घरफिचर्समायमहानगर ब्लॉगचंदेरी (मुलाम्याची काळी) दुनिया !

चंदेरी (मुलाम्याची काळी) दुनिया !

Subscribe

१९९३ चे मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट अजूनही कुणी विसरले नसेल. फक्त मुंबईकरच नव्हे, महाराष्ट्रीयच नव्हे तर अख्खा देश त्या घटनेनं हादरला होता. त्या घटनेतील इतर आरोपी, त्यांचे गुन्हे, त्यांचे खटले, त्यांच्या शिक्षा हे सगळं प्रचंड तणाव निर्माण करणारं होतं. पण त्या सगळ्यात एक नाव सगळ्यांसाठीच धक्कादायक होतं. बॉलीवूड नावाच्या एका चमचमणार्‍या चंदेरी दुनियेतलं ते नाव होतं संजय दत्त. आपल्या आवडत्या कलाकारांवर जीवापाड प्रेम करणार्‍या, त्यांच्या अभिनयावर जीव ओवाळून टाकणार्‍या, त्यांच्यासाठी तास न् तास काय, तर दिवस दिवस तिष्ठत बसूनही जेव्हा ते येतील तेव्हा तोंडावर अपार हास्य आणून त्यांचं स्वागत करणार्‍या तमाम बॉलीवूडप्रेमी प्रेक्षकांसाठी तो मोठा धक्का होता. त्यांच्या विश्वासाला पहिला तडा गेला होता. पण त्यातल्या एकालाही किंवा खुद्द संजय दत्तलाही याची सुतराम कल्पना नव्हती की बॉलीवूडमधल्या काळ्याकुट्ट बाजूची लक्तरं वेशीवर टांगून त्याचे वाभाडे निघण्याची ती सुरुवात होती!

बॉलीवूड आणि अंडरवर्ल्ड यांचं ‘प्रेम’ सर्वश्रुत आहे. ७० च्या दशकात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम-मंदाकिनी जोडीपासून याची सुरुवात झाली. अनेक गँगस्टर्सला बॉलीवूडमधल्या अदाकारांनी भुरळ पाडली. पण त्यानंतर या लव्हस्टोरीमध्ये राजकारणानंही एंट्री घेतली आणि अंडरवर्ल्ड – बॉलीवूड – राजकारण असा लव्ह ट्रँगल रंगू लागला. बॉलीवूडमधून राजकारणात बरंच इनकमिंग झालं. अनेकांचे लागेबांधे, आर्थिक-सामाजिक-राजकीय हितसंबंध लोकांसमोर आले. पण तरीदेखील बॉलीवूडप्रती आपलं प्रेम प्रेक्षकांनी कमी होऊ दिलं नाही. झालं-गेलं गंगेला मिळालं असं म्हणत लोकांनी पुन्हा एकदा बॉलीवूडला डोक्यावर घेतलं. सलमान खान हिट अँड रन केस, काळवीट शिकार प्रकरण अशा प्रकरणांमध्ये बॉलीवूड बाहेरून दिसतं तितकं छानछकोर नाही, हे अनेकदा सिद्ध झालं. पण तरीसुद्धा प्रेक्षक गप्प राहिले.

पण मग बॉलीवूडमध्ये कास्टिंग काऊच प्रकरणं, मी टू प्रकरणं उघड्यावर पडली. तनुश्री दत्तानं जरी याची सुरुवात केली असली आणि तिच्या आरोपांचं अद्याप काय झालं हे जरी कळू शकलेलं नसलं, तरी त्यानंतर बॉलीवूडमधल्या गलिच्छ वृत्तींची किमान सोशल मीडियावर का होईना, मनसोक्त चिरफाड व्हायला लागली. असंख्य अभिनेत्रींनी बॉलीवूडमधल्या तथाकथित सेन्सिबल, सीनिअर, क्रिएटिव्ह, दर्जेदार अशा अनेकांवर आरोप लावले. हे सगळे किंवा यातले अनेक आरोप अद्याप कागदोपत्री सिद्ध होऊ शकलेले नाहीत. पण असं जरी असलं, तरी असं घडलं नाही किंवा घडत नाही असं कुणीही छातीठोकपणे म्हणू शकत नाही. ना आतले ना बाहेरचे! मग जे झालं त्याला अत्याचार म्हणायचं का? सहमतीने घडलेल्या गोष्टी म्हणायचं का? नाईलाजाने दिलेली संमती म्हणायचं का? ब्लॅकमेलिंगसाठी चालवलेला कट म्हणायचं का? या अशा चर्चांना काहीही अर्थ राहात नाही. यातलं काहीही किंवा हे सगळं असलं, तरी ‘हे घडतं’ याला कुणीही नाकारू शकत नाही.
बॉलीवूडच्या नैतिकतेबद्दल तसं पाहिलं तर कुणी बोलायचं काही कारण नाही. कारण मुळात नैतिकता हा सब्जेक्टिव्ह अर्थात व्यक्तीसापेक्ष प्रकार आहे. त्यामुळे कोण कुणासोबत कुठे कधी का आणि कशाला असले प्रश्न निरर्थक ठरतात. पण जेव्हा यातून गुन्हे घडायला लागतात, तेव्हा मात्र तो प्रशासन आणि समाज या दोघांच्या दृष्टीने चिंताजनक प्रकार ठरतो. बॉलीवूडमधल्या हत्या किंवा आत्महत्या हा त्यातलाच एक प्रकार!

- Advertisement -

या लॅविश, ग्लॅमरस आणि अकल्पित श्रीमंत जगाची गत बाहेरून अत्यंत आकर्षक दिसणार्‍या शोरूममध्ये मागच्या बाजूला प्रचंड मोठी अडगळीची खोली आणि त्यात असंख्य ‘न दाखवता येणार्‍या’ गोष्टींसारखी आहे. या अडगळीत सातत्याने भर पडत असते. कधीतरी या अडगळीतून चुकून एखादी गोष्ट त्याच्यासोबत बाहेर येते आणि अडगळीत काय काय असू शकतं याचं भीषण चित्र उभं राहातं. बॉलीवूडमध्ये हत्या आणि आत्महत्यांचा इतिहास पार परवीन बाबीच्या संशयास्पद मृत्यूपासून असला, तरी अलीकडच्या काळात अशी प्रकरणं वारंवार घडू लागली. पण तोपर्यंत बॉलीवूडच्या इतर वाईट-साईट सवयी लोकांनाही सवयीच्या झाल्या होत्या. मग बॉलीवूडमधला बेवड्यांचा नंगा नाच असो, आपल्याच चाहत्यांवर अरेरावी करणारी वृत्ती असो, नियम नुसतेच वाकवून नाही तर त्यांचं रॉकेट बनवून सोडण्याचा बेदरकारपणा असो किंवा कितीही काही केलं, तरी सेलिब्रिटी असल्यामुळे आपल्याला कुणी हात लावू शकणार नाही ही दाखवलेली मिजास असो. प्रेक्षकांनी सगळं सहन केलं. त्यामुळे बॉलीवूड विश्वात घडणार्‍या हत्या वा आत्महत्येच्या घटनांकडे गांभीर्याने कमी आणि गॉसिपिंगसाठी जास्त पाहिलं जाऊ लागलं. सगळाच सवयीचा मामला झाला होता.

पण हळूहळू राजकीय विश्वाला बॉलीवूडच्या मागे असणार्‍या प्रेक्षकांच्या प्रचंड मोठ्या व्होटबँकेचा साक्षात्कार झाला. या प्रेक्षकांच्या भावना बॉलीवूडशी, त्यांच्या आवडत्या नट किंवा नटीशी, गीतकार वा संगीतकाराशी, गायकाशी इतर कोणत्या नेत्यापेक्षाही जास्त घट्ट जोडलेल्या असतात. तशा त्या क्रिकेटर्ससोबत देखील जोडलेल्या असतात. पण क्रिकेटपेक्षा बॉलीवूडमध्ये ढवळाढवळ करणं तुलनेनं सोपं आहे. शिवाय क्रिकेटप्रमाणे बॉलीवूड काही देशभक्तीशी निगडित झालेला प्रकार नाही. त्यामुळे इथे कुणालाही कुठेही काहीही कसंही कधीही कितीही फिरवता येतं याची टिप आणि त्यापाठोपाठ अनेक अनुभव राजकीय विश्वाला येऊ लागले. यामुळे बॉलीवूडमध्ये घडणारे प्रकार देखील अस्मितेचे, लोकांच्या भावनांशी निगडित, लोकांच्या कुटुंबातले असल्यासारखे भासवले जाऊ लागले. जे करणं फार सोपं होतं. त्यामुळे लोकांना या घटना आपल्या वाटू लागल्या. त्याच आवेगाने, भावनेने, त्वेषाने या मुद्यांवर लोकं व्यक्त होऊ लागली आणि बॉलीवूडची गोची झाली! सुशांत सिंह राजपूत प्रकरणानं हेच घडलं.

- Advertisement -

आपण आजपर्यंत निस्सीम प्रेम करत असलेल्या, आपल्या जगण्याचा एक भाग मानत असलेल्या बॉलीवूडमध्ये होत असलेले हिडीस प्रकार बघून प्रेक्षक संतप्त होऊ लागले. व्यक्त होऊ लागले. निषेध करू लागले. मागण्या करू लागले. इतर कोणत्याही मुद्यापेक्षा लोकांना हे मुद्दे जास्त महत्त्वाचे वाटू लागले. कारण आता मुद्दा त्यांच्या भावनांचा होता. प्रेक्षकांचा ‘उदंड’ प्रतिसाद पाहता काही बॉलीवूडकरांनाही चेव सुटला. काही प्रसिद्धीच्या हव्यासापायी तर काही किमान आता तरी न्याय मिळेल या भावनेनं या सोहळ्यात उडी मारते झाले. कायम चमचमणार्‍या शोरूमच्या मागच्या अडगळीच्या खोलीतल्या असंख्य हिडीस गोष्टी बाहेर येऊ लागल्या. भयानक आरोप होऊ लागले. निर्लज्ज समर्थन होऊ लागलं. धूर्त चाली खेळल्या जाऊ लागल्या. राजकीय डावपेच आखले जाऊ लागले. या सगळ्यातून बॉलीवूड नावाच्या चंदेरी दुनियेची एक काळवंडलेली बाजू लोकांसमोर उघडी पडली!

सुशांत सिंह राजपूत प्रकरणातून बॉलीवूडमध्ये आत्तापर्यंत सुरू असलेला नशेडींचा आणि त्यांच्या पेडलर्सचा सुखेनैव संचार गडबडला. गोंधळला. अस्ताव्यस्त झाला. तथाकथित बॉलीवूड स्टार्सच्या प्रेक्षकांच्या मनातल्या प्रतिमांची चिरफाड झाली. अनेकांना धक्के बसले. अनेकजण अजूनही हे सगळं खोटं खोटं चालल्याचं म्हणत स्वत:चीच समजूत घालू लागले. पण काहींनी मात्र प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि काहींना साक्षात्कार झाला. बॉलीवूड सेलिब्रिटी प्रत्यक्ष व्यक्ती म्हणून फार थोड्या अगदी बोटांवर मोजण्याइतक्या लोकांना आवडतात. पण प्रेक्षक चाहते असतात त्यांच्या पडद्यावर दिसणार्‍या रूपाचे. त्याच रूपांमध्ये, भूमिकांमध्ये, अवतारामध्ये बॉलीवूडकर प्रेक्षकांना आवडत असतात. आणि त्या भूमिकांव्यतिरिक्त बॉलीवूडचं खरं रूप समोर आणणारी कोणतीही घटना, गुन्हा, वक्तव्य, कबुली ही प्रेक्षकांच्या मनातल्या त्या प्रतिमेची चिरफाड करणारी असते. सुशांतच्या मृत्यूनंतरच्या ३ महिन्यांमध्ये असंख्य गोष्टी घडल्या. अनेक आरोप-प्रत्यारोप-दावे-प्रतिदावे झाले. लोकांना भूमिकांच्या पलीकडचं बॉलीवूड दिसलं. म्हणून त्यावर जास्तच चवीने आणि आवेशाने चर्चा होऊ लागल्या. पण खरी गोम तर पुढेच आहे!

सध्या घडत असलेला ‘बॉलीवूड तमाशा’ हा याआधीच्या घडलेल्या कोणत्याही तमाशापेक्षा मोठा आहे हे सगळ्यांनाच मान्य आहे. इंडस्ट्रीतली फार मोठमोठी नावं घेतली जात आहेत. यातून कदाचित काही दोषी सापडतील, काही निर्दोष सुटतील किंवा सोडवले जाऊ शकतील आणि काही शिक्षा भोगून पुन्हा आपापल्या कामाला लागतील(उदा. संजय दत्त!). पण मुद्दा आपला आहे. नेमेचि येतो पावसाळा असं म्हणत आपण बॉलीवूडकर त्या अडगळीच्या खोलीत करत असलेल्या सगळ्या काळ्याकभिन्न गोष्टी नजरेआड करतो आणि पुन्हा त्यांच्यावर प्रेम करू लागतो. पुन्हा त्यांना डोक्यावर घेतो. पुन्हा त्यांच्या नावाने नाचू लागतो. त्यांची खरी प्रतिमा समोर येऊनही आपण मात्र चेहर्‍यावर त्यांच्या चाहत्यांची प्रतिमा घेऊनच वावरत असतो. त्यांची खरी प्रतिमा तर समोर येते, आपण एक व्यक्ती, एक माणूस, एक संवेदनशील सजीव म्हणून आपली खरी प्रतिमा कधी दाखवणार आहोत?

Pravin Wadnerehttps://www.mymahanagar.com/author/pravin/
समाजाशी बांधिलकी, बदल घडवण्याची प्रामाणिक इच्छा, त्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी आणि त्याच तयारीचा एक भाग म्हणून माध्यमांमध्ये प्रवेश. लेखनाची आवड, त्यासाठी वाचनाची निवड. सोबतीला फोटोग्राफीचा छंद, जगण्यासाठी अजून काय पाहिजे?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -