घरफिचर्सनातं अपेक्षांच्या ओझ्याशी

नातं अपेक्षांच्या ओझ्याशी

Subscribe

कोणत्याही फळांची अपेक्षा न करता आपण आपलं काम करत राहायचं असं नेहमीच म्हटलं जातं. पण संपूर्ण आयुष्यात खरंच तसं घडतं का? अगदी नेहमीच नाही, पण कधीतरी कोणाकडून तरी काहीतरी हवं असण्याची, कोणाकडून काहीतरी भावनिक व्यक्त होण्याची, कोणाकडून काहीतरी नको असण्याचीही अपेक्षा प्रत्येकाला असतेच. नातं कोणतंही असो, तरीही कळत नकळत अपेक्षा मनामध्ये आणि मग त्या आपसूकच ओठावर येतातच. खरं तर नातं आलं की, अपेक्षा आलीच.

अर्थात अपेक्षा कोणीही कोणाकडूनही करत असतो. त्यासाठी कोणी खासच असायला हवं असं काही नाही. जसं ऑफिसमध्ये एक जण काम करत गेला की, अपेक्षा त्याच्याकडूनच वाढत जाते. मग दुसर्‍या कोणाकडूनही काम करून घेण्याची इच्छाही व्यक्त केली जात नाही. तर घरातही काही वेगळं नसतं. एखादी व्यक्ती घरात सगळं न सांगता करत असेल तर सगळ्या अपेक्षा त्याच व्यक्तीकडून केल्या जातात. याला एका बाजूनं गृहीत धरणं असंही म्हटलं जाऊ शकतं. खरं तर या गोष्टी लहानपणापासूनच होत असतात. प्रत्येकाचं अपेक्षांच्या ओझ्याशी लहानपणापासूनच नातं तयार होत असतं.

- Advertisement -

लहानपणी सर्वात पहिलं अपेक्षांचं ओझं येतं ते म्हणजे आई-वडिलांच्या अथवा थोरा मोठ्यांच्या गोष्टी ऐकायलाच हव्यात.इथपासूनच या नात्याला सुरुवात होते. सुरुवातीला स्वतःचे विचार नसेपर्यंत या अपेक्षांचं ओझं होत नाही. मात्र स्वतः विचार करायला लागल्यानंतर या अपेक्षांच्या ओझ्याच्या नात्यात गुरफटून जायला होतं. म्हातारपणापर्यंत हे नातं आणि त्या नात्याचं ओझं संपत नाही. कार्यालयामध्ये कितीही काम केले तरीही वरिष्ठांची अपेक्षापूर्ती होणं हा सर्वात मोठा टास्क तर असतोच पण कदाचित ते सर्वात मोठं बर्डन असतं. सहकार्‍याला प्रशंसेची अपेक्षा असताना टीका झाली अथवा दुर्लक्ष झाल्यास, काम करणार्‍या कनिष्ठांचा विरस होत असतो. याचा परिणाम म्हणजे काम करताना कामचुकारपणा वा दिरंगाई होऊ शकते.

कधी कधी हे अपेक्षांच्या ओझ्याचं नातं हे आपण स्वतःशीदेखील ठेवत असतो. पण आपणच आपल्यावर ओझं टाकत आहोत न समजून त्या ओझ्याखाली स्वतःच दबून जातो. मग आपल्यासमोरच प्रश्न उभा राहतो तो म्हणजे आता जग काय म्हणेल? पण आपण हा विचार करत नाही की, आपलं जग हे आपण ठरवत असतो. आपल्याला कोणालाही उत्तर द्यायला जायचं नसतं. वास्तविक ९० टक्के लोक हे आपल्याला आपल्या आयुष्याबद्दल काहीही विचारत नसतात. पण लोक काय म्हणतील किंवा जग काय म्हणेल यामध्ये आपणच स्वतःला मारून टाकत असतो. पण हे अपेक्षांच्या ओझ्याचं नातं बाळगायची गरजच काय आहे? याचा विचार प्रत्येक माणसानं स्वतः करायची गरज आहे.

- Advertisement -

प्रत्येक नात्यामध्ये कटूता निर्माण होण्यासाठी आपण नात्याकडून ठेवलेली अपेक्षाच कारणभूत असते असं म्हटलं जातं. अर्थात त्याच अर्थाने अपेक्षांशीही आपलं एक नातं निर्माण झालेलं असतं. प्रत्येक नात्याशी प्रामाणिक राहिल्यास, कदाचित अपेक्षा ठेवल्याच जाणार नाहीत असं वाटणं साहजिक आहे. मात्र अपेक्षांच्या ओझ्याशी नातं हे नेहमीच राहिलं होतं आणि राहील, त्यामुळं हे नातं कसं हाताळायचं हे प्रत्येकाला स्वतःलाच ठरवायला हवं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -