घरफिचर्सहिमालयस्वारीसाठी तयार होताना..

हिमालयस्वारीसाठी तयार होताना..

Subscribe

देशात गिर्यारोहकांना आव्हान देणारे अनेक कडे, शिखरं आहेत. या शिखरांवर आरोहण करून जिगरबाज गिर्यारोहकांनी अतुल्य धाडसाचा प्रत्यय दिला आहे. पण देशभरातील इतर कोणतीही शिखरं सर केली तरी हिमालय पादाक्रांत करायची झिंग वेगळीच.

हिमालयचा उत्तुंग कडा गिर्यारोहकांना नेहमीच मोहात पाडत आला आहे. लहानशी टेकडी सर करणाऱ्या अनेक गिर्यारोहकांच्या मनात हिमालय काबीज करायचं स्वप्न तरळत असतं. तिथे आत्मिक शांतीचा अनुभव देणारं वातावरण असलं तरी रक्त गोठवणारी थंडीही आहे. क्षणाक्षणाला बदलणारं जीवघेणं वातावरण, बर्फाचे अजस्त्रकडे, आ वासून समोर उभ्या असलेल्या दऱ्या भीषण वाटत असलं तरी हिमालयाचं सौंदर्य विस्मयचकीत करणारं आहे.

हिमालयावर आरोहण करणारे नेहमी सांगतात की एकदा हिमालयात गिर्यारोहण करणारी व्यक्ती पुन्हा पुन्हा तिकडे जाण्यास प्रवृत्त होत असते. पण हिमालयही तितकाच जिद्दी आहे. आपल्यावर आरोहण करणाऱ्या गिर्यारोहकांना सहजासहजी शिखरापर्यंत पोहचू देत नाही. विलक्षण लहरी हवामान, बर्फाचे अजस्त्र कडे, आ वासलेल्या दऱ्या यासारख्या अडथळ्यांमधून मार्ग काढत शिखरावर पोहोचणंच मुळी दिव्य असतं. त्यामुळेच की काय, धाडस आजमावण्यासाठी गिर्यारोहकांची पावलं हिमालयाकडे वळतात. हिमालयाला गिर्यारोहकांचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. गिर्यारोहकाच्या आयुष्यात हिमालयाला अनन्यसाधारण महत्व आहे. हिमालय खूप चॅलेंजिंग आहे. उदाहरणादाखल सांगायचं, तर सह्याद्री पर्वतरांग म्हणजे गिर्यारोहण शिक्षणातील शालेय स्तर असेल तर हिमालय म्हणजे विद्यापीठ आहे! यावरून तुम्हाला हिमालयाची व्याप्ती लक्षात येईल.

- Advertisement -

भारताच्या वायव्येला भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरील प्रदेशातून हिमालयाची सुरवात होते. भारताच्या वायव्येकडून ईशान्येकडे हिमालय पसरला आहे. हिमालयाचा ईशान्येकडील शेवट म्यानमारमध्ये होतो. पाकिस्तान, भारत, नेपाळ, तिबेट, भूतान आणि म्यानमार अशा विविध देशांमध्ये ही पर्वतरांग पसरली आहे. भारतातील जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये हिमालयाचं अस्तित्व आहे. हिमालयाची एकूण लांबी २४०० किलोमीटर असून जगातील सर्वोच्च शिखर ‘माउंट एव्हरेस्टङ्क (८८४८ मीटर उंच) याच हिमालयामध्ये वसलं आहे. हिमालय पर्वतरांग तुलनेने तरुण पर्वतरांग आहे. टेक्टॉनिक प्लेट्सची युरेशियन प्लेट्सशी धडक झाल्याने हिमालय तयार झाला. प्लेट्सच्या धडकेदरम्यान समूद्रातून ही पर्वतरांग वर आली आहे. म्हणूनच समुद्रातील जीवाश्म ‘एव्हरेस्टच्या शिखरावर सापडले आहेत. अशी ही अथांग पर्वतरांग जगभरातील गिर्यारोहकांना नेहमीच खुणावत असते.

