देवेंद्र-उद्धव यांचा ‘गोल्डन शेकहॅण्ड’!

Mumbai
Uddhav Thackeray Devendra Fadnavis
उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस

दिल्लीत नरेंद्र, राज्यात देवेंद्र असं घोषवाक्य घेऊन चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपचा आणि साहजिकच देवेंद्र फडणवीस यांचा निकालानंतर हिरमोड झाला आहे. ‘अबकी बार २२० पार’ अशा लोकप्रिय कॅचलाईनने निवडणूक लढविणार्‍या भाजपला जागांच्या शतकावरच झेलबाद व्हावं लागलं आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या आड येणारेच नव्हे, तर आसपास दिसणारे नेतेही घरी बसवलेत. तर काहींना प्रत्यक्ष लढाईत धारातीर्थी पाडलंय. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबईत येऊन निवडणुकीनंतर देवेंद्र “फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री” होतील असं जाहीर करून टाकलं. त्यामुळे संपूर्ण निवडणूक ही मुख्यमंत्र्यांना केंद्रबिंदू ठेवूनच लढवली गेली. इतकंच नव्हे तर सगळ्या प्रचाराचा चेहरामोहरा फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसच होता. फडणवीसांच्या ‘बिग बॉस’ असण्याला आव्हान देणार्‍या पाच नेत्यांना उमेदवार यादीतून अर्धचंद्र देण्यात आला.

त्यामध्ये मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पाहणार्‍या विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांचा सफाया करण्यात आला तर ‘मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री’ असं म्हणणार्‍या पंकजा मुंडे यांना त्यांच्याच सख्ख्या चुलत भावाकडून पराभवाची चव चाखावी लागली. ज्या स्वरूपाचे निकाल आलेले आहेत ते पाहता हे महायुतीचं निर्भेळ यश नाही आणि मुख्यमंत्र्यांचं तर नाहीच नाही. कारण ८ मंत्र्यांना मतदारांनी घरी पाठवले. त्यामुळे पाच वर्षांत स्पष्ट बहुमत नसताना सत्ता राबवणार्‍या देवेंद्र यांच्या महायुतीची सरशी झाली असली तरी पुन्हा मुख्यमंत्री होऊन निर्धोक पद्धतीने राज्य चालवणं आता फडणवीसांसाठी तितकं सोपं राहिलेलं नाही. या निवडणुकीसाठी प्रचाराची दिशा, दिल्लीतले प्रचाराला येणारे नेते आणि उमेदवार या सगळ्यांवर मुख्यमंत्री फडणवीस यांचीच मोहोर दिसून येत होती.

दिल्लीश्वरांच्या पुण्याईवर सत्ता मिळाली तर मोदी-शहा यांना त्याचे श्रेय तर जाईलच; पण त्यांच्या हातचं बाहुलंही व्हावं लागेल याची भीतीही फडणवीस यांना वाटत होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर युती करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला होता. अर्थात हा निर्णय भाजपच्या काही नेत्यांना आणि अमित शहा यांनाही आवडलेला नव्हता. भाजपने स्वतंत्र लढावं असा धोशा भाजपच्या नेतृत्वाकडून सुरू होता तो काहीसा बरोबर होता का, असं म्हणण्याची वेळ मुख्यमंत्री आणि त्यांच्या थिंक टँकवर येऊन ठेपली आहे. मागच्या वेळेस भाजपने स्वतंत्रपणे २६० जागा लढवल्या होत्या आणि त्यापैकी १२२ जागा जिंकल्या होत्या. या खेपेस १६४ जागा भाजपने युतीत लढवलेल्या आहेत आणि त्यांना शंभरच्या आसपास जागा जिंकता आल्या आहेत तरी शिवसेना ही आता सत्तेसाठी महायुतीची अपरिहार्यता ठरली आहे, ही गोष्ट खचितच दिल्लीश्वरांना आवडणारी नाही. त्यामुळे या निवडणुकीनंतर ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ असं म्हणणार्‍या फडणवीस यांचा सत्तेच्या बाजारातला सेन्सेक्स पाडणारा हा निकाल आहे. मात्र त्याच वेळी देवेंद्र यांना आव्हान देणारा एकही नेता पक्षात आता तरी दिसत नाही अर्थात अपवाद चंद्रकांत पाटील यांचा आहे. ते मराठा आहेत, अमित शहा यांचे खास आहेत.

त्यांच्यावर भाजपचे संस्कार आहेत, मात्र ते होमपीचवरून विजयी होण्यापेक्षा त्यांनी सुरक्षित कोथरूडचा केलेला विचार हा त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत उतरण्याच्या आड येऊ शकतो. तर दुसरीकडे निवडणुकीआधीपासूनच देवेंद्र-उद्धव यांनी एकमेकांशी जो ‘गोल्डन शेकहॅण्ड’ केलेला आहे तो पाहता फडणवीसांच्या मुख्यमंत्री होण्याला धोका होऊ शकत नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचाही विचार केला तरी फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास भाजपला विरोधकांचा असणारा धोका हा आपल्या चाणक्य नीतीने नागपुरी फडणवीस नियंत्रणात ठेवतील असं पाच वर्षांच्या अनुभवावरून दिसते. त्यामुळेच ‘अब की बार २२० पार’ अशी स्वप्नं पाहणार्‍या महायुतीला फडणवीस यांच्याशिवाय पर्यायांचा विचार करता येऊ नये, अशी स्थिती मतदारांनी केली आहे. त्यामुळे सत्ता तर महायुतीचीच राहिल आणि सत्तेची सूत्रेही पुन्हा माझ्याकडेच येतील असे सांगणार्‍या फडणवीसांच्याच हाती राहिली आहेत. मात्र ‘मातोश्री’च्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नाही.