प्रादेशिक पक्षांना संपण्याचा भाजपचा ‘सत्याचा’ प्रयोग!

सत्य आणि अहिंसा हे जगासाठी नाही तर आधी माझ्यासाठी लागू पडते. म्हणून मी स्वतःवर हे प्रयोग करेन मग जगाला सांगेन, यातच त्या महात्म्याचे महत्व चिरकाल टिकून राहणार आहे. पण, हातात झाडू घेऊन आणि गांधीजी आमच्या काळजात आहेत, असे सांगत भाजप आपल्या मित्रपक्षांना संपवायला निघाली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रादेशिक पक्षांना संपवू पाहण्याचे ‘सत्याचे प्रयोग’ लावले खरे, पण ते खोटे आहेत याची खात्री आता पटली आहे.

Mumbai
Uddhav Thackeray and Devendra Fadnavis

वो झूठ बोल रहा था
बडे सलिके से…
मैं एतबार न करता
तो क्या करता…

वसीम बरेलवी यांचा हा शेर पेश करत शिवसेना नेते संजय राऊत यांनी कुरुक्षेत्रावरील लढाईत मातोश्रीने शस्त्रे अजून खाली ठेवलेली नाहीत हे दाखवून दिले…आणि आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मैदानात उतरल्याने सेना आरपारची लढाई लढणार हे चित्र स्पष्ट झाले आहे. महाभारतात कुरुक्षेत्रावर काय चालले आहे, याची माहिती संजय धृतराष्ट्राला देत होता… अंध कौरव राजाला संजयच्या डोळ्यातून रणांगणावर काय चालले आहे, याची खडानखडा माहिती मिळत होती. कलियुगात राऊत नामक संजय हे उद्धव यांच्यासाठी सेनापती होऊन लढत आहेत आणि त्यांच्या बाणांनी भाजप घायाळ झाला आहे. आता कुरुक्षेत्रावरील या लढाईचे काय होणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. या निमित्ताने एक मात्र झाले भाजपचा पार्टी विथ डिफेरन्सचा खोटा मुखवटा गळून पडला… खरंतर खोटाच होता, पण जगात फक्त आपणच सत्यवचनी असून बाकी सर्व खोटारडे आहे, हा जो त्यांचा मुखवटा होता तो टराटरा फाडला गेला, हे बरे झाले.

महात्मा गांधीजी यांनी ‘सत्याचे प्रयोग’ या आपल्या आत्मचरित्रात आयुष्यात सत्याला सामोरे जाताना स्वतःला कुठल्या खडतर वाटेवरून जावे लागले, याचा आत्मशोध मांडला… तो सोपा नव्हता. आपण जगाला फसवू शकू, पण स्वतःला नाही… हे न फसवणे म्हणजे आत्मशुद्धीचा महामार्ग ठरतो. थेट परमेश्वराच्या जवळ जाण्याची ही वाट आहे. त्याचा शोध गांधीजींनी घेतला कारण ते महात्मा होते. सत्य आणि अहिंसा हे जगासाठी नाही तर आधी माझ्यासाठी लागू पडते. म्हणून मी स्वतःवर हे प्रयोग करेन मग जगाला सांगेन, यातच त्या महात्म्याचे महत्व चिरकाल टिकून राहणार आहे. पण, हातात झाडू घेऊन आणि गांधीजी आमच्या काळजात आहेत, असे सांगत भाजप आपल्या मित्रपक्षांना संपवायला निघाली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रादेशिक पक्षांना संपवू पाहण्याचे ‘सत्याचे प्रयोग’ लावले खरे, पण ते खोटे आहेत याची खात्री आता पटली आहे.

अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांचा भाजप आता राहिलेला नाही. प्रमोद महाजन, सुषमा स्वराज्य, अरुण जेटली आज या जगात नाही. मग आता भाजप कुणाचा उरला आहे तर तो फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा. ते ठरवणार आहेत की या देशात आता कोणी कसे वागायचे, राहायचे आणि चालायचे… लोकशाहीत राहून अदृश्य अशा हुकुमशाहीत राहून गप्प बसायचे. मुकाट राहा नाही तर तुम्ही संपलात. नोटबंदीवर बोलायचे नाही, बेरोजगारीवर गप्प राहायचे, कारखाने बंद पडत चालले आहेत ते उघड्या डोळ्यांनी बघत बसायचे, शेतकरी आत्महत्या करत आहेत ते शांतपणे बघत बसायचे… फक्त एक करायचे भारतमाता की जय बोलायचे! भरल्या पोटी राष्ट्रवादाचे गाणे गाणे सोपे आहे. बाकीच्या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? त्याला मात्र आम्ही बांधील नाही. तुमचे तुम्ही बघून घ्या… हा माज झाला! असाच माज लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर दाखवला होता.

आधी आपण भाऊ भाऊ आणि नंतर तुम्ही कोण? असे धडधडीत खोटे फक्त भाजपच वागू शकते. लोकसभेत २०१४ प्रमाणे बहुमत मिळेल, अशी खात्री वाटत नसल्याने मोदी-शहा यांनी उद्धव- नितीश कुमार यांना जवळ केले आणि गरज भागातच आपण कोण? असा माज केला. हा खोटेपणा नाही तर काय होता. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपचा हा माज उतरवताना मोदींच्या मंत्रिमंडळात दुय्यम खाती घेण्यास नकार दिला. १६ खासदार निवडून येऊन नितीश कुमार यांनी हा स्वाभिमान दाखवला. पण, १८ खासदार निवडून आणूनही शिवसेनेला ते जमले नाही. भाजपच्या मागे ते फरफटत गेले… अवजड खात्याचे जड ओझे घेऊन निमूट पडून राहिले. त्यांना आशा होती की विधानसभा निवडणुकीनंतर सर्व ठिक ठाक होऊन आपल्याला सन्मान मिळेल… पण, आपण २५ वर्षांनंतर कोणाबरोबर युती करत आहोत, याचे भान शिवसेनेला नव्हते. त्यांना वाटत होते की भाजप दिल्या शब्दाला जागेल आणि सत्तेचे समान वाटप होईल. पण, दिला शब्द पाळायचा असतोच असे नाही, असे गांधीजींचे नाव सांगून खोटे वागता येते, हे भाजपने आता दाखवून दिले आहे.

शिवसेनेबरोबर सत्तेत समान वाटप असे काही आमचे ठरले नव्हते आणि तसा शब्द अमित शहा आणि आम्ही उद्धव यांना दिला नव्हता, असे फडणवीस सांगत असतील तर त्यावर आज शहा हे मूग गिळून गप्प का बसले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी युती करावी म्हणून तुम्हाला वेळ आहे, पण आता महाराष्ट्रात निवडणुकीचे निकाल लागून अर्धा महिना झाल्यावरही तुम्हाला हा पेचप्रसंग सोडवायला मुंबईत यावेसे वाटत नाही. हा खोटेपणा झाला. आधी तुम्ही शब्द दिला होता, असे उद्धव म्हणत असतील तर मग खरेखोटेपणा करायला तुम्ही यायला पाहिजे. आता गप्प का? हेच आत एक आणि बाहेर एक असे खोटेपणाचे प्रयोग आहेत, असेच दिसून येते… उद्धव यांनी शहा आणि फडणवीस यांच्याशी आपले राज्यात कसे बोलणे झाले होते आणि या दोघांनी आपल्याला कसे आश्वासित केले होते ते सांगून झाले आहे.

शिवसेनेला शब्द द्यायला स्वतः शहा मातोश्रीवर आले होते. उद्धव दिल्लीला गेले नव्हते. याला फडणवीस साक्षी आहेत. फडणवीस खरे असतील तर त्यांनी शहा यांना बोलावून खरेखोटेपणा करायला हवा आणि मग शहा यांनी एकदा जाहीर केले की आम्ही महाराष्ट्रात शिवसेनेला सत्तेचा समान वाटा देणार, असे सांगितले की मग भाजप आणि शिवसेना दोघेही युती तोडायला मोकळे होतील. पण, भाजप ते करायला तयार नाहीत आणि शिवसेना युती मोडली म्हणून जनतेला सांगणार नाही. कारण दोघांनाही युती तोडल्याचे पाप घेऊन पुढे जनतेच्या दरबारात जायचे नाही. त्यापेक्षा आणखी काही दिवस सुरू राहणारा सत्तेचा बाजार रंगवून मग सत्ता स्थापनेचा दावा करायचा आहे.

हाताच्या बोटावर मोजता येणारे आमदार आणि खासदार असताना भाजप देशभर भाजप मान खाली घालून होता. नव्वदीच्या दशकांत आपण सत्तेत येऊ शकतो, असा विश्वास या पक्षाला झाला आणि त्यांनी प्रादेशिक पक्षांना जवळ करण्यास सुरुवात केली. यात अर्थातच राज्यांपेक्षा केंद्रात भाजपची सत्ता यावी हेच लक्ष्य होते. मुख्य म्हणजे अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखा विशाल हृदयाचा मोठा माणूस त्यांच्याकडे होता. लालकृष्ण अडवाणी सोबत होते. अडवाणी यांचे हिंदुत्व आक्रमक असले तरी समाजवादी, डावे आणि उजवे या सर्वांना एकत्र घेऊन जातील, असे डोळे मिटून विश्वास ठेवावा असे वाजपेयी यांची साथ असल्याने प्रादेशिक पक्षांना कुटुंबातल्या सर्वात मोठ्या माणसासारखा आधार वाटत होता. या आधारानेच जॉर्ज फर्नांडिस नावाचे वादळ भाजपसोबत आले. समाजवाद्यांनी जॉर्ज हिंदुत्ववाद्यांच्या नादाला लागले म्हणून आकाश पाताळ एक केले.

पण, सत्तेने माजलेल्या काँग्रेसला जमिनीवर आणायचे असेल तर वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली आपण एक झाले पाहिजे, असा जॉर्ज यांचा मोठा विचार होता. देशाला काँग्रेसमुक्त सरकार देऊ शकतो, हा विचार प्रादेशिक पक्षांना एकत्र घेऊन भाजपच्या मनात सर्वात आधी पेरला तो जॉर्जने. राममनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांनीही तोच काँग्रेसमुक्त भारताचा प्रयोग करत जनता पक्षाचे राज्य देशात आणले होते… जॉर्ज नावाचा अवलिया आपले लक्ष्य पूर्ण करेल, असा विश्वास वाटल्याने वाजपेयी यांनी त्यांना एनडीएचे निमंत्रक केले आणि मग एका वादळाप्रमाणे देश पिंजून काढत जॉर्ज यांनी प्रादेशिक पक्षांना विश्वास दिला. यातून काँग्रेसमुक्त सरकारचा पाया रचला आणि त्यावर २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा कळस चढला. पण, आज पाया विसरून भाजप कळसाला भुलली आहे. यातूनच मग प्रादेशिक पक्षांना काय महत्व द्यायचे हा माज आला आहे.

मोदी लाट असतानाही आज दक्षिणेत एक जयललिताचा पक्ष सोडला तर भाजपच्या बरोबर कोणी मोठा पक्ष नाही. बिजू पटनायक आणि चंद्राबाबू नायडू यांनी वेगळी चूल मांडली आहे. मग बरोबर कोण आहेत तर शिवसेना, नितीश कुमार यांचा जनता दल संयुक्त आणि पंजाबमध्ये प्रकाश बादल यांचा पक्ष. हे तीन पक्ष आज कागदावर मोठे दिसत आहेत. पण, नितीश कुमार मनाने कधीच दूर गेले आहेत. त्यांनी भविष्यात बिहारमध्ये एकट्याने निवडणुकांना सामोरे जायची तयारी कधीच सुरू केली आहे. पंजाबमध्ये काँग्रेसने पुन्हा उभारी घेतल्याने बादल यांना पुन्हा आपले वर्चस्व दाखवण्यासाठी जीवाचे रान करावे लागेल. आता राहता राहिला पक्ष शिवसेना आणि तो मीच मुख्यमंत्री, अशा बढाईने भाजप वागत असेल तर ते आपले भविष्यात सत्ता राखण्याचे दरवाजे आपणहून बंद करत आहेत.

शिवसेना सर्वात जास्त त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी मारक ठरू शकते. २०२४ ला अजून खूप वेळ आहे, अशा भ्रमात भाजप राहणार असेल तर अशी मस्ती काँग्रेसनेही केली होती. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नावाखाली दहा वर्षे भ्रष्टाचारी कारभार करत देशात हैदोस घालणार्‍या काँग्रेसला दहा वर्षे जनतेने सत्तेबाहेर बसवले आहे, हे भाजपने विसरू नये. मैं खाऊंगा नही आणि खाने नही दूँगा…असे मोदी काल आणि आज म्हणत असले तरी लोकांच्या भाजी, भाकरी आणि निवार्‍याचा प्रश्न आहे. मुख्य म्हणजे ज्या नवमतदार युवा वर्गाला आकर्षित करून बहुमताचा आकडा गाठणार्‍या भाजपला त्यांच्या हाताला आधी काम द्यावे लागेल. आज भाजपकडून युवा वर्गाचा जो काही भ्रमनिरास झाला आहे, तीच निराशा कायम राहिली तर मोदी लाट भाजपला वाचवू शकणार नाहीत. मुख्य म्हणजे त्यावेळी कोणीच कमळ हाती घेणार नाही.

विधानसभा निवडणुकीच्या निकालाने शिवसेनेचे डोळे उघडले ते सुद्धा बरे झाले. भाजपने त्यांच्या बरोबर युती केली, पण ४० जागांवर शिवसेनेचे उमेदवार पडतील याची व्यवस्थित सोय केली होती. अन्यथा आज शिवसेना ८४ जागांच्या पार गेली असती. भाजपच्याही काही जागांवर शिवसेनेने मनापासून साथ दिली नाही, पण तो आकडा भाजपने विश्वास घात केलेल्या जागांपेक्षा खूप कमी आहे. भाजपच्या मागे किती फरफटत जायचे याचा मोठा धडा शिवसेनेला मिळाला हे एका अर्थाने बरे झाले. आता खरी शिवसेनेची कसोटी लागणार आहे.

यापुढे भाजपबरोबर जायचे नाही, असा पण घेऊन ते मैदानात उतरले तरच ते भविष्यात स्वतःला समर्थ करण्यासाठी झगडू शकतात. भाजप पुढे मुंबई, ठाणे अशी शिवसेनेची महापालिकेतील ताकद संपवण्याचा प्रयत्न करणार. याचा कसा मुकाबला करायचा हा विचार करून आता शिवसेनेने ग्रामीण भागात आपला जनाधार वाढवायला हवा. मातोश्रीचे दरबारी राजकारण करून शिवसेनेची ताकद वाढणार नाही, याची उद्धव आणि आदित्य या दोघांनीही खूणगाठ बांधून ठेवलेली बरी. आता खरे शिवसेनेपुढे आव्हान उभे राहिले आहे. भाजपच्या अजगरी महत्वाकांक्षेचे बळी होऊन स्वतःचे प्रादेशिक अस्तित्व संपवून टाकायचे की गरूड भरारी घेऊन स्वतंत्र अस्तित्व जपायचे. आता घोडा मैदान दूर नाही!