सर्व गिर्यारोहकांना आकर्षित करणाऱ्या हिमालयामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारे गिर्यारोहण करता येतं. एक म्हणजे अतिउंचीवरील ट्रेक्स (पदभ्रमण) तर दुसरं म्हणजे ‘पिकक्लायम्बिंग अथवा उंच पर्वतशिखरांवरील चढाई. पहिल्या प्रकारातील ट्रेक्समध्ये सोपे, मध्यम आणि कठीण अशा प्रकारच्या श्रेणी पडतात. हे ट्रेक्स करण्यासाठी शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती आवश्यक असते. अतिउंचीवरील ट्रेक्स म्हणजे पर्वत-शिखरांवरील ट्रेक्स करण्यासाठी आवश्यक असलेली पूर्वतयारी होय. पर्वत-शिखरांवरील चढाई तुलनात्मकदृष्ट्या अवघड असते. इथे मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीचा कस लागतो. पर्वत शिखरांवरील चढाईसाठी गिर्यारोहणाचं तंत्रशुध्द प्रशिक्षण आवश्यक असतं. त्याचसोबत हिमालय पर्वतरांगेत असणारी प्रचंड थंडी, उणे अंश सेल्सियस तापमान, अतिउंचीवर हवेमध्ये विरळ प्रमाणात असलेला प्राणवायू या सर्व प्रतिकूल परिस्थितीमुळे हिमालयातील गिर्यारोहणाचं गणित पावलोपावली बदलतं. अगदी छोट्यातील छोट्या बाबीची पूर्वतयारी केल्याशिवाय कोणताही गिर्यारोहक हिमालयात गिर्यारोहणासाठी जात नाही.
हिमालयात गिर्यारोहण करण्याचा उत्तम काळ हा एप्रिल ते जून व सप्टेंबर- ऑक्टोबर या महिन्यांमध्ये असतो. या काळात हिमालयातील हवा स्वच्छ व तुलनेने शांत समजली जाते. कायमच मोहक वाटणारा हिमालय अचानक रौद्र रूपसुद्धा धारण करतो. या हिमालयाच्या उत्पत्तीच्या कथा जेवढ्या रंजक आहेत तेवढीच रंजक इथली शिखरं, ठिकाणं, वन्यजीवन आणि माणसं आहेत. गिर्यारोहक म्हणून हिमालयाकडे बघताना काय आणि किती बघावं हे समजत नाही. याचा आवाका फार मोठा आहे. त्यामुळे हिमालयाबद्दल नुसतंच सांगून कधीच भागणार नाही. तो एकदा तरी प्रत्यक्ष अनुभवायला हवा. एकदा हिमालय अनुभवला की तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल.

- Advertisement -

पर्यावरण ऱ्हासाचा मुद्दा चर्चिला जात असताना हिमालयातील हिमनद्यांचा उल्लेख ओघानेच करावा लागेल. या नद्या भविष्यकाळात वितळतील, अशा बातम्या वरचेवर कानावर येतात. पण या नद्यांच्या आसपास गेलं तरी सर्व मिथकांचा विसर पडून आपण त्यांच्या सौंदर्यात हरवून जातो. हिमालयातील हिमनद्या सर्वार्थाने अलौकिक आहेत. यातील झंस्कार ही हिमनदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. हिवाळ्यामध्ये ही नदी संपूर्णपणे गोठते. त्यावर बर्फाचा जाड पापुद्रा तयार होतो. या काळात नदीवरून ट्रेक करता येतो. ‘चद्दर फ्रोझन रिव्हर ट्रेक हा साहसप्रेमी पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. हा ट्रेक करत असताना लांबवर बर्फाची चादर ओढलेलं नदीचं पात्र मन मोहून टाकतं. याशिवाय इतर सर्व हिमनद्यांच्या पात्रांमध्ये आढळणारं पाणी हे सर्वात शुद्ध असतं. सर्वसामान्य माणूस कोणतीही प्रक्रिया न करता हे पाणी पिऊ शकतो. या हिमनद्यांचे पुढील आविष्कार असणाऱ्या नद्या भारतातील उत्तरेकडील राज्यांच्या लोकांसाठी उपजीविकेचं साधन आहेत. या नद्या डोंगरदऱ्यातून वेगाने खाली वाहत येतात, त्यामुळे त्यावर करण्यात येणारं रिव्हर राफ्टींग खूप प्रसिद्ध आहे. हिमालय आणि त्यातील हिमनद्या कोट्यवधी लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत.

गिर्यारोहक म्हणून जेव्हा जेव्हा हिमनद्यांशी संपर्क येतो, तेव्हा तेव्हा त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन कृतज्ञ होणं आवश्यक भासतं. हिमालय जसा ट्रेकर्सचा आहे, त्याचप्रमाणे भाविकांचाही आहे. धार्मिकदृष्ट्या गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ ही हिमालयातील चारही ठिकाणं महत्त्वाची आहेत. यमुनोत्रीला यमुनेचा तर गंगोत्रीला गंगेचा उगम होतो. बद्रीनाथाला बद्रीनाथाचं भव्य आणि सुंदर देऊळ आणि केदारनाथला प्रत्यक्ष शंकराची पाठ आहे. हरिद्वारची गंगा अतिशय सुंदर आहे. तिला प्रचंड वेग आहे आणि नेहमीचे घाट सोडले तर तिचं पाणी खरंच स्वच्छ आहे. गंगेच्या पाण्याला ओढ असल्यामुळे तिथे घाटाच्या बाजूने पाण्यामध्ये दणकट लोखंडी साखळ्या बांधल्या आहेत.

यमुनोत्रीला यमुनेचा उगम आहे. इथे गरम पाण्याची कुंडं आहेत. गंधकयुक्त असल्यामुळे हे पाणी औषधी असतं. या पाण्यात आंघोळ करण्याची सोय असते. मात्र पाच मिनिटांपेक्षा जास्त काळ त्या पाण्यात राहिलं तर अतिउंची, कडाक्याची थंडी आणि उग्र गंधकाचा वास यामुळे चक्कर यायचा संभव असतो. त्यामुळे या पाण्यात जपूनच उतरावं लागतं. हिमालयाच्या कुशीत अनेक छोटी छोटी गावंही वसली आहेत. दर दिवशी नव्या धाटणीच्या हवामानाचा सामना करत या ठिकाणी सुखाने नांदायला वाघाचं काळीज लागतं. हनुमानचेट्टी हे हिमालयातील दरीत वसलेलं छोटंसं गाव आहे. इथे वीजेची, पाण्याची फारशी चांगली व्यवस्था नाही. कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्याकडची सगळी पांघरुणं कुचकामी ठरतात. रात्री झोपताना प्रत्येकाला कानटोपी, पायमोजे, स्वेटर, हातमोजे घालून आणि तिकडची स्पेशल रजई अंगावर घेऊनच झोपावं लागतं. इथे हिमालयातल्या थंडीची पहिली जाणीव होते. सकाळी उठून यमुनोत्रीला जाण्यासाठी आपण तयार होतो. यमुनोत्री ते हनुमानचेट्टी हे अंतर १० किलोमीटर आहे. तिथे जाण्यासाठी ‘दंडी (दोन माणसांनी एका माणसाची उचलेली पालखी), कंडी (एका माणसाने दुसऱ्याला आपल्या पाठीवरच्या खुर्चीत पाठुंगळी घेऊन जायचं.) तसंच घोडा मिळतो. जाण्याचा रस्ता दगडगोट्यांनी भरलेला असल्यामुळे घोड्यावर बसून अंग चांगलंच अवघडून जातं. अर्थात यापैकी काहीही न करता आपल्या पायांवर भिस्त ठेवून चालत जाऊन येणारे भाविक आणि पर्यटक कमी नसतात. हिमालय आणि हिमनद्यांच्या आसपासच्या एकूणच वातावरणाला दैवी स्पर्श असल्याची जाणीव पदोपदी होत असते.


– अक्षय साठ्ये, गिर्यारोहक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -