घरलोकसभा २०१९अंतर्गत नाराजीमुळे ठाकरे -फडणवीस यांची झोप उडाली, आज मातोश्रीवर चर्चा

अंतर्गत नाराजीमुळे ठाकरे -फडणवीस यांची झोप उडाली, आज मातोश्रीवर चर्चा

Subscribe

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना-भाजपा युती झाली असली तरी भाजपा-शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या नाराजी नाट्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झोप उडाली आहे. त्यामुळेच उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसेच यावेळी 48 लोकसभा मतदारसंघांच्या उमेदवारांबाबत फायनल चर्चा होणार असल्याचे समजते. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर, तसेच किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांकडून होणार्‍या विरोधावरही बोलणार आहेत. दोन्ही पक्षांमधील स्थानिक नेत्यांमधील वाद मिटावे जेणेकरून युतीच्या उमेदवाराला त्याचा फायदा होऊ शकेल, असे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना वाटत असल्यामुळे उद्या त्यासाठी चर्चा होणार आहे.

युती झाली पण मित्रपक्षांना काय असा सवाल आता शिवसेना-भाजपाला मित्रपक्ष विचारू लागले आहेत. शिवसेना 23 तर भाजपा 25 जागांवर निवडणूक लढणार आहे. त्यामुळे मित्रपक्षांना दोघांमधील किती जागा द्याव्यात आणि कोणत्या जागा द्याव्यात यावर देखील हे दोन्ही नेते चर्चा करून मित्रपक्षांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शिवसेना-भाजपाची संभाव्य उमेदवारांची यादी तयार झाली असून उद्या ही यादी जवळपास निश्चित केली जाणार आहे,अशी माहितीदेखील विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.

- Advertisement -

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सध्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यामधील वाद चर्चेचा विषय ठरला आहे. खोतकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र आपलं महानगरला मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनी या दोघांची समजूत काढली असून या वादावर उद्या पडदा पडण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -