या साध्या पद्धतीच्या लग्नांमुळे कित्येक वधुपिते कर्जबाजारी होण्यापासून वाचले. विवाह सोहळ्यातील प्रतिष्ठेचा आणि तितकाच वादग्रस्त प्रकार म्हणजे बस्ता…! पूर्वी हजार दोन हजार रुपयांत नवरदेव, नवरी आणि वरमायांच्या साड्या अशा माफक आणि आटोपशीर वस्त्र खरेदीने बस्त्याचा सोपस्कार उरकायचा. मात्र, अलीकडे कापड दुकानांवर बस्त्याच्या नावाने जत्रा भरते. वर, वधूला एक नाही, तर किमान तीन वेगवेगळ्या प्रकारच्या वस्त्रालंकाराची खरेदी केली जाते. उभय पक्षातील किमान दोन डझन स्त्री, पुरुषांचा उंची पेहराव एक फॅशन बनली आहे. नातेवाईक महिलांना देण्यासाठी शंभरेक साड्यादेखील बस्त्याचा अविभाज्य भाग बनून गेला आहे. बस्ता नामक या दिखाऊ सोपस्कारावर लाखांपेक्षा अधिक खर्च रिवाज बनला असताना करोनामुळे ‘लॉकडाऊन’ कालावधीत कापड दुकाने बंद असल्याने विनासायास हा अफाट खर्च वाचला आहे. सराफ बाजारही बंद राहिल्याने दागिन्यांवर होणारा अवास्तव खर्चसुद्धा वाचला. केवळ मंगळसूत्र आणि अंगठी आदी जुजबी अलंकारांवर समाधान मानून विवाह संपन्न झाले.

भोजणावळीतील वाया जाणार्‍या अन्नाची बचत झाली, पाण्याची नासाडी थांबली, फटाक्यांच्या आतषबाजीने होणारे वायू प्रदूषण आणि बँडचा दणदणाटाने होणारे ध्वनी प्रदूषणही अडीच महिन्यात झाले नाही. बहुतांश सुज्ञ वर, वधूंनी स्वतः पुढाकार घेत स्वखुशीने सामाजिक कार्य करणार्‍या संस्थांना सढळ हाताने मदत करून नवा आदर्शवत पायंडा पाडला आहे. मुख्य म्हणजे बेगडी डामडौलामुळे बोथट झालेल्या विवाहसंस्थेतील भावना आणि जाणिवा करोनाच्या निमित्ताने का असेना पुुुन्हा सजीव होऊन माणुसकी जिवंत झाली. बेगडी अहंकार आणि दिखाऊ मोठेपणा गळून पडला.आपुलकी, प्रेम, स्नेह वाढीस लागले आणि यातूनच परस्परातील सद्भावना वृद्धिंगत होतील, हे ओघाने आलेच.

रवींद्रकुमार जाधव