अनावश्यक बँक खाती बंद करा !!

काही वेळा बँकांमध्ये तात्पुरत्या कारणांसाठी खाती उघडली जातात, ती नंतर मात्र तशीच चालू राहतात. उपयोग नसल्याने आपण त्याकडे चक्क दुर्लक्ष करतो, कालांतराने आपण विसरूनही जातो. अशा खात्यांबाबत बँक आपल्याला स्मरण-पत्रे पाठवते,आपण काही प्रतिसाद दिला नाही,तर रिझर्व्ह बँक नियमानुसार असे खाते ‘निद्रिस्त’ ठरवून त्यातील व्यवहार फ्रीज केले जातात.अशी लाखो खाती सर्वच बँकांकडे पडून आहेत आणि त्यातील जमा रक्कमही कोटींच्या घरात आहे. म्हणून आपण जागरूक राहिले पाहिजे व बदली-तात्पुरते कारण म्हणून काही खाती उघडली गेली असतील, तर ती लागलीच बंद केली पाहिजेत.

Mumbai

हल्ली अनेक बँकांमध्ये खाते ठेवण्याचा प्रघात आहे ! ऑफिसचा पगार जमा होण्यासाठी, गाडी किंवा गृह-कर्जाचे हप्ते भरण्यासाठी,घर बदलले म्हणून अशा काही कारणांसाठी नवे खाते एखाद्या नवीन बँकेत उघडले जाते. तसे करताना पूर्वीचे खाते अनेक कारणांनी दुर्लक्षित राहते. उदाहरणार्थ-वेळ मिळत नाही, सोयीचे नाही, सेवा चांगली नाही, बँकेबाबत भीती वाटल्याने ! तिथली मोठी रक्कम सध्या उघडलेल्या सोयीच्या बँकेच्या खात्यात आणली जाते किंवा अडीअडचणीसाठी राहुदे शिल्लक ! म्हणून तशीच पडून राहते! अशी लाखो खाती अनेक बँकांमध्ये ‘निद्रिस्त अवस्थेत’ आहेत, ती बंद करणे हे आपले कर्तव्य आहे, अन्यथा गैरवापर होऊ शकतो. यंदाच्या वर्षअखेरीस आपण स्वतःचे व इतरांचे असे खाते असल्यास बंद करण्याची प्रक्रिया सुरु करावी. म्हणजे पुढील आर्थिक वर्षात वापरात असलेल्या खात्याची जबाबदारी कमी होईल. हे सर्व का महत्वाचे आहे? हे आपण पाहणार आहोत.

बँका विस्तारल्या, बचतीसाठी अनेक योजना पुढे आल्या. जॉब बदलत राहणे अपरिहार्य होत गेले. मग नवीन जॉबचा पगार त्यांच्या बँकेमार्फत थेट जमा होणार म्हणून त्या बँकेत खाते ओपन करणे मस्ट झाले. पुढे करिअर आणि बेटर ऑप्शन म्हणून हातातला जॉब सोडून दुसरा जॉब धरणे हे आजकाल कॉमन झाले आहे. परिणामी नवीन ऑफिसातील पगार तिसर्‍याच बँकेकडून मिळणार म्हणून त्याबँकेत आणखीन एक खाते उघडणे जरुरीचे झाले. अशारीतीने गरज म्हणून एकापेक्षा अधिक खाती उघडली जातात.हा अनुभव बर्‍याच मंडळींचा आहे. पण हे इतके सहज आणि नकळत होते की, तितकेसे लक्षातही येत नाही. नोकरी हेच काही कारण नाही अनेकदा व्यवसाय-धंदा करणारेदेखील विविध हेतू किंवा सोयीचे व्हावे म्हणून एक खाते असले तरी दुसरीकडे किंवा तिसर्‍या बँकेत खाते उघडत आहेत. घरगुती कारणांनीदेखील एखादे जादा खाते उघडले जाते. मुलींच्याबाबतीत तर काय-लग्न झाल्यावर नवीन खाते किंवा संयुक्त खाते उघडावे लागते,अर्थात तसे करणे हे नक्कीच चांगले असते.

अधिक खात्यांचे दुष्परिणाम
अधिक बँक-खाती असण्याचे दुष्परिणाम- आपण सहजपणे अनेक खाती उघडतो, पूर्वी अशी खाती असली तर तितके त्रासदायक वाटायचे नाही, पण आता अशी खाती चालू ठेवणे -त्यात पैशाची सतत उलाढाल करणे हे अनेकदा सोयीचे नसते. आर्थिकदृष्टीने परवडणारेही नसते! नेमका काय त्रास होऊ शकतो ते आपण पाहूया.

1) किमान रकमेची अट- ही अट लय भारी असते. पूर्वी अशी अट नसल्याने खूप खाती असणे उपद्रवकारक नव्हते. पण आता प्रत्येक बँकेची किमान जमा रक्कम हे वेगवेगळी असते आणि कमी वापरातल्या खात्यातील जमा कमीकमी झाल्यास ‘किमान’च्या खाली जाण्याचा धोका असतो.त्याकडे दुर्लक्ष झाले,तर आपल्याला भूर्दंड पडतो.याचा फटका बसू नये, म्हणून आपण आपल्या मोबाईलमधला नको असलेल्या गोष्टी डिलीट करतो, त्याप्रमाणे वर्षाच्या शेवटी आपल्या बँक-खात्यांचा आढावा घेवून काही खाती सरळ बंद करावीत. म्हणजे न वापरली जाणारी खाती डोईजड होणार नाहीत.आणि व्याज-उत्पन्न कमाईऐवजी दंड भरत राहण्याची पाळी येणार नाही.

2) घोटाळे-भ्रष्टाचाराला निमंत्रण – अनेक खाती असल्यास आणि त्यांचा वापर क्वचितच होत असेल तर सांभाळा! कारण बँकेची संपूर्ण माहिती काढून फसवणूक करणारी टोळी अशी खाती हेरते व त्याद्वारे मोठी हेराफेरी केली जाते. कधी कधी कर्मचारी-शर्विलक ह्यांच्या संगनमताने अशी खाती गैर-व्यवहार करण्यासाठी वापरली जातात. म्हणून बिन-कामाचे खाते बंद करणे हेच आपल्या व बँकेच्या हिताचे असते.

3) निद्रिस्त खाती-बंदिस्त निधी- अनेकदा जी खाती तात्पुरत्या कारणांसाठी उघडली जातात, ती नंतर मात्र तशीच चालू राहतात. उपयोग नसल्याने आपण त्याकडे चक्क दुर्लक्ष करतो, कालांतराने आपण विसरूनही जातो. अशा खात्यांबाबत बँक आपल्याला स्मरण-पत्रे पाठवते,आपण काही प्रतिसाद दिला नाही,तर रिझर्व्ह बँक नियमानुसार असे खाते ‘निद्रिस्त’ ठरवून त्यातील व्यवहार फ्रीज केले जातात.अशी लाखो खाती सर्वच बँकांकडे पडून आहेत आणि त्यातील जमा रक्कमही कोटींच्या घरात आहे. म्हणून आपण जागरूक राहिले पाहिजे व बदली-तात्पुरते कारण म्हणून काही खाती उघडली गेली असतील, ती लागलीच बंद केली पाहिजेत. वापर नाही, तर उपयोगात नसलेली ‘निकामी’खाती ठेवायची का?

अशी हजारो खाती शेकडो बँकांमध्ये अडकलेली-बंदिस्त झालेली आहेत, असे कोट्यवधी रुपये अनुत्पादित स्वरुपात पडून आहेत! एकीकडे हजारो खाती असून बंद आणि लाखो देश-बांधव बँक खात्याविना ! असा हा विरोधाभास ! या समस्येवर काही उत्तर आहे का? बँका काही करतील की आपण आपल्याच पैशासाठी काही करू शकतो का? की ‘चलता है ! म्हणून दुर्लक्ष करायचे ? न वापरातील खात्याला सक्रीय करता येते का? याची माहिती आपण घेऊ या.

ठेवी मागण्यांकडे पडून
एरवी बँका कोणतेही खाते बंद करण्याचे सुचवू शकते, पण अप्रवर्तीला हात लावू शकत नाही. म्हणून अशी खाती बँकांच्या जमा-खर्चात-न केलेली खाती/ठेवी म्हणून दिसतात. बचत,चालू खाते आणि विविध मुदतीच्या ठेवी मागणी न केल्याने सर्वच बँकांकडे पडून आहेत. एखाद्या खात्यात अमुक काळ काहीच व्यवहार झाले नाहीत तर बँक तसे खाते ‘सुप्त’ म्हणून वेगळे काढते. साधारणपणे एक किंवा दोन वर्षाचा कालावधी गृहीत धरला जातो नंतर तसे खाते बँकेच्या नित्य व्यवहारातून बाजूला काढले जाते. गोठवले जाते व ते पुन्हा सक्रीय केल्याशिवाय त्यात काही रक्कम जमा-उणे होऊ शकत नाही ! पुढे काही कारणांनी त्याखात्यात काही क्रेडिट आले, तर ते जमा करणे हे अडचणीचे असायचे. याबाबत केंद्र व राज्य सरकारांनी रिझर्व बँकेचे लक्ष वेधून घेतले, त्यानंतर 2013 मध्ये असा नियम आला की अशी खाती बंदिस्त न करता, त्यांचे वेगळे वर्गीकरण केले जावे. याचा फायदा असा की खाते जरी सुप्त असले तरी त्यात सरकारी योजनेतील लाभार्थींना मिळणारी रक्कम, अनुदान, सबसिडी, विद्यार्थ्यांना मिळणारी स्कॉलरशिप तत्सम प्रकारातील रक्कम अशा खात्यात थेटपणे जमा होऊ शकते. ही एक सोयीची गोष्ट. एक म्हणजे लाभार्थींच्या खात्यात पैसे जमा होतात आणि दुसरे म्हणजे त्याकारणाने पुन्हा आपण आपले खाते वापरणे सुरु करावे अशी प्रेरणा ही खातेदाराला होऊ शकते.

निद्रिस्त खात्यातील पैसे ग्राहक-शिक्षणासाठी – खातेदाराने खाते वापरले जरी नाही, तरी बँकेला एकतर्फी काहीच करता येत नाही. कोणत्याहीक्षणी खातेदार बँकेत येवून आपले खाते पुन्हा ‘सक्रीय’ करू शकतो किंवा बंददेखील करू शकतो. संपूर्ण देशभरातील अशा बंद किंवा निद्रिस्त खात्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी अडकलेला आहे. कोणी, कधीही पैसे मागू शकतो आणि जबाबदारी म्हणून बँकेला ते द्यावेच लागणार. तरीही ते जर मागायला कोणी आले नाही, तर खाते गोठवले जाते. त्यातील रक्कम ही ‘अनुत्पादित’ म्हणून अडकून राहते. त्यावर तोडगा म्हणून दहा वर्षे न वापर केलेल्या बचत व ठेवी खात्यातील रक्कम आता शैक्षणिक निधी म्हणून उपयोगात आणायचे ठरवले आहे, हे ‘ग्राहक शिक्षण व जागरूकता’ 2014 निर्माण केलेला आहे.

बंद खात्यांची यादी
अशा बंद खात्यांची -खातेदारांची यादी बँकांनी शाखा आणि वेबसाईटच्या माध्यमातून प्रदर्शित केली जाते. आपण पूर्वी जिथे खाते होते आता त्यावर मार्ग काढणे गरजेचे आहे. आपण खातेदार आणि जबाबदार नागरिक म्हणून आपल्या आणि परिचितांच्या अशा खात्यांना पुन्हा ‘सक्रीय’करून आपले आजवर बचत केलेले पैसे परत घेण्याचा निर्धार करुया. जेणेकरून असंख्य बंद खाती पैसे काढून घेतल्याने कायमची बंद होतील किंवा पुन्हा सक्रीय होतील. बँका आणि सरकार यांच्यावर असलेले ‘बंद खात्यांच्या प्रशासकीय कामाचे आणि पैसे कधीतरी ग्राहकाला परत करायचे आहेत याची जबाबदारी किंचित तरी हलकी होईल.

सरकारने ते पैसे प्रशिक्षणासाठी वापरणे चांगले आहे, परंतु एखाद्याचे चुकून बंद राहिलेल्या खात्यातील पैसे जर अचानकपणे परत मिळाले तर किती आनंद होईल. असा कोणी वृद्ध किंवा वृद्धा असेल तर त्यांना त्यांचे पैसे परत मिळाले तर निश्चितच समाधान लाभेल. चला आपण जागरूक बँक-ग्राहक म्हणून इतरांना जुन्या खात्यांची आठवण करून देवूया. आणि यापुढे बँक खाती सक्रीय कशी राहतील ह्याची काळजी घेवूया.

म्हणावा तसा परिणाम नाही
आजवर बँका -रिझर्व बँक आणि सरकार यांनी काही उपाय केले, तरी म्हणावा तसा परिणाम दिसत नाही. डिसेंबर 2018 च्या आकडेवारीनुसार रु 32,000 कोटींपेक्षा अधिक रक्कम अशा सुप्त खात्यात अडकलेली आहे! आपल्या आणि इतरांच्या अशा बंद खात्यांबदल बोललो, कृती केली म्हणजे असे खाते एकतर कायमचे बंद केले किंवा पुन्हा सक्रीय केले तरच ही सुप्त खाती जागृत होतील,त्यासाठी कोणाच्या रिमाईंडरची वाट का पाहायची? आपणच आपल्या खात्याबाबत जागरूक होऊया ! करोनाच्या पार्श्वभूमीवर अशी काही आपली पेंडिंग कामे हातावेगळी करणे, हा एक सदुपयोगच आहे. आजवर आपले दुर्लक्ष झाले असेल,पण आता तरी असे वापरात नसलेले खाते बंद करू किंवा नियमितपणे अ‍ॅक्टीव्हेट करूया.

-राजीव जोशी -बँकिंग आणि अर्थ-अभ्यासक