सावंतवाडीची लाकडी खेळणी

पूर्वीपासून लाकडी भातुकली प्रसिद्ध आहे. आकर्षक रंगांची रंगीबेरंगी छोटी - छोटी भांडी मोठ्यांनाही भुरळ पडतात. लाकडी खेळण्यांच्या बाजारासाठी ’सावंतवाडी’ प्रसिद्ध आहे. हुबेहूब दिसणार्‍या लाकडी भाज्या आणि लाकडी फळे हे सावंतवाडीच्या चितारआळीचे वैशिष्टय आहे.

Mumbai
The wooden toys of Sawantwadi
सावंतवाडीची लाकडी खेळणी

भातुकली म्हणजे प्रत्येक लहान मुलीचे स्वतंत्र विश्व असते. भातुकली म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ती इवलीशी भांडी, गॅस, शेगडी, पोळपाट – लाटणं आणि बरंच काही. या भातुकलीत आता प्लास्टीकची खेळणी आली. परंतु पूर्वीपासून लाकडी भातुकली प्रसिद्ध आहे. आकर्षक रंगांची रंगीबेरंगी छोटी – छोटी भांडी मोठ्यांनाही भुरळ पडतात. लाकडी खेळण्यांच्या बाजारासाठी ’सावंतवाडी’ प्रसिद्ध आहे. हुबेहूब दिसणार्‍या लाकडी भाज्या आणि लाकडी फळे हे सावंतवाडीच्या चितारआळीचे वैशिष्टय आहे.

१८५० पर्यंत सावंतवाडीला सुंदरवाडी म्हणून ओळखले जाई. येथे खेम सावंत भोसले घराण्याची सत्ता होती. म्हणून सुंदरवाडीचे नाव सावंतवाडी संस्थान झाले. १८ व्या शतकापर्यंत गोव्यातील पेडणे, बिचोलीम, सत्तारी व सिंधुदुर्गातील कुडाळ, वेंगुर्ला हेही सावंतवाडी संस्थानाचे भाग होते.

सावंतवाडी संस्थानचा पूर्वीचा राजवाडा हा नरेंद्र डोंगरावर होता. सध्या अस्तित्वात असलेला राजवाडा १८ व्या शतकात खेम सावंत तिसरे यांनी बांधला. राणी सत्वशीला देवी यांनी स्थानिक कलाकारांना राजवाड्यात लाखेचा मुलामा दिलेल्या लाकडी वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहित केले. अत्यंत आकर्षक असे लाखेचा मुलामा दिलेले गंजिफा पत्ते, बुद्धिबळाचे पट, लाकडी फळे, भाज्या, बाहुल्या, खुर्च्या इत्यादी वस्तू परदेशी पर्यटकांना भूरळ घालतात. राणी सत्वशीला देवी यांचे काही दिवसांपूर्वीच देहावसान झाले.

१८७४ मध्ये राजवाड्यासमोर मोती तलाव बांधण्यात आला. मोती तलावात पर्यटकांसाठी बोटींगची सोय आहे. मोती तलावाशेजारी छान बागसुद्धा आहे. येथून जवळच लाकडी खेळण्यांचा बाजार आहे. येथे लाकडी गाड्या, लाकडी फळे, लाकडी भाज्या, भातुकली, लाकडी जत्रेतल्या पाळण्याची प्रतिकृती, लाकडी साप, मासा, मगर, कासव, ससा, लाकडी छोटे तबले, लाकडी पेन स्टॅन्ड, लाकडी पेन, लाकडी पोळपाट, लाकडी पाट, की चेन्स अशा असंख्य लाकडी वस्तू खरेदी करता येतात. हा लाकडी खेळण्यांचा बाजार दुरून सुद्धा रंगीबेरंगी व आकर्षक वाटतो. सावंतवाडीत रघुनाथ मार्केटलाही भेट देऊ शकतो. येथील नरेंद्र डोंगरावर घनदाट जंगल आहे. येथून सूर्यास्ताचे विविध रंग पाहू शकतो. डोंगरमाथ्यावर नरेंद्र वन उद्यान आहे.

एक रात्र मुक्काम करून सावंतवाडी पूर्ण फिरता येते. येथे राहण्यासाठी मोठे हॉटेल्स तसेच निवास – न्याहारी योजनाही उपलब्ध आहेत. मालवणी नाश्ता व जेवण येथे उत्तम मिळते. सावंतवाडी स्टेशनलगत तसेच मोती तलावाशेजारीही हॉटेल्स उपलब्ध आहेत.

लेखक वि. स. खांडेकर, क्रिकेटपटू विजय मांजरेकर, क्रिकेटपटू संजय मांजरेकर, संगीतकार वसंत देसाई, ’चला हवा येऊ द्या’ फेम विनोदी नट भालचंद्र ऊर्फ भाऊ कदम हे सगळे मान्यवर सावंतवाडीच्या शिरपेचातील आहेत.

सावंतवाडी हे कोकण रेल्वेचे स्टेशन आहे. कोकण रेल्वेने आल्यास सावंतवाडी स्टेशनवर उतरता येते. महाराष्ट्रातील सर्वच शहरांमधून सावंतवाडीसाठी एस. टी. बस सुटतात. बेळगाव आणि दाबोलीम ही जवळची विमानतळे आहेत.