संपादकीय : चंद्रकांतदादांची कसोटी

Mumbai
chandrakant patil
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी विद्यमान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची निवड झाली. सोबतच राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मुंबई प्रदेश अध्यक्षपदाची धुरा मंगलप्रभात लोढा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. रावसाहेब दानवे – पाटील आणि आशिष शेलार यांची अनुक्रमे केंद्र व राज्यात मंत्रीपदी नियुक्ती झाल्याने नव्या पदाधिकार्‍यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. पैकी चंद्रकांत पाटील यांच्या नियुक्तीला विशेष महत्त्व यासाठी प्राप्त होते की तीन महिन्यांवर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेसोबत युती करून देदीप्यमान विजयश्री खेचून आणली होती. ही बाब लक्षात घेता शिवसेनेची विधानसभेतही गट्टी कायम राहिल्यास युतीला दोनशेहून अधिक जागा मिळवण्याचे आव्हान राहणार आहे. पाटील ते कसे पेलतात, याकडे लक्ष लागून राहणार आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रात त्रिशंकू अवस्था असूनदेखील भाजपने सरकार स्थापन केले. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हा ब्राह्मणी चेहरा बसवल्यानंतर राज्यातील बहुजन समाजाचे प्राबल्य पाहता प्रदेशाध्यक्ष म्हणून रावसाहेब दानवे यांची नियुक्ती झाली तर राज्य मंत्रिमंडळातील दुसर्‍या क्रमांकाचे मंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या नावाचा सार्वत्रिक गजर सुरू झाला. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या मातीमधले असलेल्या पाटील यांची पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या सोबतची जवळीक सर्वश्रुत आहे. भाजपमधील मवाळ, स्वच्छ व आश्वासक चेहरा अशी पाटील यांची ओळख आहे. स्वाभाविकच मुख्यमंत्री म्हणून फडणवीस काय बोलतात अथवा निर्णय घेतात याला जितके महत्त्व आहे, तेवढाच वजनदारपणा ‘दादा’ हे बिरूद मिरवणार्‍या चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. गिरणी कामगाराचा मुलगा अशी ओळख असलेल्या पायील यांच्या आयुष्याचा पूर्वार्ध संघर्षमय स्वरूपाचा राहिला आहे. अ.भा. विद्यार्थी परिषदेच्या चळवळीमार्गे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडल्या गेलेल्या पाटील यांनी राजकीय अस्तित्वाचा चढा आलेख अनुभवला तो स्वत:मधील नेतृत्वगुणांमुळे. भाजपसारख्या वेगळ्या विचारसरणीच्या पक्षामध्ये बहुजन समाजातील फार थोडे चेहरे पक्षाच्या बिनीच्या नेत्यांमध्ये गणले गेलेत. पाटील त्यापैकीच एक आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघात तब्बल दोनदा निवडून आलेल्या पाटील यांना देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात थेट कॅबिनेट दर्जा देण्यात आला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. मात्र, पाटील यांनी कर्तृत्वातून स्वत:ला सिध्द केले. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे प्रारंभी काँग्रेस आणि गेल्या काही वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसची मक्तेदारी म्हणून ओळखली जात होती. तिथे भाजपला प्रतिष्ठा देण्यासोबतच सत्तेची ऊब मिळवून देण्याचे श्रेय निर्विवादपणे चंद्रकांत पाटील यांना जाते. रावसाहेब दानवे आणि आशिष शेलार यांना भाजपच्या ‘एक व्यक्ती, एक पद’ या तत्वानुसार पदांवरून पायउतार व्हावे लागले. चंद्रकांत पाटील यांच्याबाबत मात्र या तत्वाला छेद देण्यात येऊन प्रदेशाध्यक्ष पदासोबतच त्यांचे मंत्रीपद शाबूत ठेवण्यात आले. यावरून पाटील यांचे पक्षातील महत्त्व अधोरेखित होते. आजवरचा पक्षाचा राज्यापुरता इतिहास बघता प्रदेशाध्यक्षपद संघ विचारसरणीशी बांधिल व्यक्तीलाच बहाल करण्याची परंपरा राहिली आहे. पाटील या निकषात बसत असतानाच बहुजन समाजातील चेहरा हा त्यांच्यासाठी जमेची बाब ठरली. आज भाजपचा गल्ली ते दिल्ली डंका वाजत असल्याने चंद्रकांत पाटील यांना संघटनात्मक मुद्यावर फारसा संघर्ष करण्याची वेळ नाही. दुसरी बाब म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक बाजू भक्कमपणे सांभाळून घेत असल्याने पक्षाचा सार्वत्रिक दबदबा वाढला आहे. याआधीचे रावसाहेब दानवे अनेकदा बेताल वक्तव्यामुळे अडचणीत आले होते. शिवाय, भाजपचा नैसर्गिक मित्र म्हणवणार्‍या शिवसेनेसोबत त्यांनी वारंवार पंगा घेतल्यामुळे त्यांचे ‘मातोश्री’ला नेहमीच वावडे राहिले. अमित शहा यांच्या अलीकडील मुंबई भेटीत उध्दव ठाकरे यांची भेट घेतेवेळी दानवे यांना जाणूनबुजून दूर ठेवण्यात आले, हे त्याचे बोलके उदाहरण होते. तुलनेत चंद्रकांत पाटील यांचे उध्दव आणि कंपनीसोबत चांगले सूर जुळतात. त्यांचा मवाळपणा सेना नेत्यांना भावत असल्याचे सांगण्यात येते. म्हणूनच पक्षांतर्गत सुसुत्रतेसोबतच युतीच्या घटक पक्षांना सांभाळून घेणारा नेता म्हणून पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदी नियुक्तीला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला असावा. काहीही असले तरी राजकारणाचा अनिश्चिततेचा हिंदोळा लक्षात घेता पाटील यांना दक्षतेचे राजकारण व तद्नुषंगिक निर्णय घेणे भाग पडणार आहे. भाजपचा अभ्युदय लक्षात घेऊन काँग्रेस आघाडी व अन्य पक्षांचे नेते रीघ लावून या पक्षात येत आहेत. अर्थात, भाजपने पक्षवाढीपोटी पावले उचलण्याचा निर्णय घेतला असल्याने नवगतांना मापदंडांच्या कसोटीवर फार पारखले जाण्याची शक्यता कमी आहे. तथापि, बड्या सत्रावरील नेत्यांना काहीतरी आश्वासने देऊन पक्षप्रवेश दिला जात असल्याने जुने व निष्ठावंत दुखावत असल्याची भावना उमटत आहे. पक्षात येणारी बहुसंख्य मंडळी स्वार्थापोटी येते आणि पद अथवा निवडणूक तिकीट पदरात पाडून घेत असल्याने निष्ठावंतांना ‘हेचि काय फळ मम तपाला?’ अशी पृच्छा करण्याची वेळ येऊ लागली आहे. महाराष्ट्रात जसजशी निवडणूक जवळ येईल, तसतसा आयारामांचा पक्षात राबता वाढत जाईल. राजकीय सोयीसाठी भाजपशी सोयरीक करणार्‍यांना पारखून घेण्याचे काम प्रदेशाध्यक्ष या नात्याने चंद्रकांत पाटील यांना करावे लागणार आहे. मंत्रीपदी असताना राजकीय ‘सेन्सेशन’ निर्माण करणार्‍या वक्तव्यांचा पाऊस पाडण्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबतच चंद्रकांत पाटील यांचे नाव घेतले जाते. महाजन व पाटील हे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांचे म्हणणे माध्यमांसह राजकीय क्षितीजावर गांभीर्याने घेणे क्रमप्राप्त ठरते. म्हणूनच अनेकदा मुख्यमंत्र्यांना सारवासारव करण्याची वेळ येते. ही परिस्थिती उद्भवणार नाही, याची पाटील यांना काळजी घ्यावी लागणार आहे. कारण राजकारणात अगतिकता अथवा उतावीळपणा अनेकदा अंगाशी येऊन स्वत:सोबतच पक्षाच्या विश्वासार्हतेला तडा जातो. हे सर्व टाळून पाटील यांना भाजपला मिळालेल्या वैभवात सातत्य राखण्याचे काम करावे लागणार आहे. कारण राजकारणाची नाव फार काळ स्थिरावू शकत नाही. लहान-मोठ्या कारणांनी हेलकावे बसणे स्वाभाविक असल्याने कप्तानाला संतुलित भूमिका घेणे क्रमप्राप्त ठरते. पाटील मवाळ विचारसरणीचे असले तरी मुख्यत्वे त्यांना पश्चिम महाराष्ट्रात विरोधकांशी दोन हात करायचे आहेत. लोकसभा निवडणुकीत बारामतीत सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्याची आण घेणार्‍या पाटील यांना ईप्सितप्राप्ती करता आली नसली तरी सुळे यांना विजयपथापर्यंत पोहचवताना शरद पवारांसह पक्षनेत्यांना किती घाम गाळावा लागला, हे अवघ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे. स्वाभाविकच चंद्रकांत पाटील यांना प्रत्येक निवडणुकीत खेचण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असणार आहे. पाटील हे जनतेतून निवडून येणारे आमदार नाहीत, अशी बोचरी टीका आजवर शरद पवार करीत आले आहेत. ती वस्तुस्थिती असली तरी पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा रथ निष्कंटकपणे पळवण्यात पाटील यांचेच नेतृत्व काम करते आहे, हे नाकारून चालणार नाही. विधानसभा निवडणुकीनंतर पाटील यांच्याकडे मंत्रीपद राहते की नाही हे आता सांगता येणार नाही. तथापि, प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे काही वर्षे तरी ती जबाबदारी राहणार असल्याने संघटनात्मक पातळीवर त्यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. भाजपच्या सत्तेचा पट मुख्यमंत्री या नात्याने यशस्वीपणे हाताळून देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:ला सिध्द केले असले तरी प्रदेशाध्यक्ष म्हणून संघटनात्मक पातळीवर चंद्रकांत पाटील यांची कसोटी लागणार आहे. कारण मोदी-शहा जोडगळीला कामातून स्वयंसिध्दता अपेक्षित असते. केवळ संघ व पक्षनिष्ठेसह बहुजन चेहरा म्हणून पाटील अधिक काळ पदावर टिकण्यापेक्षा स्वत:ला सिध्द करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर राहणार आहे.