घरफिचर्समातृत्व की जीवाची बाजी

मातृत्व की जीवाची बाजी

Subscribe

राज्यात सर्वाधिक बालमृत्यू मुंबईत, या बातमीने सर्वत्र खळबळ उडवली आहे. सुसंपन्न, गर्भश्रीमंत आणि इतर शहरांच्या तुलनेत आधुनिक वैद्यकीय तंत्राने सुसज्ज असलेल्या मुंबापुरीत जन्मानंतर मृत्युमुखी पडणार्‍या नवजात बालकांची संख्या मुंबईकरांना अंतर्मुख करणारी आहे. राज्यात गेल्यावर्षी तब्बल १३ हजार ७० नवजात बालके दगावली. यात मुंबईतील बालमृत्यूचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे १ हजार ४०२ एवढे असल्याची धक्कादायक माहिती विधानसभेत लेखी स्वरूपात देण्यात आली. या बातमीने बालमृत्यूचा फक्त आकडाच समोर आणला नाही, तर त्यामागची कारणे दाखवून वैद्यकीय विश्वाबरोबरच पालकत्वाचे स्वप्न बघणार्‍या जोडप्यांना विचार करण्यास भाग पाडले आहे, पण ही समस्या मुंबईपुरतीच मर्यादित नसून देशातील अनेक शहरात व गावांमध्ये बालमृत्यू रोखण्यास सरकारला अपयश येत आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या लेखी माहितीनुसार एच.एम.आय.एस.च्या अहवालानुसार २०१८-१९ या वर्षात जन्मतःच अडीच किलोपेक्षा कमी वजन असलेली २ लाख ११ हजार बालके होती. यातील सर्वात कमी वजनाची २२ हजार १७९ बालके मुंबईत जन्माला आलेली होती. यादरम्यान, १३ हजार ७० बालके मृत्युमुखी पडली. यातील १४०२ नवजात बालके मुंबईतील होती. तसेच १ एप्रिल ते २०१९ ते १५ जानेवारी २०२० यादरम्यान मातामृत्यूही झाला असून १ हजाराहून अधिक माता मृत्युमुखी पडल्या आहेत. ही चिंतनीय बाब असून या बालमृत्यू व मातामृत्यूची प्रमुख कारणे ही वेगवेगळी आहेत. मातामृत्यूसाठी प्रसूती पूर्व उच्च रक्तदाब, अतिरक्तस्त्राव, जंतूदोष आणि रक्तक्षय ही कारणे कारणीभूत आहेत, तर बालमृत्यूसाठी अकाली जन्माला आलेले बाळ, जंतुससर्ग, न्युमोनिया, जन्मतः कमी वजन, सेप्सीस, श्वासरोध, आघात, रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम ही प्रमुख कारणे असल्याचे एच.एम.आय.एस.च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, बालमृत्यूचा हा आकडा राज्याबरोबरच मुंबईतील असल्याने चर्चेत आला, पण असे असले तरी देशासाठी बालमृत्यू व मातामृत्यू सारख्या घटना नवीन नाहीत. २०१५ साली तर जगातील इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक बालमृत्यू भारतात झाल्याचीही नोंद अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ या अमेरिकेतील संस्थेने केली होती. यासाठी भारतात २०००- २०१५ या कालावधीत पाच वर्षांखालील बालकांच्या मृत्यूच्या दराचा हवाला देण्यात आला होता. या अहवालानंतर खडबडून जागे झालेल्या भारत सरकारने बालक व माता आरोग्यविषयक अनेक योजना राबवल्या ज्या काही प्रमाणात यशस्वीही झाल्या. ज्यामुळे बालमृत्यूचा दर काही अंशी घटला. ज्याची नोंदही जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थने घेतली.

- Advertisement -

पण त्यानंतरही बालमृत्यूच्या दरात चढ उतार बघायला मिळाला. यासाठी प्रत्येक वेळी सरकारला जबाबदार धरणे चुकीचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. आजही सरकार त्याच्या परिने बालमृत्यू व मातामृत्यू रोखण्यासाठी शहरांपासून गावपातळीवर प्रयत्न करत आहे, पण देशभरात विशेष करून मुंबईसारख्या शहरांमध्ये नोकरीनिमित्त, रोजगारानिमित्त येणार्‍या महिला स्थलांतरांचे प्रमाण वाढत आहे. त्यातही या स्थलांतरितांमध्ये दारिद्य्र रेषेखालील व अशिक्षित महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. यातील अनेक महिला गर्भावस्थेत मुंबईत येतात. अशिक्षित असल्याने त्यातील अनेकजणींना त्यांच्यावर डॉक्टरांनी काय उपचार केले आहेत, कोणत्या गोळ्या घेण्याचा सल्ला दिला आहे. हे सांगता येत नाही. त्यामुळे बराचवेळ अर्धवट उपचार घेतल्याने बाळंतपणात अनेक गुंतागुत निर्माण होते.

तसेच गर्भावस्थेत किंवा दिवस भरेपर्यंत त्रासच होत नसल्याने या महिला नियमित तपासणीसाठीही रुग्णालयात येण्यास इच्छुक नसतात. दिवस भरल्यानंतर किंवा वेळेच्या आधीच प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर रुग्णालयात येतात. अशावेळी अनेक समस्या निर्माण होतात. कारण महिलेला किंवा बाळाला इतर काही वैद्यकीय समस्या आहेत का हे तपासण्याचा पुरेसा अवधीही डॉक्टरांना मिळत नाही. यामुळे अनेकवेळा नवजाताचा जन्माच्या वेळी मृत्यू होतो, तर काही घटनांमध्ये आई कुपोषित किंवा अ‍ॅनेमिक असल्याने तर कधी तिला काही आजार असल्याने गर्भातील बालकाची वाढ होत नाही. परिणामी वेळेच्या आधीच कमी वजनाचे बाळ जन्माला येते, पण अवयवांची वाढच न झाल्याने काही वेळातच ते दगावते.

- Advertisement -

यामुळे नीट अभ्यासले असता मुंबईतील बालमृत्यूंमध्ये स्थलांतरित व गरीब घरातील महिलांच्या बालकांचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट आहे. गर्भावस्थेत महिलेला आवश्यक असलेल्या नियमित तपासणी, औषधोपचार न घेतल्याने मातामृत्यूचा दरही वाढला आहे. महिलांची आरोग्यविषक हेळसांड ही यास कारणीभूत असल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे. कारण आज सरकारी रुग्णालयात बाळ बाळंतिणीसाठी सर्वप्रकारच्या आरोग्यसेवा उपलब्ध असल्या तरी त्यांचा लाभ किती महिला घेतात हा प्रश्न आहे.

तर दुसरीकडे मुंबईसारख्या शहरातील लाईफस्टाईलही यास कारणीभूत आहे. येथील बहुतेक महिला या नोकरदार असल्याने खाण्यापिण्याबरोबरच त्यांच्या दिनचर्येचे कुठलेही वेळापत्रक निश्चित नसते. त्या सतत तणावाखाली असतात. त्याचा थेट परिणाम गर्भावर होतो. प्रसूतीवेळी अशा महिलांचा रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. जेणेकरून महिलेच्या व बालकाच्या जीवास धोका निर्माण होतो. यामुळे गर्भावस्थेत महिलांनी नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक असल्याचा सल्ला स्त्रीतज्ज्ञ स्मिता भामरे यांनी दिला आहे. मुलाला जन्म देताना प्रत्येक स्त्रीचाही पुनर्जन्म होत असतो हे त्रिवार सत्य आहे. यामुळे त्या दुसर्‍या जीवाबरोबरच स्वतःची काळजी महिलांनी घेणे गरजेचे नाही तर अत्यावश्यक आहे. कारण त्यातूनच निर्मळ मातृत्वाबरोबरच ती सुदृढ बाळाची आई म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणार आहे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -