आयुर्वेदीय दृष्टिकोनातून अन्ननलिकेचा कॅन्सर !

Mumbai

भूक व तहान या नैसर्गिक भावना निर्माण झाल्यावरही बराच काळ उपाशी व तहानेलेले राहणे, रात्री उशिरापर्यंत जागणे या सवयीही अन्ननलिकेच्या कॅन्सरच्या अनेक रुग्णांत आढळल्या. मानसिक कारणांचा विचार करता चिंतातूर स्वभाव, काळजी करण्याचा स्वभाव, संतापी स्वभाव, दीर्घकालीन मानसिक ताण यांचाही परिणाम पचनावर होतो व कॅन्सरला कारणीभूत ठरतो.

मागील सदरात आपण मुख व गालाच्या कॅन्सरबाबत माहिती जाणून घेतली. आजच्या सदरात आपण अन्ननलिकेच्या कॅन्सरबाबत जाणून घेणार आहोत.अन्ननलिकेचा कॅन्सर हा जगभरातील विविध कॅन्सर प्रकारांपैकी आठव्या क्रमांकाचा कॅन्सर आहे. हा कॅन्सर भारतातील कॅन्सरने मृत्यू होणार्‍या कारणांपैकी चौथे महत्त्वाचे कारण आहे. अन्ननलिकेच्या कॅन्सरमध्ये होणारी लक्षणीय वाढ हा चिंतेचा विषय आहे. आधुनिक चिकित्सा करूनही, केवळ १९ टक्के रुग्णच ५ वर्षापेक्षा अधिक काळ जगू शकतात, असे सांख्यिकी शास्त्रावरून आढळले आहे. या प्रकारच्या कॅन्सरचे निदान बहुतांशी रुग्णांत उशिरा होत असल्याने आधुनिक चिकित्सा घेऊनही हा आजार दुर्धर होण्याची शक्यता अधिक असते.

इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट व रिसर्च सेंटर, वाघोलीच्या गेल्या अनेक वर्षातील निरीक्षणांनुसार अन्ननलिकेच्या कॅन्सरमध्ये आहारीय कारणांचा विचार करता वरचेवर व अधिक प्रमाणात-मिरची लोणचे इ. अतितिखट पदार्थांचे सेवन, पावभाजी, मिसळ इ. गरम, मसालेदार पदार्थांचे वारंवार व अधिक प्रमाणात सेवन, चहा, कॉफी इ. अति उष्ण पदार्थांचे अतिसेवन, मांसाहार अधिक प्रमाणात सेवन करणे, अतिप्रमाणात जेवणे ही कारणे आढळून आली. खारवलेले मासे-वेफर्स-फरसाण-लोणचे असे अधिक मीठ असलेले पदार्थ वारंवार व अधिक प्रमाणात सेवन करणे ही कारणेही अनेक रुग्णांत आढळली. याशिवाय भूक व तहान या नैसर्गिक भावना निर्माण झाल्यावरही बराच काळ उपाशी व तहानेलेले रहाणे, रात्री उशिरापर्यंत जागणे या सवयीही अन्ननलिकेच्या कॅन्सरच्या अनेक रुग्णांत आढळल्या. मानसिक कारणांचा विचार करता चिंतातूर स्वभाव, काळजी करण्याचा स्वभाव, संतापी स्वभाव, दीर्घकालीन मानसिक ताण यांचाही परिणाम पचनावर होतो व कॅन्सरला कारणीभूत ठरतो. अन्ननलिकेच्या कॅन्सरमध्ये दीर्घकाळ व अधिक प्रमाणात धूम्रपान व मद्यपानाची सवय, स्थौल्य, दीर्घकाळ अम्लपित्ताचा त्रास असणे ही कारणेही आढळून येतात.

घट्ट किंवा पातळ अन्न गिळण्यास त्रास होणे, अन्न गिळताना वरचेवर ठसका लागणे, अन्न उलटून पडणे, छातीत जळजळ होणे, आंबट ढेकर येणे, खोकला, आवाज बसणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे यासारखी लक्षणे अन्ननलिकेच्या कॅन्सरमध्ये दिसतात. बेरीयम स्वॅलो, एण्डोस्कोपी, बायॉप्सी, सी.टी. स्कॅन अशा तपासण्यांच्या मदतीने अन्ननलिकेच्या कॅन्सरची निदान निश्चिती होते.

आधुनिक वैद्यकशास्त्रात अन्ननलिकेच्या कॅन्सरसाठी शस्त्रकर्म, रेडिओथेरॅपी व केमोथेरॅपी या चिकित्सांचा अवलंब केला जातो. यात प्राधान्याने अन्न व पाणी गिळण्यास त्रास होत असल्याने शरीराचे पोषण व्यवस्थित होत नाही. तसेच अन्ननलिकेच्या कॅन्सरसाठी आधुनिक वैद्यकशास्त्रातील रेडिओथेरॅपी व केमोथेरॅपी चिकित्सा घेत असताना अन्नपचनाची क्रिया त्या काळापुरती अधिकच मंदावते. अशावेळी रुग्णाला भूक वाढविणारी (दीपन), पचन सुधारणारी (पाचक), वाताचे अनुलोमन करणारी, पित्ताचे शमन करणारी व बलवर्धन करणारी आयुर्वेदीय चिकित्सा उपयुक्त ठरते.

वैद्य स. प्र. सरदेशमुख
ए. व्ही. पी., पीएच्. डी. (आयुर्वेद)
संचालक, इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, वाघोली, पुणे