घरफिचर्सऊर्जावर्धक वर्षपूर्ती

ऊर्जावर्धक वर्षपूर्ती

Subscribe

विशेष संपादकीय

आजपासून बरोबर एक वर्षापूर्वी ‘आपलं महानगर’ची नाशकात मुहुर्तमेढ रोवली गेली. स्थानिक माध्यम विश्वात पाऊल ठेवताना जबाबदारीचे, कर्तव्याचे भान होते. शिवाय एकूणच आव्हानांची जाण होती. इथल्या मातीशी इमान राखणारं वर्तमानपत्र वाचकांच्या पुढ्यात ठेवण्याचे कसोशीने प्रयत्न करावे लागतील, याचीही पुरेपूर जाणीव होती. कारण या वृत्तपत्राची ओळख मुंबईच्या मेट्रो संस्कृतीतलं परखड, पारदर्शी अशी सार्वत्रिक स्वरूपाची असल्याने त्या लौकिकाला साजेसं आजच्या बदलत्या भाषेतील खासमखास दर्जा सादर करणे अपरिहार्य होते. नाशिककर तसे सर्वच बाबतीत चोखंदळ. गुणवत्ता, पारदर्शकता आणि विश्वासार्हता असा त्रिवेणी संगम साधणार्‍या गोष्टी स्विकारण्याची इथे सवय आहे. चांगलं त्याची निवड करून आपलसं करण्याची त्यांची रणनीती आम्हालाही ठाऊक होती. बरं, स्वीकारूनही त्यात त्रुटी वाटल्या तर त्याची जाहीर वाच्यता करण्याचे धारिष्ठ्य दाखवायलाही ते ‘का-कू’ करीत नाहीत. वर्तमानपत्र क्षेत्र त्या सुचीला अपवाद असण्याची सुतराम शक्यता नाही. नाशिक जिल्हावासियांच्या या सजग, संवेदनशील मनाचा आदर राखत आम्ही वाटचाल सुरू केली.

केवळ घडलेला वृत्तांत सादर करीत वाचकांची वाहवा मिळवण्याचे दिवस आता संपलेत, या सत्याचा अंगिकार करत कार्यारंभ केला. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, कला, क्रीडा, उद्योग अशा नानाविध क्षेत्रांना कवेत घेण्याचा आमचा प्रयत्न राहिला. बातमीला सत्यता पडताळणीच्या कसोटीवर घासून घेण्याचा शिरस्ता आम्ही कायम ठेवला. आज मागे वळून बघताना एक समाधानी आणि ऊर्जावर्धक भावना मनाला स्पर्शते. वाचकांच्या अपेक्षेनुरूप नि:पक्षपाती, निर्भीड आणि स्वतंत्र बाणा असलेले वर्तमानपत्र देण्यात आम्ही बव्हंशी यशस्वी झाल्याचे अगदी ठामपणे सांगता येईल. नाशिक शहर आणि जिल्ह्याशी निगडित अनेक समस्या, मुद्दे हाताळत त्याबाबत कधी कठोर तर अनेकदा रचनात्मक भूमिका घेत त्यांची तड लावण्याकडे आमचा कटाक्ष राहिला. आमच्या लेखणीला ना कोणता रंग ना, आमच्या डोक्यावर कोणाची टोपी राहील, हा नमनाला दिलेला शब्द कटाक्षाने पाळला. म्हणूनच नाशिक जिल्हावासियांना नितळ पत्रकारितेचा नमुना अनुभवायला मिळाला.

- Advertisement -

काव्यगत न्यायाची एखाद्या वर्तमानपत्राची भूमिका पावलोपावली वठवल्याची बाबही यानिमित्त अधोरेखित करावीशी वाटते. वाचकांप्रतीची ही कटिबध्दता केवळ बातम्यांपुरती मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून उपक्रमशीलतेचा अंगिकार आम्ही केला. जागतिक महिला दिनी कर्तृत्ववान सबलांचा गौरव,आरोग्यदिनी आरोग्याचा जागर करणारी व्याख्यानमाला, महाराष्ट्र दिनाला पारंपरिक वेशभूषा स्पर्धा, श्रीगणेशोत्सवात इको-फ्रेण्डली सजावटीला प्राधान्य देणार्‍यांसाठी स्पर्धा, शारदीय नवरात्रौत्सवात महिला नवरत्नांचा गौरव हे उपक्रम आयोजित करून आम्ही नाशिककरांच्या अपेक्षांना दाद देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. सामान्य जनता, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी हातात हात घालून जनहितैषी कामे करावीत यासाठी मध्यस्थाची भूमिका बजावली. पण उपासनेला दृढचाल होताना समाधान मानायचे नसते. कारण वर्तमानपत्रांना आपल्या भुमिकेत सातत्य राखण्याची अपरिहार्यता आपसूकच स्विकारावी लागते. नाशिक ही तशी धार्मिक भूमी. मंत्र-तंत्र, पौरोहित्य, पळी-पंचपात्रे, विधीवैविध्यता, बारा वर्षांनी भरणारा साधु-महंतांचा कुंभमेळा हा इथल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग. प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्यभूमी अवघ्या विश्वभर ख्यातकीर्त आहे.

जगभरातील तत्वज्ञ, विचारवंत, लेखक यांच्या लेखीही या भूमीबद्दल नितांत आदर आहे. यासोबतच महाराष्ट्राची कृषीपंढरी, उद्यमनगरी, पर्यटनभूमी, वाईन कॅपिटल ऑफ इंडिया ही बिरूदंही नाशिक जिल्ह्याच्या महात्म्याला सजवण्यास पूरक ठरतात. धार्मिक परंपरेचा सार्थ अभिमान बाळगत, इथले पावित्र्य सदोदित राखण्याची आण घेत या प्रत्येक क्षेत्रात प्रगतीची नवनवी प्रमेयं तयार व्हावीत, ही आमची मनोभूमिका आहे. नाशिक जिल्ह्याची सामाजिक व भौगोलिक परिस्थिती कमालीची असंतुलित आहे. इथल्या काही तालुक्यांत सधनता आढळून येते तर काही ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य. बागायती-जिरायती असा भेद करणार्‍या शेतीचे प्रमाणही लक्षणीय आहे. उद्योग उभारणीसाठी एमआयडीसीने जागा मंजूर करून वर्षानुवर्षे झालीत, पण उद्योग यायचे नाव नाही. पर्यटन विकसनाला नैसर्गिक देणगीचे वाण पदरात पडूनही दिशा नसल्याने दशा अनुभवण्याची वेळ आली आहे. अशा वेळी माध्यमांनी स्वयंस्फुर्तीने सदिच्छादूत बनून एक पाऊल पुढे येणे गरजेचे असते.

- Advertisement -

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ या नात्याने समाज प्रबोधन वाट्याला येणे आलेच, पण सामाजिक जाणीवेतून दिशादर्शक निर्णय होण्यासाठी कटिबध्द राहणे आज आत्यंतिक गरजेचे आहे. ‘आपलं महानगर’ने या दिशेने केव्हाच पाऊल टाकले आहे. आमच्या या भूमिकेला वाचकांनी भरभरून पाठबळ दिलेय, याबाबत आम्ही ऋणी आहोत. तथापि, हा प्रवास अखंड, अहर्निश सुरू राहावा, यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक असलेल्या प्रत्येक घटकाला सोबत घेण्यात येईल. शासकीय सोपस्काराचा भाग म्हणून नाशिक ‘स्मार्ट सिटी’च्या यादीत समाविष्ट होत आहे, ही निश्चितच आनंददायी बाब आहे. पण जिल्ह्याच्या अन्य भागात ‘स्मार्ट’पणा रूजवायची नितांत गरज आहे. ही गोष्ट आव्हानात्मक आहे, तथापि ती अशक्यप्राय नाही, याची आम्हाला जाणीव आहे. नाशिक जिल्ह्यात अनेक प्रकारची पिके घेतली जातात. स्थानिक स्तरावर अन्नप्रक्रिया उद्योगांची पायाभरणी होणे गरजेचे आहे. पर्यटनाच्या कक्षा विस्तारत अधिकाधिक पर्यटकांना आकृष्ट करण्यासह पुरेसा वाव आहे. यामुळे स्थानिक रोजगार वाढून शहरी भागाकडे येणारा लोंढे थांबवता येतील. यामुळे रिकाम्या हातांना काम मिळून जिल्ह्याचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल.

आमच्या या प्रवासात आवश्यक सर्व घटकांना सोबत ठेवण्याची आमची भूमिका राहील. वर्षभरात गुणात्मक व संख्यात्मक प्रगतीचा आलेख गाठता आला, याचे निर्विवाद श्रेय जिल्हावासियांना आहे. नाशिकसोबतच आम्ही शेजारच्या अहमदनगर जिल्ह्यातही हळूहळू पंख पसरतोय. तिकडचा प्रतिसादही आमच्यासाठी ऊर्जावर्धक आहे. कालानुरूप बदलाला अनुसरून तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आम्ही तसूभरही कमी नाही. घडलेल्या घटनांचा तात्काळ लेखाजोखा वाचकांसमोर मांडणारी आमची www.mymahangar.com ही ऑनलाईन आवृत्तीही म्हणूनच व्यापक चर्चेचा भाग ठरतेय. भविष्यात अशीच समाज बांधणीची वीण घट्ट करण्याचा निर्धार आम्ही केलाय. गरज आहे ती आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची. पुनश्च एकदा यशस्वी वर्षपूर्तीनिमित्त सर्वांप्रती ऋण व्यक्त करतो. उद्याच्या आमच्या वाटचालीत आपण सारे हातात हात घालून पारिवारिक सदस्य म्हणून राहाल, असा आशावाद व्यक्त करून आतापुरता शब्दांना पूर्णविराम देतो. पुनश्च एकदा सर्वांचे आभार !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -