मुंबईकरांनो पावसाळ्यात घ्या आरोग्याची काळजी

पावसामध्ये काही ठिकाणी साठलेल्या घाणीच्या पाण्यातून नागरिकांना ये-जा करावी लागते. मात्र या पाण्यातून विशिष्ट आजार उद्भवण्याची शक्यता असते. पावसाळ्यात अनेक आजार होत शकतात. हे आजार टाळण्यासाठी डॉक्टरांनी सुचवलेले उपाय.

Mumbai
monsoon diseases
पावसाळी आजार

गेल्या चार दिवसांपासून सलग पाऊस सुरु आहे. सतत कोसळणार्‍या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून राहते. या साठलेल्या घाणीच्या पाण्यातून नागरिकांना आपली वाट काढावी लागते. मात्र या पाण्यातून विशिष्ट आजार उद्भवण्याची शक्यता असते. पावसाळ्यात अनेक आजार होत असल्याने प्रत्येकाने स्वत:चे आरोग्य स्वत:च जपलं पाहिजे. हे आजार टाळण्यासाठी प्रत्येकाने दक्षता घेणं आवश्यक आहे. थोडीशी काळजी घेतली तर आपण पावसाचा आनंद विनातक्रार लुटू शकतो.

पावसाळ्यात उद्धभणारे आजार 

पावसाळ्यात प्रामुख्याने सर्दी, खोकला, लेप्टोस्पायरोसिस, मलेरिया, हिपेटायसीस, कॉलरा, डायरिया असे एक ना अनेक आजार डोकं वर काढतात. या आजारांचा प्रसार कसा होतो खालिलप्रमाणे 

सर्दी खोकला

या आजाराचा प्रसार पावसाच्या पाण्यात भिजल्याने होतो. पावसात भिजलेले कपडे अधिक तास अंगावर ठेवल्याने सर्दी – खोकला होण्यास सुरुवात होते.

मलेरिया

हा संसर्गजन्य आजार पावसात प्रामुख्याने होतो. हा आजार कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला झाल्यास त्याचे जंतू पसरुन दुसर्‍या व्यक्तीला होण्याची शक्यता असते. या आजाराचा प्रसार साचलेल्या पाण्यातील अ‍ॅनोफेलस या डासामुळे होतो. या डासांची पैदास साचलेल्या डबक्यातून होते.

हिपेटायसीस

हा संसर्गजन्य आजार विषाणूंमुळे होतो. या आजाराचा प्रसार मुख्यत: पाणी, विष्ठा आणि दूषित झालेल्या अन्नातून होतो.

कॉलरा

हा आजार दूषित पाणी, अन्न आणि अस्वच्छता यातून पसरणारा आहे.
डायरिया : बाहेरील उघड्यावरच्या पदार्थांवर माशा आणि किडे बसलेले पदार्थ खाल्ल्याने हा आजार होतो. या आजारामध्ये पोट बिघडतं आणि जुलाब होतात. यामध्ये व्यक्तीला थकवादेखील येतो.

लेप्टोस्पायरोसिस

या रोगाचा प्रसार पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात होतो. या दिवसात सर्वत्र चिखल आणि पाण्याचे डबके तयार होते. यात लेप्टोचे जीवाणू तयार होतात. त्याचबरोबर उंदीर, गाय, म्हैस, घोडा, मांजर, कुत्रा या प्राण्यांच्या विष्ठेतून आणि मुत्रातून लेप्टोस्पायरोसिस रोगाचा प्रसार होतो. या प्राण्यांच्या मुत्रातून बाधित जीवाणू पाणी आणि मातीत बरेच दिवस टिकून राहतात. हे मातीत किंवा पाण्यात असलेले जीवाणू व्यक्तींच्या पायाला असलेल्या छिद्रातून शरीरात प्रवेश करतात आणि त्या व्यक्तीला लेप्टोस्पायरोसिस हा रोग होतो.
आजार आणि रोगाची लक्षणे

मलेरिया

हा आजार झाल्यास थंडी वाजून ताप येणे. अंग दुखणे. घाम येणे अशक्तपणा येणे अशी मलेरियाची लक्षणे आहेत.

हिपेटायटीस

या आजारामध्ये ताप येतो. तसेच डोळे आणि लघवी पिवळी होते. तर भूक मंदावते, अशक्तपणा येणे अशी हिपेटायटीसची लक्षणे आहेत.

कॉलरा

यामध्ये उलट्या आणि जुलाब मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन अशक्तपणा येतो.

डायरिया

या आजारामध्ये जुलाब होऊन थकवा येतो तर काही वेळा चक्कर देखील येते. त्याचप्रमाणे लघवीचा गडद पिवळा रंग दिसतो.

लेप्टोस्पायरोसिस

मलेरिया, डेंग्यू ताप या आजारांसारखीच लेप्टोस्पायरोसिसची लक्षणे आहेत. लेप्टोचा जीवाणू शरीरात गेल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी ताप येण्यास सुरुवात होते. तर कधी-कधी या आजाराची लक्षणे दिसून देखील येत नाही.

यावर प्रतिबंधात्मक उपाय

मलेरिया, डायरिया, हिपेटायटीस, कॉलरा आणि लेप्टेस्पायरोसिस या आजारांचा बचाव करण्यासाठी पावसाच्या पाण्यात जाऊ नये. पावसात भिजणे शक्यतो टाळावे. त्याचबरोबर पावसाच्या पाण्यातून बाहेरुन घरी आल्यावर साबणाने हातपाय स्वच्छ धुवावे. ओले कपडे बदलून कोरडे कपडे परिधान करावेत. तसेच एखाद्या वेळेस जखम झाली असल्यास प्रथम डेटॉलने स्वच्छ करुन घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करावा. बाहेरील उघड्यावरील पदार्थ खाणे टाळा. घरातील अन्नपदार्थ झाकून ठेवा. जास्त दिवस पाणी साठवून ठेवू नका.

काळजी कशी घ्यावी

पावसाळ्यात बाहेरील अन्नपदार्थ, ज्यूस खाणे टाळावे. त्याचबरोबर रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याकरता घरातील गरम अन्नपदार्थ, वरण – भात, पोळी – भाजी, फळे, सुका मेवा आदिंचे सेवन करावे. त्याचप्रमाणे पावसाच्या दिवसात शक्यतो कोळंबीसारखे मासे खाऊ नयेत.


– डॉ. सुधीर सामंत, बी.ए.एम.एस. (प्रभादेवी)