घरफिचर्सताई हवालदारीण

ताई हवालदारीण

Subscribe

ताईने मला खंबीरपणे हो सांगितलं, पुढे ताई म्हणाली ते वाक्य आजही माझं काळीज कापतं. ताई म्हणाली, “ह्या डोळ्यांनी आयुष्यभर छळल्यानी. कोणा गाववाल्यान सुखाक कधी आपलेपणान बोलवूक नाय. सोताच्या झिलानं लग्नाक येव नको म्हणान सांगल्यान. आता सांग हे डोळे माका लाभले नाय लाभले मी मेल्यार कोणाक गावतीत त्याका तरी लाभा दे”.

काल सकाळीच बंड्याचा फोन आला ‘‘वैभव ,अरे माझी आई सकाळी वारली, मी लगेचच निघतो आहे.’’ बंड्याच्या या बातमीने पुढे काय बोलावं हे सुचेचना. बरं, तू जाऊन ये. एवढंच मी म्हटलं. बंड्याने फोन ठेवला. गावी फोन करून वरील बातमीबद्दल विचारलं तेव्हा कळलं की, बंड्याची आई म्हणजे ताई हवालदारीण. सकाळी हृदय विकाराच्या झटक्याने निधन पावली.

- Advertisement -

वास्तविक ताईचं आडनाव हवालदार नव्हतं, पण तिचे यजमान पोलीस खात्यात हवालदार म्हणून निवृत्त झाले. मास्तराची बायको मास्तरीण तसं हवालदाराची बायको हवालदारीण. आमच्या वयाची सगळी मुलं तिला ताई म्हणायचो.

मी तेव्हा शाळेत शिकत होतो आणि मे महिन्याच्या सुट्टीत दरवर्षी गावी जात असे. एकदा सर्व भाऊ एकत्र मिळून खळ्यात पत्ते खेळत होतो. आमच्यात एक छोटा भाऊ होता. तो तब्येतीने चांगला गुटगुटीत होता. आमचा खेळ रंगात आला तेवढ्यात मोठी काकू खळ्यात येऊन “ये पोरांनू!!! त्या बाबूक आदी घरात घेवंन जावा”.

- Advertisement -

“कशाक नेवकं व्हया. र्‍हवना !”
“अरे ताई हवालदारीण येताहा”
“तर काय झाला ?”
“काय झाला मन्जे. मेलीची नदर अगदी वायट, नदर बाधता तिची”
काकी काय म्हणत होती ते आम्हाला कळत नव्हतं. कोणाची नजर बाधणे किंवा नजर लागते म्हणजे काय हेसुद्धा कळत नव्हतं.

ताई म्हणजे कोणाला मदत करण्यात लाखात एक बाई. कोणाच्या घरात शुभ कार्य असो, पूजा, लग्न काही असो, जेवण करायला ताई सर्वांंच्या आधी हजर असायची. भात-डाळीचे मोठे-मोठे टोप सहज उचलायची. गावात कोणाकडे मांसाहारी जेवण बनवायचं असेल तर तो यजमानी प्रथम ताईकडे जायचा. सामान किती लागेल याची यादी बनवून आणायचा आणि मग बाजारात जायचा. लोक म्हणायचे, “ताई म्हणजे हेरशी लक्ष्मी, पण एका गुणान माती खाल्यान.”

वास्तविक ताईची नजर लागते याला तिचा काय दोष? आणि हे ठरवणारे आपण कोण ? याविषयावर एकदा बोलणं चालू असताना, लोक अनेक संदर्भ द्यायचे. कोण म्हणायचे, एकदा घराच्या मागे एक केळं पोसवली होती, त्या केळीकडे ताईची नजर गेली तेव्हा ती म्हणाली “वा! केळ चोकट पोसावली हा!” एवढं म्हणून ती पुढे गेली आणि दुसर्‍या क्षणी ते केळीचं झाड मुळातच उखडलं. मी म्हणालो, हा योगायोग असू शकतो, त्यावर दुसर्‍या गाववाल्याने अजून एक दाखला दिला. तो म्हणाला, की एक दिवस तो शेतात नांगरट करत होता, त्याठिकाणी ताई आली आणि औताला बांधलेल्या बैलाचं कौतुक केलं. नंतर तो बैल औताला काम करीनासा झाला. असे वेगवेगळे दाखले देत ताई हवालदारणीची नजर कशी बाधते हे गाववाले मला सांगत होते. अशा प्रवादामुळे लोक ताईला टाळायचे. चांगल्या प्रसंगी तर लोक तिला बोलावत नसतं. आमंत्रण द्यायचे विसरलो अशी लोणकढी थाप मारत.

समाजात जेव्हा अशी वागणूक मिळते तेव्हा माणूस समाजापासून दूरच जातो .
पुढे बंड्याचं लग्न ठरलं. लग्न मुंबईत होतं. मला पत्रिका होती म्हणून मी जायचं ठरवलं. लग्नाला ताई-जीजी भेटतील, इतर गाववाले भेटतील. या उद्देशाने मी गेलो. बघतो तर ताई आलीच नव्हती. फक्त जीजी आले होते. मी जीजींना ताईबद्दल विचारले तेव्हा जीजींनी ताईची तब्येत बरी नाही म्हणून सांगितलं आणि विषय संपवला.

मला आश्चर्य वाटलं, लोकांच्या मुलांच्या लग्नात वाटेल ते काम करणारी ताई स्वतःच्या मुलाच्या लग्नाला आली नाही!कसं शक्य आहे ? नंतर मी माझ्या नेहमीच्या कामात गुंतलो.

त्यावर्षी उन्हाळ्यात गावी गेलो. घरात कार्यक्रम होता. सगळी माणसं होती, पण ताई कुठे दिसली नाही म्हणून काकीला विचारलं की हल्ली ताई येत नाही ? काकीने सुद्धा “नाय रे आता तिका जमतं नाय. घराकडेच आसता”. एक दिवस माझ्या भावाने मला ताईने घरी बोलावल्याचा निरोप दिला.

त्या संध्याकाळी मी ताईच्या घरी गेलो. जीजी बाहेर काही काम करत होते. मी आत गेलो. ताईने बायको, मुलीची चौकशी केली. मला चहा दिला आणि हातात कसला तरी कागद होता तो पुढे करत मला म्हणाली, “बाबू ! माझो एवडो फार्म भरून दी रे”.

मी फॉर्म बघितला तर तो साधासुधा फॉर्म नसून नेत्रदानाचा फॉर्म होता. मी विचारलं, “ताई तू ह्यो फॉर्म भरत, तुझे डोळे तू दान करत की काय?”

ताईने मला खंबीरपणे हो सांगितलं, पुढे ताई म्हणाली ते वाक्य आजही माझं काळीज कापतं. ताई म्हणाली, “ह्या डोळ्यांनी आयुष्यभर छळल्यानी. कोणा गाववाल्यान सुखाक कधी आपलेपणान बोलवूक नाय. सोताच्या झिलानं लग्नाक येव नको म्हणान सांगल्यान. आता सांग हे डोळे माका लाभले नाय लाभले मी मेल्यार कोणाक गावतीत त्याका तरी लाभा दे”. त्यादिवशी आयुष्यभराचं दुःख माझ्यासमोर व्यक्त करत होती. मी ताईने दिलेला फॉर्म भरला. ताईच्या घरातून बाहेर पडलो तेव्हा बाहेर काळोख पसरला होता. ताईने घरात दिवा लावला होता आणि देवाच्या पुढे फॉर्म ठेवून हात जोडले.
मला आता अश्रू आवरणं कठीण झालं होतं. त्या काळोखात विचार करत होतो, खरंच माणसाची नजर माणसाला बाधते का? सगळीचं मिथ्या.

-वैभव साटम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -