निष्क्रिय काँग्रेस, कावेबाज भाजप!

भाजपची सत्तालोलूप वृत्ती वाढत चालली असताना काँग्रेसची अतिसुमार कामगिरी त्या पक्षाची निष्क्रियता वाढवणारी ठरली आहे. बिहारमध्ये 73 जागा मिळवताना भाजपने विविध 11 राज्यांतील 59 पोटनिवडणुकांतल्या तब्बल 41 जागा कमावल्या, तर 34 पैकी फक्त तीन जागा काँग्रेसला राखता आल्या. यावरून या दोन पक्षांच्या एकंदर अवस्थेविषयी अंदाज येतो. सत्ताधारी भाजपच्या गंभीर चुकांची वाट पाहात बसणे हा या पक्षाचा कार्यक्रम असू शकत नाही. त्या पक्षास स्वत:चे असे निश्चित धोरण वा दिशा असावी लागेल. म्हणजे राहुल गांधी यांना पूर्णवेळ काम करावे लागेल. आताही या निवडणुकीत काँग्रेसने 70 जागा हट्टाने मागून घेतल्या, पण यश अगदीच केविलवाणे मिळाले. असे का झाले हे समजून घेण्यासाठी त्या पक्षाच्या नेतृत्वाला घोड्यावरून उतरावे लागेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हुकुमशाही कारभाराविरोधात या देशात विचारवंत, लेखक पत्रकार कायम बोलत असतात. आणि लोकशाही सांगते की सत्तेला तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत. विशेषतः लोकशाहीचा चौथा स्तंभ असणार्‍या पत्रकारांनी ती भूमिका कायम घेतली पाहिजे. देशातील काही पत्रकारांनी ती घेतली आणि त्याची त्यांना किंमत मोजावी लागलीय आणि लागतेय. पण, ते आपल्या लक्ष्यापासून विचलित झालेले नाहीत. मात्र काही पत्रकार विरोधकाची भूमिका घेत असताना या देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस थंड बस्त्यात जाणे हे पुन्हा एकदा भाजपला लाल पायघड्या घालून देणारे ठरले आहे आणि त्याचे ताजे उदाहरण म्हणजे बिहार निवडणुकीचा निकाल होय. बिहारची निवडणूक ही यापूर्वी अनेकदा भारतीय मतदाराची आणि विशेषत: उत्तर भारताची मनोवस्था सांगत आली आहे. आज निवडणुकांचा अतिरेकी प्रमाणात जातीय व पोटजातीय विचार करण्याची सवय झाली आहे. पण याच बिहारने मधू लिमये या मराठी नेत्याला चारवेळा लोकसभेत पाठवले होते. जॉर्ज फर्नांडिस या जन्माने ख्रिश्चन असणार्‍या नेत्याला ते तुरुंगात असताना आणि नंतरही अनेकदा वेगवेगळ्या मतदारसंघांमधून निवडून दिले होते.

बिहारची विकासाची भूक गेल्या सात दशकांत भागलेली नाही. किंबहुना, तो अर्धपोटीच राहिला आहे. तेव्हा बिहारचा तरुण विकासाचा विचारच प्राधान्याने करेल, असे दिसते. असे असूनही प्रचाराच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित अनेक नेत्यांनी देशप्रेम, धर्मप्रेम हे मुद्दे प्रचारात आणले. सुदैवाने, नितीश त्या वाटेला गेले नाहीत. मात्र, प्रचाराला हा भावनिक रंग अचानक चढला नाही. नित्यानंद राय हे केंद्रीय गृहराज्यमंत्री सातत्याने अत्यंत प्रक्षोभक भाषणे करीत होते. बोटे छाटू, हात कलम करू अशी भाषा ते सर्रास वापरत होते. बिहारमधील 14 टके असणार्‍या यादव समाजाचे आहेत आणि नितीश व सुशीलकुमार मोदी या जोडगोळीनंतर नित्यानंद राय यांना उद्याचे नेतृत्व म्हणून भाजप घडवितो आहे, असे दिसते आणि तसेच असेल.

पाच वर्षांनंतर नितीश कुमार आणि त्यांचा जनता दल संयुक्त पक्ष कुठेच नसेल. नितीश यांचा ‘मास बेस’ संपवून टाकण्यासाठी भले आपला मुख्यमंत्री झाला नाही तरी चालेल, पण नितीश यांचे ‘संयुक्त जनता दल’ संपले पाहिजे, असा टोकाचा विचार भाजपने केला आणि तसेच घडल्याचे दिसले. आज भले 43 आमदार निवडून आलेल्या जनता दलचा मुख्यमंत्री असेल, पण लोकसभेत आणि पुढच्या विधानसभेत शत प्रतिशत भाजप असेल. कावेबाजपणा यालाच म्हणतात. मोठ्या भावाचा हात धरत छोट्या भावाने आधी चालायला शिकायचे आणि नंतर चालता चालता पाय दुखले म्हणून मोठ्या भावाच्या खांद्यावर चढून त्याला नेस्तनाबूत करत मोठा भाऊ होण्याचा भाजपचा हा डाव एनडीए मित्रपक्षांच्या मुळावर आला आहे. नितीश कुमार यांना तो बघायचा बाकी होता. तो त्यांनी बघितला हे बरे झाले.

भाजपची सत्तालोलूप वृत्ती वाढत चालली असताना काँग्रेसची अतिसुमार कामगिरी त्या पक्षाची निष्क्रियता वाढवणारी ठरली आहे. बिहारमध्ये 73 जागा मिळवताना भाजपने विविध 11 राज्यांतील 59 पोटनिवडणुकांतल्या तब्बल 41 जागा कमावल्या, तर 34 पैकी फक्त तीन जागा काँग्रेसला राखता आल्या. यावरून या दोन पक्षांच्या एकंदर अवस्थेविषयी अंदाज येतो. सत्ताधारी भाजपच्या गंभीर चुकांची वाट पाहात बसणे हा या पक्षाचा कार्यक्रम असू शकत नाही. त्या पक्षास स्वत:चे असे निश्चित धोरण वा दिशा असावी लागेल. म्हणजे राहुल गांधी यांना पूर्णवेळ काम करावे लागेल. आताही या निवडणुकीत काँग्रेसने 70 जागा हट्टाने मागून घेतल्या. त्या तुलनेत त्या पक्षाचे यश अगदीच केविलवाणे ठरते. त्याऐवजी कमी जागा आणि अधिक ताकद आणि अधिक प्रयत्न असे केले असते तर इतकी लाजिरवाणी अवस्था झाली नसती.

पण हे समजून घेण्यासाठी त्या पक्षाच्या नेतृत्वास घोड्यावरून उतरावे लागेल. हा घोडा जागच्या जागी डुलणारा, खेळण्यातील घोडा आहे. तो पुढे जात नाही. आपल्या वाट्याला आलेल्या 70 जागांवर काँग्रेसने प्रामाणिक निवडणूक लढवली नाही. राहुल गांधी यांनी बिहारमध्ये तळ ठोकून बसण्याऐवजी पाहुण्यासारखा तुरळक प्रचार केला. एवढेच नव्हे तर निवडणूक व्यवस्थापन आणि प्रचारासाठी दिल्लीहून काँग्रेसच्या नेत्यांना पाठवून स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांची उपेक्षा केली. पार्णीनामी अनेक नेते, कार्यकर्ते काँग्रेसच्या प्रचारासाठी बाहेरच पडले नाहीत. परिणामी राष्ट्रीय जनता दल आणि महागठबंधन यांना अतिशय अनुकूल परिस्थिती असताना काँग्रेसचा निष्क्रियपणा भाजपला फायद्याच्या वाटेवर घेऊन गेला.

बिहार निवडणुकीने एका मुद्यावर शिक्कामोर्तब केले आणि ते म्हणजे मित्रपक्षास दुसर्‍या मित्राकडून जायबंदी करण्याचे भाजपचे कौशल्य. महाराष्ट्रात ते फसले. हरियाणात काही प्रमाणात ते यशस्वी झाले आणि बिहारात त्यास सत्ताफळे लागली. काट्याने काटा काढणे हे प्रचलित सत्य. पण मित्राने मित्र घायाळ करणे हे सूत्र ही भाजपची निर्मिती. परिणामी अनेक राजकीय पक्षांना भाजपच्या शत्रुत्वापेक्षा मैत्री धोक्याची वाटल्यास नवल नाही. नितीश कुमार यांना अशक्त करून आणि विरोधकांची मते फोडून भाजपने बिहार राखला हे खरे. स्वत:चे संख्याबळ होते त्यापेक्षा किती तरी वाढवले हेही खरे. पण त्या पक्षाने लक्षात घ्यावी अशी बाब म्हणजे 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तुलनेत या निवडणुकीत भाजपच्या एकूण मतांत झालेली घट. गेल्या वर्षी भाजपप्रणीत रालोआच्या पारड्यात 50.3 टक्के इतकी घसघशीत मते पडली होती.

त्या तुलनेत या विधानसभा निवडणुकीत भाजपला 19.5 टक्के तर रालोआला फक्त 38.3 टक्के इतकीच मते मिळाली. एका वर्षांत या आघाडीच्या साधारण 12 टक्के मतांची वजाबाकी होणार असेल तर ही बाब महत्वाची. मुख्य म्हणजे ती फक्त बिहारपुरतीच मर्यादित नाही. महाराष्ट्रासह (25.6 टक्के), हरियाणा (37.1), झारखंड (34.5) आणि दिल्ली (16.6) अशा अनेक राज्यांत भाजपच्या मतांत घट झाल्याचे आढळते. पण भाजपला त्याची पर्वा नाही. त्यांना ऐनकेन प्रकारेन सत्ता हवी असून त्यासाठी मूल्य बिल्य काही मायने असू शकत नाही, हे आता भाजपच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांवर बिंबवले आहे. याचवेळी राहुल गांधी हे आपली उद्ध्वस्त धर्मशाळा झालेली बघूनही युगांत उलटून गेल्यासारखे मग्न तळ्याकाठी बसणार असतील तर भाजपला मैदान मोकळे मिळणार आहे.