घरफिचर्सविरुद्धान्नांचे सेवन आरोग्यास घातक

विरुद्धान्नांचे सेवन आरोग्यास घातक

Subscribe

काही आहारीय पदार्थ दुस-या आहारीय पदार्थात एकत्र करून सेवन केले तर ते शरीरावर अपायकारक परिणाम करतात, अशा मिश्र पदार्थांना आयुर्वेदात ‘विरूद्धान्न’ अशी संज्ञा आहे. यात शिकरण, फ्रूटसॅलड, मिल्कशेक, दूध व मांसाहार, दूध-दही-भात एकत्र इ. अनेक पदाथार्र्ंचा समावेश होतो. अशा विरूद्धान्नांचे सातत्याने व अधिक प्रमाणात सेवन टाळणे हे केवळ कॅन्सर प्रतिबंधासाठी नव्हे तर स्वास्थ्य रक्षणासाठीही आवश्यक आहे.

अन्न, वस्त्र, निवारा या मानवी शरीराच्या मूलभूत गरजा आहेत. क्षुधा वा भूक ही शरीराची नैसर्गिक गरज आहे हे लक्षात घेऊनच आहाराला प्राधान्य दिलेले आहे. दैनंदिन व्यवहारात आपल्या शरीराची होणारी झीज भरून काढून शरीर टिकवून ठेवणे हे आहारामुळे शक्य होते. शरीराचे पोषण, बलवर्धन व मनाची प्रसन्नता टिकवण्यासाठी आहाराचे महत्व अनन्यसाधारण आहे. आयुर्वेदाने तर आहाराला शरीररूपी इमारतीला आधारभूत अशा त्रयोपस्तंभापैकी एक मानले आहे. केवळ कॅन्सर प्रतिबंधासाठी नव्हे तर स्वास्थ्य रक्षणासाठीही आयुर्वेदासारख्या जीवन जगण्याचे शास्त्र असणा-या वैद्यकशास्त्रातील आहाराचे मार्गदर्शन महत्वपूर्ण ठरते. आरोग्य रक्षणात वैशिष्ट्यपूर्ण स्थान असणा-या आहाराबाबत आपण सजग आहोत का? आपण त्याकडे खरोखरच लक्ष देतो का? हा अंतर्मुख करायला लावणारा प्रश्न आहे.

- Advertisement -

आयुर्वेदातील आहार संकल्पना ही आधुनिक आहारशास्त्रानुसार आहारीय पदार्थांच्या पोषणमूल्यांवर आधारित नसून आहार पचवणा-या पचनशक्तीवर आधारित आहे. खरेतर आपण स्वत:च आपल्या प्रकृतीस्वास्थ्याचे उत्तम परीक्षक असतो. म्हणूनच आहार किती आणि कधी घ्यावा यासाठी स्वत:चे परीक्षण करणे आवश्यक आहे. आमाशयाचे चार भाग कल्पून, दोन भाग घनान्न, एक भाग द्रवान्न व एक भाग वायुसाठी / पचनासाठी ठेवावा. पचण्यास जड भोजन असल्यास अर्ध्या मात्रेत घ्यावे. अतिमात्रेमधे खाणे कधीही टाळावे.

योग्य अन्नसेवनकाळ कोणता? असा प्रश्न आपल्या सर्वांच्याच मनात असतो. जेव्हा आपण खाल्लेल्या अन्नाचे रस, दोष आणि मल यांत रुपांतर झाल्यानंतर कडकडीत भूक लागते हाच खरा योग्य अन्नसेवनकाळ. बर्‍याच वेळा आपल्या धकाधकीच्या जीवनशैलीत जेवणाला दुय्यम दर्जा दिला जातो. एखादा दिवस असे झाले तर फारसे काही नाही, पण अशी अनियमितता वारंवार होऊ लागली तर रोगाला आमंत्रणच! वेळेवर जेवणे जितके महत्त्वाचे तितकेच वरचेवर चिवडा,वेेफर्स असे काही ना काहीतरी खात रहाण्याची सवय टाळणेही महत्त्वाचे. शक्यतो ३ तासांपेक्षा कमी काळामधे काही खाऊ नये तर ६ तासांच्या वर कधी उपाशी राहू नये. म्हणूनच प्रत्येकाने आधुनिक जीवनशैली व आयुर्वेदातील आहार मार्गदर्शन यांचा सुवर्णमध्य साधून आपले आहाराचे वेळापत्रक जाणीवपूर्वक आखणे ही काळाची गरज आहे. सकाळी ८.०० ते ८.३० च्या दरम्यान नाश्ता, १२.३० ते १.३० दुपारचे जेवण, ४.३० ते ५.०० संध्याकाळचा हलका नाश्ता व रात्री ८.३० ते ९.०० रात्रीचे जेवण अशारीतीने आहाराचे वेळापत्रक आखावे.

- Advertisement -

सकाळी उठल्यावर चहा घेण्याची सवय असल्यास प्रथम पाणी उकळवून त्यात चहापावडर, साखर घालून गॅस बंद करावा. पातेल्यावर झाकण ठेवून थोड्या वेळाने तो गाळून घ्यावा. त्यामुळे चहाची तीक्ष्णता कमी होण्यास मदत होते. साखरेचा पाक करून गोडमिट्ट चहा घेणे टाळावे. दूध घेणा-यांनी शक्यतो गाईचे दूध घ्यावे. दूध पचण्याचा त्रास असलेल्यांनी व सर्दी, पडसे त्रास असणा-यांनी अर्धा कप गाईचे दूध, अर्धा कप पाणी व चिमूटभर सुंठ घालून उकळवून घ्यावे.

नाश्त्यासाठी सँडविच, नुडल्स, ब्रेड-जॅम या ऐवजी मऊ भात, रव्याची खीर, नाचणी सत्व, मूगाचा घावन, तांदूळाचे घावन, पोहे, उपमा, भाजणीचे थालीपीठ असे भारतीय प्रकार निवडावेत. ज्यांना सकाळी लवकर घरातून बाहेर पडावे लागते अशांनी सोबत एखादी पोळी व भाजी वा परोठा न्यावा.

दुपारच्या जेवणात नोकरदार वर्गाने पोळी-भाजी घेऊन जाण्यासाठी शक्यतो गरम अन्न ठेवणा-या व फूड ग्रेड दर्जा असणा-या डब्याचा वापर करावा. घरी राहणा-या गृहिणी, विद्यार्थी वर्ग यांनी वरण / आमटी, भात, भाजी, पोळी / भाकरी, कोशिंबीर, पातळ व गोड ताक असा चौरस आहार घ्यावा.

संध्याकाळी ४.३० ते ५ या वेळेत हलका आहार घ्यावा. नोकरी करणा-यांनी राजगिरा लाडू, मुगाचा लाडू, दुधीवडी, कोहळेपाक, खाकरा, एखादे फळ असा आहार घ्यावा. घरी असणा-यांनी धिरडे, थालीपीठ, मोकळी भाजणी असे पदार्थ योग्य मात्रेत घ्यावेत.

रात्रीचे जेवण दुपारच्या जेवणापेक्षा हलके असावे. रात्री शक्यतो दही घेऊ नये. रात्रीचे जेवण उशिरा होत असेल तर रात्री ताक-भात / द्रवाहार घ्यावा. रात्रीचे जेवण झाल्यावर शतपावली करावी. रात्रीचे जेवण व झोप यामध्ये किमान २ तासांचे अंतर असावे. त्यामुळे अन्नपचन सुलभतेने होते.

काही आहारीय पदार्थ दुस-या आहारीय पदार्थात एकत्र करून सेवन केले तर ते शरीरावर अपायकारक परिणाम करतात, अशा मिश्र पदार्थांना आयुर्वेदात ‘विरूद्धान्न’ अशी संज्ञा आहे. यात शिकरण, फ्रूटसॅलड, मिल्कशेक, दूध व मांसाहार, दूध-दही-भात एकत्र इ. अनेक पदाथार्र्ंचा समावेश होतो. अशा विरूद्धान्नांचे सातत्याने व अधिक प्रमाणात सेवन टाळणे हे केवळ कॅन्सर प्रतिबंधासाठी नव्हे तर स्वास्थ्य रक्षणासाठीही आवश्यक आहे.

मनुष्याच्या शारीरिक तसेच मानसिक जडणघडणीमधे आहाराचा महत्वाचा वाटा आहे. ताजे, सौम्य, गोड, गरम असे अन्न सात्विक प्रवृत्ती निर्माण करते तर शिळे, कोरडे, तिखट, जळजळीत, करपलेले, बेचव अन्न राजस- तामस प्रवृत्तीला कारणीभूत ठरते.

शक्यतो घरगुती बनवलेला आहार घ्यावा. कारण या आहाराच्या शुध्दतेची व पोषकतेची संपूर्ण खात्री असते. शिवाय घरातील स्त्रीने प्रेमाने व आपुलकीने बनविलेले जेवण केवळ शरीरालाच नव्हे तर मनालाही समाधान देते. एक वेळ हॉटेलमधील जेवणाचा कंटाळा येईल, परंतु वर्षानुवर्षे घेत असलेल्या घरच्या जेवणाचा कंटाळा येत नाही तो त्यावर झालेल्या आत्मसंस्कारामुळे.

खरोखरच आहारसेवन हे ‘उदरभरण नसून यज्ञकर्म आहे’ हे लक्षात ठेवले पाहिजे. ज्याप्रमाणे यज्ञकर्म करताना त्यातील वन्ही सतस चेतत ठेवण्यासाठी समिधा व आहुती योग्य वेळी योग्य प्रमाणात देणे आवश्यक असते, तरच ते यज्ञकर्म सुफल होते, त्याचप्रमाणे आपल्या स्वास्थ्य रक्षणासाठी योग्य आहार, योग्य मात्रेत सेवन करणे उपयुक्त ठरते.

-वैद्य स. प्र. सरदेशमुख

-संचालक, इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, वाघोली, पुणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -