घरफिचर्ससुकलेला पावसाळा

सुकलेला पावसाळा

Subscribe

त्या झाडाखाली दररोज पहाटेला पारिजातकाचा सडा पडलेला असायचा. शाळेत जाताना ती फुलं पायाखाली येणार नाहीत हे बघत बघत मी गेटबाहेर पडायचे. गेटबाहेर हिरवीगार पानं जमिनीवर पडलेली असायची. त्यात मला न आवडणारा गांडूळही दिसायचा. मी त्याला पायाखाली चिरडायचा विचार केला की आजोबांचं नेहमीचं वाक्य ऐकायला मिळायचं. पुढे त्या गांडूळाचे झाले काय हे वाचण्यासाठी संपूर्ण लेख नक्की वाचा.

-आर्या माळकर


साल 2012. तेव्हा मी पाचवीत होते. शाळा नवीन होती. दिगंबर पाटकर विद्यालय ही माझी तिसरी शाळा. तिसरी का? याची कारणे सांगत बसले तर लिहून संपणारच नाही. माझी पहिली शाळा सुविद्यालय. ही शाळा निसर्गाच्या सानिध्यात आणि डोंगर दर्‍यांच्या कुशीत असल्यासारखी वाटायची. सिनेमात दाखवतात ना तशी. होती बोरीवलीच्या नागरी वस्तीतच. पण निसर्गरम्य. त्याच कारण म्हणजे ती बोरीवलीच्या वजीरा नाका या भागात, एका शांत गल्लीत एकदम आत ही शाळा होती. सकाळ, दुपार ,संध्याकाळ केव्हाही फक्त शांत आणि शांत. आजूबाजूला वड, पिंपळ, बदामाची झाडे होती. त्यामुळे तेथील वातावरण रम्य वाटायचे. तेव्हाचे पावसाचे दिवस मला फार आवडायचे.

- Advertisement -

मी त्यावेळी लहान होते. पहिलीत असेन. बालसुलभ भावना होत्या. मी आजीकडे गोराईला रहात होते. तेव्हा सकाळी साडे पाच वाजता मला आजी उठवायची. मीही आडेवेडे घेत उठायची तेव्हाचा पाऊस मला फार प्रसन्न वाटायचा. मी खॉटवर उभी राहायची आणि आजी माझे केस विचारायची तेल लावून लावून ती केस बसवायचा प्रयत्न करायची. तिचा उद्योग सुरू असताना मी खिडकी बाहेर एक टक बघत बसायचे. घराच्या खिडकी समोर बंगल्याची रांग आहे आणि आजूबाजूला झाडं. ते दृश्य इतकं छान दिसायचं की विचारायलाच नको.मग नाश्ता झाला की आजोबांबरोबर मी खाली उतरायचे. बिल्डिंगमधून बाहेर पडलं की मुख्य रस्ता लागायचा.

बिल्डिंगमधल्या पॅसेजमध्ये एका बाजूला खूप झाडंझुडपं होती. वेगवेगळ्या प्रकारची. पारिजात ही होतं त्यात. आजोबा ती फुलं गोळा करून पाण्यात भिजवून ठेवायचे. देवपूजा करताना वापरायचे. त्या झाडाखाली दररोज पहाटेला पारिजातकाचा सडा पडलेला असायचा. शाळेत जाताना ती फुलं पायाखाली येणार नाहीत हे बघत बघत मी गेटबाहेर पडायचे. गेटबाहेर हिरवीगार पानं आणि पिवळी फुलं जमिनीवर पडलेली असायची. त्यात मला न आवडणारा गांडूळही दिसायचा. मी त्याला पायाखाली चिरडायचा विचार केला की आजोबांचं नेहमीचं वाक्य ऐकायला मिळायचं. ‘तो काय खातोय तुला,’ मग त्याला चुकवून पुढे जायचे. तसे मला आजी सांगायची त्या गोष्टीमधली चेटकीण कधीच होता आलं नाही.

- Advertisement -

त्यामुळे गांडूळ दिसला आणि त्याला मारण्याची इच्छा झाली तरी प्रत्यक्षात उतरायची नाही. मग बस येईपर्यंत तो गांडूळ कुठे राहतो हे शोधायचे.बस आली की चटकन तिच्यात शिरायचे. बसच्या खिडक्या बंद असायच्या. मी जाडजूड असले तरी तेव्हा लहानच होते, म्हणून बाजूला बसलेल्या दादाला मला खिडकी उघडून द्यायला सांगायची. त्याच्या कडून सुद्धा खिडकी उघडली नाही तर मग त्या खिडकी वर चढलेल्या धुक्यावर फुल काढत बसायची. शाळेत आम्हाला पीटी शिकवायला एक बाई होत्या. बारिकशा, सावळ्या श्या, नेहमी साधी साडी नेसायच्या. वृद्ध असल्या तरी फार उत्साही होत्या. टिपटीप पाऊस पडतोय म्हणून आज खेळायला नको जाऊया असं त्या आम्हाला कधीच बोलल्या नाहीत.

कपडे भिजले तर सुकतील त्यात काय एवढं पण खेळणं थांबवायचं नाही हो! असं म्हणायच्या. आमच्या कडून वेगवेगळे खेळ खेळून घायच्या. जर त्यांना कळलं की आता मी बॉक्सिंग खेळायला लागले आहे तर नक्कीच खूप खुष झाल्या असत्या. असो! पण सध्या त्यांनी मला ओळखलं तरी पुरे. आजीच्या घरातलं ते पावसाळ्याचं वातावरण काही वेगळंच होतं. जे आतापर्यंत मी कधीच अनुभवू शकले नाही. तो पावसाळा जो सुकला तो सुकलाच. परत कधीच त्याचा ओलावा जाणवला नाही. आता मला वाटतंय की तो तेव्हा थोडा सांभाळून ठेवला असता तर कदाचित आयुष्यभर पुरला असता. आता केवळ त्याच्या आठवणी राहिल्या आहेत. पण त्या आठवणीही इतक्या सुखद आहेत की, नक्कीच जन्मभर पुरतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -