घरफिचर्समाणूस भाषा संपवण्याच्या तयारीत!

माणूस भाषा संपवण्याच्या तयारीत!

Subscribe

शब्द संपले की विश्व संपेल. विश्वातील सर्वच प्रकारच्या संपत्तीचा नायनाट करण्याची माणसाची गती प्रचंड आहे. भाषाही यापैकीच एक आहे. सगळे मिळून आपण माणसाने निर्माण केलेली गेल्या सत्तर हजार वर्षांची परंपरा असलेली भाषा संपवण्याच्या तयारीत आहोत. माणसाची नायनाट करण्याची गती पाहता, एकतर भाषा संपूर्ण संपेल किंवा तिच्यामध्ये मोठे बदल होतील किंवा नवी निर्मिती होईल.

शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर हे मराठी शिक्षकांचे कोल्हापुरातील कृतीशील संघटन आहे. मराठी भाषा, तिच्या बोली, मराठीचा अभ्यासक्रम, विविध विषयांची चर्चासत्रे, कार्यशाळा आणि स्वत:ची त्रैमासिक संशोधन पत्रिका असे या संस्थेचे कार्य. या संस्थेला यावर्षी दहा वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने रविवार दि. २४ जूनला महावीर महाविद्यालय, कोल्हापूर येथे दशकपूर्तीनिमित्त आपली भाषा, आपली संस्कृती हे मराठी भाषा आणि तिच्या बोलींविषयीचे चर्चासत्र संपन्न झाले. बहुसांस्कृतिक व्यवस्था हे आपले समाजवास्तव आहे. येथील भाषा आणि संस्कृतींची निर्मिती त्यातूनच झालेली आहे. येथील समृद्ध निसर्ग, वैविध्यपूर्ण भूगोल, त्यातून आकारलेली प्रदेशविशिष्ट संस्कृती, व्यवसाय, भाषा याविषयी झालेले विविधांगी विचारमंथन हे या चर्चासत्राचे यश होय.

- Advertisement -

जन्मताच आपले समाजीकरण ज्या भाषेतून सुरू होते, ती आपली भाषा. तिलाच आपण आपली मातृभाषा म्हणतो. कोकणी,मालवणी, गोवानी, खानदेशी, अहिराणी, तावडी, वऱ्हाडी, चंदगडी, कोल्हापुरी, सोलापुरी, पुणेरी या प्रदेशविशिष्ट आणि वेगवेगळ्या जाती, जमातींच्या भाषा, व्यावसायिकांच्या भाषा या सर्वांनी, सर्व व्यवस्थांनी मिळून मराठी बनते. पण या प्रदेशविशिष्ट बोलींचा गंभीरपणे विचार केला पाहिजे हे येथील चर्चेतून अधोरेखित केले गेले. डॉ. गणेश देवी यांचे सूत्रभाष्य हे येथील चर्चेचे फलित म्हणावे लागेल. त्यांनी आपल्या मनोगतात शास्त्रीय संशोधन, जगभरातील भाषातज्ज्ञ, संशोधक यांच्या संशोधनाचा आधार घेत जगातील भाषिक समस्येवर गंभीर भाष्य केले. ते म्हणाले, शब्द हे माणसाने शोधून काढलेले महत्त्वाचे आयुध आहे. हे आयुध शोधून काढायला माणसाला दोन लाख तीस हजार वर्षे परिश्रम करायला लागले आहेत. माणूस ज्ञानेंद्रियाच्या पलीकडील वस्तू शब्दांच्याद्वारे पकडतो. डोळ्याआडची घटना शब्दांच्या माध्यमातून व्यक्त करू शकतो. म्हणून शब्द संपले की विश्व संपेल. विश्वातील सर्वच प्रकारच्या संपत्तीचा नायनाट करण्याची माणसाची गती प्रचंड आहे. भाषाही यापैकीच एक आहे. सगळे मिळून आपण माणसाने निर्माण केलेली गेल्या सत्तर हजार वर्षांची परंपरा असलेली भाषा संपवण्याच्या तयारीत आहोत. माणसाची नायनाट करण्याची गती पाहता, एकतर भाषा संपूर्ण संपेल किंवा तिच्यामध्ये मोठे बदल होतील किंवा नवी निर्मिती होईल.

आज मानवी मेंदूला भाषेचा कंटाळा आला आहे. याविषयी बरेच संशोधन झाले आहे. अशाप्रकारे भाषेचा कंटाळा करणाऱ्या मुलांना डिस्लेशिया झालेला असतो. ही डिस्लेशिया झालेली मुलं बौद्धिकदृष्ट्या सुमारे शंभर वर्षे पुढे आहेत. ही घटना विचित्र वाटते परंतु, हे सत्य आहे. कदाचित माणूस भाषेच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करीत असावा. पण या प्रक्रियेत माणसाने निर्माण केलेली आणि सत्तर हजार वर्षांची परंपरा असलेली शब्दांची भाषा, तिची संरचना नष्ट होतेय. उदाहरणार्थ, भूतकाळ. अनेक भाषांमध्ये सहासात प्रकारे भूतकाळी वाक्य करण्याची क्षमता होती. परंतु दिवसेंदिवस भूतकाळवाचक वाक्य घडवण्याची क्षमता भाषा हरवत चालल्या आहेत. काळ हा भाषेतील महत्त्वाचा दागिणा आहे. या दागिण्याच्या आधारेच माणसाने स्मृती नावाची गोष्ट निर्माण केली आहे. वेळ ही गोष्ट खरोखरच आहे का? तर नाही. ही माणसाची निर्मिती आहे. या गोष्टीलाच माणूस धक्का लावतो आहे. भूतकाळाला धक्का लावून स्मृती नावाच्या संस्कृतीवर माणूस बुलडोझर चालवायला निघाला आहे.

- Advertisement -

भाषांच्या मुळाशी बोली असते. मराठीच्या मुळाशीही बोली आहेत. या स्थिती बोलींचे काय करायचे हा महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर आहे. आपली स्मृतीपरंपरा पुढे घेऊन जायची असेल तर बोलींची काळजी घेतली पाहिजे. अनेक बोलींपैकी एक बोली प्रमाण भाषा होते. एखाद्या बोलीभाषेच्या प्रमाणिकरण करण्याच्या प्रक्रियेत बोलींचे मोठे नुकसान होते. यासाठी बोलींचा थ्री डायमेंशन अभ्यास केला पाहिजे. या देशातील हजारो वर्षांच्या परंपरा, श्रद्धा आणि ज्ञानाचे संचित भाषेतूनच आपल्यापर्यंत आलेले आहे. आपल्या देशातील शेकडो भाषा, येथील वैविध्यपूर्ण समाज, त्यांचे रीतीरिवाज आणि त्यांच्या त्यांच्या भाषांमधून चालत आलेला सांस्कृतिक ठेवा हा आपला अपरिमित आणि समृद्ध वारसा आहे. परंतु, हा वारसा आपण नजिकच्या काही वर्षांमध्ये हरवून बसणार की काय? अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या अनुषंगाने रफिक सुरज यांनी दख्खणी बोली, नंदकुमार मोरे यांनी चंदगडी बोली, विनोद राठोड यांनी बंजारा बोली, नीला जोशी यांनी कोरवी बोली, मोहन लोंढे यांनी मांगबोली, अंनता कस्तुरे यांनी हेड्यांची भाषा या विषयी मांडणी केली.

यानंतर कादंबरीकार प्रसाद कुमठेकर यांनी उदगीरी बोलीचा आणि तेथील संस्कृतीचा उदगीरी शैलीतच परिचय करून दिला. त्यांना उदगीरीत ऐकणे हा अपूर्व असा अनुभव होता. तर डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी झाडीपट्टीतील बोलीभाषा आणि तेथील संस्कृतीचा विस्ताराने परिचय करून दिला. त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मनोगतातून साक्षात झाडीपट्टी डोळ्यासमोर उभी केली. एकूणच या चर्चासत्रात मराठी भाषा आणि तिच्या बोलींच्या अस्तित्वासंदर्भात केलेले चिंतन अभ्यासकांसाठी नवी वाट आहे.


– डॉ. नंदकुमार मोरे
मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -