घरफिचर्स...त्या रसिकांसाठी!

…त्या रसिकांसाठी!

Subscribe

दिल का भंवर

निशिकांत सबनीसांसारख्या एका जातिवंत वाचकाच्या म्हणण्याने एक वेगळी प्रेेरणा मिळाली आणि मला भेटलेल्या गाण्याच्या दोन रसिकांबद्दल यावेळी या सदरातून मी लिहायचं ठरवलं. अशापैकीच एक अजय सकपाळ आणि दुसर्‍या मीना कदम. अगदी खर्‍या अर्थाने गाणं जगणारी ही रसिक माणसं. त्यांच्यावर लिहिताना आज अगदी धन्य झाल्यासारखं वाटतंय.

संगीत या विषयावरचं माझं हे सदर नियमितपणे वाचणारे माझे एक निवृत्त मोटरमन मित्र आहेत. निशिकांत सबनीस त्यांचं नाव. त्यांनी गेल्या आठवड्यात माझ्यापुढे एक वेगळाच प्रस्ताव ठेवला.ते म्हणाले, याच महानगर दैनिकात तुम्ही 1996 साली गाण्यावरच्या माझ्या प्रेमाबद्दल लिहिलं होतं. अजरामर गाण्यांचा ठेवा ठेवून गेलेल्या महान व्यक्तींबद्दल तुम्ही नेहमीच या सदरातून लिहिता. पण त्यांच्या त्या गाण्यांवर आमच्यासारखी सर्वसामान्य माणसं कशी प्रेम करत असतात हे त्यावेळी लिहून आमच्यासारख्या गाण्याच्या रसिकांचीही तुम्ही नोंद घेतली होती. गाण्यावरच्या तुमच्या या सदरातून एखाद्या रसिकाची अशी नोंद घेणं ही तशी दुर्मीळ बाब होती. माझ्या गाण्यावरच्या प्रेमाला निराळी ऊर्जा, निराळं बळ देणारी होती. आज तशाच एखाद्या रसिकावर, त्याच्या गाण्यावरच्या प्रेमावर तुम्ही पुन्हा का लिहीत नाही?निशिकांत सबनीसांसारख्या एका जातिवंत वाचकाच्या या म्हणण्याने एक वेगळी प्रेेरणा मिळाली आणि मला भेटलेल्या गाण्याच्या दोन रसिकांबद्दल यावेळी या सदरातून मी लिहायचं ठरवलं…

- Advertisement -

अशापैकीच एक अजय सकपाळ. पन्नाशीकडे आलेला. जगण्याच्या रोजच्या रहाटगाडग्यात जगण्याशी हसतखेळत तोंड देणारा; पण तरीही मनाच्या एका कप्प्यात गाणं, संगीत जपणारा, त्यावर भरभरून प्रेम करणारा हा अजय सकपाळ हा असाच माणसांच्या गर्दीत भेटला. रोजच्या जगण्यातल्या विसंगतीबद्दल हसत हसत बोलता बोलता एके दिवशी गाण्यावरच्या त्याच्या प्रेमाची झलक दाखवून गेला, पटकन म्हणाला, उन्हाळा संपत आला…आभाळात ढग दाटू लागले आणि पावसाचं सेटिंग लागलं (नेपथ्याऐवजी सेटिंग हा त्याचाच शब्द!) की मराठी भावगीतं मला साद घालतात. ही अशी वेळ असते की त्यावेळी भावगीतं ऐकण्यावाचून माझ्यापुढे दुसरा पर्याय राहत नाही.

…आणि खरंच पावसाची ही पहिली सर आली आणि तापलेलं वातावरण ओलावून गेली की राकट आणि कणखर शरीरयष्टीच्या या अजय सकपाळचं मन अरूण दातेंचं ‘दिल्या-घेतल्या वचनांची शपथ तुला आहे, मनातल्या मोरपिसांची शपथ तुला आहे’ हे गाणं धुंडाळतं. पावसाच्या या पहिल्या सरीचा आनंद घेताना त्याला श्रीनिवास खळेंच्या ‘श्रावणात घननिळा बरसला’ या आणखी एका भावगीताचीही आठवण त्याच्या मनात दाटून येते.

- Advertisement -

या अशा कुंद वातावरणात त्याला हीच भावओली गाणी का आठवतात, यामागे त्याचं असं एक चिंतन आहे. त्याचं म्हणणं आहे, संगीतशास्त्रात गाणं ऐकण्याचे जसे प्रहर असतात तसं पावसाळी मोसमाला सुरुवात होतानाची वेळ भावगीतं ऐकण्याला साजेशी असते. इतरही वेळी ही भावगीतं मी ऐकतोच; पण का कुणास ठाऊक, पावसाळी मोसमाची चाहूल लागली की भावगीतं ऐकण्याची वेळ झाली आहे असं माझं मन मला म्हणतं.

अजय सकपाळ हा काही तसा गाण्याच्या शास्त्राचा अभ्यासक वगैरे नाही; पण त्याच्या संगीतप्रेमाचं एक वैशिष्ठ्यं असं की तो आवडलेल्या गाण्यांच्या रचनांमधलं सौंदर्य समजून घेतो. ते जाणून घेण्याची त्याच्या जिज्ञासू वृत्तीमधून पुन्हा त्याची गाण्यावरची रसिकताच दिसते. तो मित्रांसाठी ज्या पार्ट्या आयोजित करतो त्यातूनही त्याचं गाण्यावरचं प्रेम वजा होऊ देत नाही. या पार्ट्यांमध्ये तो कॅराओकेची व्यवस्था करतो. अजूनही कुठे कुठे होणारे ऑर्केस्ट्रा तो सोडत नाही. कुठूनही गाण्याशी जुळलेला आपला धागा तुटू देत नाही. थोडक्यात काय तर, रोजचं धकाधकीचं जीवन जगताना अजय सकपाळ आपलं गाण्यावरचं प्रेम वजा होऊ देत नाही. गाणं बजावण्याचे असे मुशाफिर असतात म्हणूनच गाणं जगत असतं.

गाण्याची दुसरी मला भेटलेली अशीच एक रसिक म्हणजे मीना कदम. तिला नृत्याची अतिशय आवड. पण परिस्थितीपायी तिला शास्त्रशुध्द नृत्याचं शिक्षण घेता आलं नाही. टीव्हीवरचे सिनेमे पाहून त्यातल्या नायिकांचं नृत्य पहायचं आणि त्या नृत्याचा पदन्यास लक्षात ठेवायचा, नंतर घरात एकटं असताना आरशाला साक्षीदार ठेवून तो पदन्यास पेश करायचा ही तिची नृत्य शिकायची पध्दत. पण हे नृत्य शिकता शिकता तिचं मन गीतसंगीतात गुरफटत गेलं. तिच्या मनात गाण्याची आवड निर्माण झाली. टीव्हीवर पाहिलेल्या नृत्याचा पदन्यास जसा ती लक्षात ठेवायची तसंच आता ती गाण्याचे शब्द, सूर, ताल लक्षात ठेवू लागली. ‘पत्ता पत्ता, बुटा बुटा’ हे गाणं असंच तिच्या मनात रेंगाळत राहिलं. त्या गाण्यावर तिची बेहद्द भक्ती जडली. ते गाणं तसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न तिने कधीच केला नाही; पण ते गाणं तिच्या लक्षात राहिलं. त्याचं कारण तिची गाण्याबद्दलची आसक्ती म्हणा किंवा भक्ती. खरं तर गाण्याची खरी व्याख्या हीच आहे की जे कुणी लक्षात ठेवायचा प्रयत्न करत नाही, पण ते कधी लक्षात राहतं ते कळत नसतं ते गाणं. कित्येक गाणी मीना कदमच्या त्यांच्या शेवटच्या अंतर्‍यासह पाठ आहेत ती या गाण्याच्या व्याख्येला जागूनच.

आज मीना कदम आजी झाली आहे; पण गाणं बजावण्याची, नृत्यसंगीताची तिची आवड लोप पावलेली नाही. लता-आशाचा तो बहराचा काळ, सोनेरी काळ आठवून तिचं मन शहारतं. ‘आंधी’तलं ‘इस मोड से जाते हैं’ हे गाणं ऐकलं की तिचं मन मागच्या काळात जातं, तिचे डोळे पाणावून जातात. खरं तर मीना कदम ही मुळातच हळव्या मनाची…आणि गाण्याच्या बाबतीत तर जरा जास्तच हळवी. लता-आशाच्या काळात तिच्या गाण्याबद्दलच्या जाणिवा समृध्द झाल्या असल्या तरी आजच्या काळातल्या संगीतातलं तिला जर काही भावलं तर तेही ती गुणगुणून पहाते आणि कधीतरी अख्खं गाणंच गाऊन दाखवते. तिचं गाण्यावरचं खरंखुरं प्रेम जर कधी सिध्द होत असेल तर ते ती मॅजेस्टिक बुक स्टॉलमध्ये खास गाण्यांची पुस्तकं विकत घ्यायला जाते तेव्हा. तिला गाण्याचा शब्द न् शब्द नीट ऐकून नीट गायचा असतो. कारण तिचं गाण्यावरचं प्रेम वरवरचं नसतं.

…तर गाणं बजावण्याच्या नादात नेहमी गाणं बजावण्यातल्या कलावंताच्या निरनिराळ्या पैलूवर लिहिणं होतं; पण ती मुशाफिरी करताना भेटलेल्या, गाणं बजावण्याच्या दोन रसिकांवर लिहिण्याची प्रेरणा तशाच एका रसिकाने दिली. गाणं गाता गाता गाण्यातली एखादी नवी जागा सापडावी तसाच हा योग होता!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -