घरफिचर्सअनेक चिनी माना मोडल्या !

अनेक चिनी माना मोडल्या !

Subscribe

गलवान प्रांतात चीन आणि भारताच्या सीमारेषेलगत काही किलोमीटरची ‘नो मेन्स लॅण्ड’ आहे. चीनने घुसखोरी केली ती या नो मेन्स लॅण्डमध्ये. त्याने भारताच्या प्रांतात घुसखोरी केली नाही. मात्र, यावेळी भारतीय सैनिकांनी त्यांची त्या नो मेन्स लॅण्डमध्येही घुसखोरी होऊ दिली नाही. आज चीन मागे गेला. त्याला कारण फक्त आणि फक्त भारतीय जवानांनी दाखवलेले शौर्य आहे. हे शौर्य इतके मोठे आहे की चिनी सैनिक त्या धक्क्यातून अजूनही सावरलेले नाहीत. दगड, काठी, रॉड यांच्या मदतीने हल्ला करणार्‍या अनेक चिनी सैनिकांच्या माना भारतीय जवानांनी मोडून टाकल्या आहेत, तो चीन आता पुन्हा आपली मान वर करण्याचे धाडस दाखवू शकणार नाही, हे नक्की.

चीनने गलवान प्रांतातून आपले सैन्य मागे घेतले आहे. रविवारी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनचे समकक्ष वांग यी यांच्यासोबत जवळपास दोन तास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. त्यानंतर चीनने सैनिक मागे घेण्याचा निर्णय घेतला. आता चीनची भाषाही बदलली आहे. चीन हा विकास आणि परस्पर सौहार्दाच्या बाता करू लागला आहे. अर्थात चीनवर पूर्ण विश्वास ठेवणे योग्य नाही आणि हे भारतीय मुत्सद्दींना चांगलेच ठाऊक आहे. गलवान प्रांतात भारतीय सैनिकांनी गाजवलेल्या शौर्यामुळे चीन पुरता हादरून गेला आहे. दुसर्‍या बाजूला तो जगात एकटा पडू लागला आहे. त्यामुळे चीन काही प्रमाणात वरमला असे म्हणता येईल, पण चीन म्हणजे भुसा भरलेला अक्राळ विक्राळ राक्षस आहे.

आपले लष्करी सामर्थ्य दाखवून फक्त इतरांना घाबरवायचे, पण प्रत्यक्ष लढाईत मात्र माघार घ्यायची ही चीनची वृत्ती. चीनच्या या आकाराला घाबरणारे गप्प बसतात. यावेळी भारतात चीनला दाणे टाकणारे सरकार नाही. त्यामुळे चीन आपल्या मार्गावर आला आहे. हा काही पहिलाच प्रसंग नाही. यापूर्वीही चीनने भारताविरोधात शेपूट घातली होती. १६ जून २०१७ रोजी चुम्बा खोर्‍यामध्ये भारत व चीनच्या सैनिकांमध्ये असाच राडा झाला होता. दोकलाम विभागातील दोकाला ते झोर्नपेरली येथील भूतानी कॅम्पपर्यंत भूतानच्या हद्दीमधून आपल्या ठाण्यापर्यंत रस्त्यासाठी खोदकाम करावयास आलेल्या चिनी सैनिकांना भारतीय जवानांनी मानवी साखळी करून रोखले. यानंतर चीनच्या परराष्ट्रखात्याकडून आणि त्याहीपेक्षा जास्त थयथयाट सरकारी चिनी माध्यमांमधून बघावयास मिळाला. या काळामध्ये चिनी सैनिकांना रोखण्यासाठी भारतीय जवानांनी एकही गोळीसुद्धा झाडली नाही आणि चिनी जवानांचीही तशी हिंमत झालेली नाही. या घटनेनंतर भूतान सरकारने चीनच्या राजदूताला आपल्या वकिलातीमध्ये पाचारण करून राजनैतिक मार्गाने इशारा दिला आहे.

- Advertisement -

मोदी यांच्या तत्कालीन अमेरिका दौर्‍याला गालबोट लावण्याइतकाच मर्यादित हेतू बाळगून चीनने हा आगाऊपणा 26 जूनच्या आसपास प्रसिद्धीस दिला असला तरी मुत्सद्देगिरीच्या लढाईमध्ये चीन कमी पडला असे उघडच दिसत होते. भारताला राग यावा पण नुसते ओरडण्यापलीकडे त्याला काही करता येऊ नये अशी बेचक्यामधली जागा चीनने निवडली होती. चीनने केलेली घुसखोरी नकाशावरती भूतानच्या हद्दीमधली होती. भूतान हा चीनच्या तुलनेमधला दुर्बल देश. असे झाले तर तो काय करणार? फार तर आरडा ओरडा करेल – भारताकडे विनवणी करेल मग भारत आपल्याला इशारा देऊन गप्प बसेल असे गणित होते. म्हणजेच हे चित्र उभे करायचे होते की भारतीय सीमा धोक्यामध्ये आहेत. भारताने जर जागतिक पातळीवरती चीनला राग येईल अशा पद्धतीने अमेरिका – जपान यांच्याशी हातमिळवणी करून दक्षिण चीन समुद्रामध्ये आपली कोंडी करण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांना हातभार लावला तर भारताची उत्तर सीमा शांत राहणार नाही असा इशारा चीन भारताला देऊ पाहत होता. शिवाय भूतान व तत्सम देशांना हा इशारा होता की भारताच्या नादी लागाल तर तुमचे नुकसान आहे. आम्ही आक्रमण केलेच तर तुमच्या मदतीला भारत येणार नाही. आशियामधली सुपर पॉवर म्हणून आवाज चीनचाच आहे हे दृश्य जगासमोर उभे करायचे होते, पण त्याकरिता खेळण्यात आलेली खेळी भारताने आज चीनवरच उलटवलेली आहे.

तीन आठवडे झाले तरी चीन सीमेवरती हात बांधून उभा होता. झालेच तर आपल्या सरकारी वर्तमानपत्रातून भुंकत होता. या सगळ्याला भारताने अजिबात दाद दिलेली नाही. परराष्ट्र खात्याने एक निवेदन तेवढे जारी केले, पण चीनची ‘समजूत’ काढण्यासाठी कोणतीही राजशिष्टाईची चाल झाली नाही की अन्य बलाढ्य देशांकडे चीनची तक्रार घेऊन भारत गेला असेही दिसले नाही. तेव्हा भारत कसा हतबल आहे आणि आपल्या सामर्थ्यापुढे झुकतो हे दाखवण्यासाठी केलेल्या नाटकाचा पुरता फज्जा उडाला आहे. अंगात दम असेल तर चीनने सामर्थ्य पणाला लावून रस्त्याचे काम सुरू ठेवायला हवे होते. प्रसंगी युद्ध पुकारून हे काम पुढे रेटायला हवे होते, पण प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही.

- Advertisement -

गेली काही वर्षे चीनने जागतिक पातळीवरती सर्वांना हेच आश्वासन दिले आहे की आपला उदय हा जगाच्या शांततेच्या आणि उन्नतीच्या आड येणारा नसून प्रगतीसाठी आहे. शी जिनपिंग यांच्या उदयानंतर चीनच्या धोरणामध्ये लक्षणीय बदल झाला असून 16 जून रोजी दोकलाम येथे रस्ता बांधण्यासाठी चीनने भूतानच्या हद्दीमध्ये केलेली घुसखोरी हे त्या बदलाचे उदाहरण आहे. या घुसखोरीनंतर भूतानकडून आपल्याला डिमार्ची मिळेल अशी चीनने अपेक्षा केली असली तरी या घुसखोरीविरोधामध्ये भारत दखल घेऊन आपल्या सैनिकांना अटकाव करेल हा चीनसाठी धक्का होता. प्रत्यक्षात काही आठवड्यांमध्ये रस्त्याचे काम पूर्ण करून मग ही घटना प्रसिद्धीस देण्याची तयारी होती, पण असे होऊ शकले नाही. त्यांनी कांगावखोरी करून चीन असे सांगत होता की भारताचे सैन्य मागे गेल्याशिवाय या विषयावरती आपण बोलणी करणार नाही. आपल्या आर्थिक आणि लष्करी उन्नतीला साजेसे असे आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करणारे वर्तन चीनने दाखवावे अशी अपेक्षा होती. अन्यथा त्यांच्याकडून दिल्या जाणार्‍या सर्वांसाठी लाभदायक आणि सामायिक उज्ज्वल भविष्याच्या बतावणीवरती विश्वास टाकता येणार नाही. त्यावेळी भारताने सैन्य तर मागे घेतले नाही, पण चीनलाच माघार घ्यावी लागली.

अशाप्रकारे चीन हा फक्त आवाज वाढवतो, पण प्रत्यक्षात शेपूट घालतो हे स्पष्ट झाले आहे. मोठे लष्कर हाती असले की युद्ध जिंकता येत नाही. त्या लष्करातील सैनिकांची लढण्याची इच्छा असावी लागते. आज चीनची ती कमजोरी आहे. गलवान प्रांतातून चीनने माघार घेतल्यानंतर भारतातील काहींनी चीनने माघार घेतली म्हणजे चीनने घुसखोरी केली, असा अर्थ लावून त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. त्यांना चीनने घुसखोरी केली, पण कुठे हेच माहीत नाही. गलवान प्रांतात चीन आणि भारताच्या सीमारेषेलगत काही किलोमीटरची ‘नो मेन्स लॅण्ड’ आहे. चीनने घुसखोरी केली ती या नो मेन्स लॅण्डमध्ये. त्याने भारताच्या प्रांतात घुसखोरी केली नाही. मात्र, यावेळी भारतीय सैनिकांनी त्यांची त्या नो मेन्स लॅण्डमध्येही घुसखोरी होऊ दिली नाही. आज चीन मागे गेला. त्याला कारण फक्त आणि फक्त भारतीय जवानांनी दाखवलेले शौर्य आहे. हे शौर्य इतके मोठे आहे की चिनी सैनिक त्या धक्क्यातून अजूनही सावरलेले नाहीत. दगड, काठी, रॉड यांच्या मदतीने हल्ला करणार्‍या अनेक चिनी सैनिकांच्या माना भारतीय जवानांनी मोडून टाकल्या आहेत, तो चीन आता पुन्हा आपली मान वर करण्याचे धाडस दाखवू शकणार नाही, हे नक्की.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -