प्रक्षोभक संदेश पाठवणार्‍या व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिनवर होणार कारवाई

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची सावधगिरी

Nashik

अयोध्या खटल्याचा निकाल आता अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपला आहे. या ऐतिहासिक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक शहर व ग्रामीण पोलीस दलाने रेड अलर्ट जाहीर केला असून जिल्ह्यात धार्मिक सलोखा व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोशल मीडियासह व्हॉट्सअ‍ॅपवर प्रक्षोभक संदेश पाठवणार्‍या अ‍ॅडमिनवर कारवाई केली जाणार आहे.

अयोध्येतील वादग्रस्त जमिनीच्या मालकीचा खटला हा सर्वाधिक चर्चेतील खटला आहे. या निकालांच्या पाश्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दल सतर्क झाले आहे. सोशल मीडियावर कोणतेही प्रक्षोभक संदेश पसरवू नये, असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील व पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी केले आहे. शहर व जिल्ह्यात पोलीस ठाणेनिहाय शांतता समितीच्या बैठका घेत सामाजिक सलोखा अबाधित राखण्याचे आवाहन केले जात आहे. न्यायालयीन निकाल सर्वांना बंधनकारक आहे. कोणाचाही जय-पराजय नसून तो न्यायालयाचा निर्णय आहे. त्यामुळे न्यायालयीन निर्णयाचा सर्वांनी सन्मान राखला पाहिजे, असे आवाहन डॉ. आरती सिंह यांनी केले आहे.

चोख शहर पोलीस बंदोबस्त

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपायुक्त चार, सहायक आयुक्त आठ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक १५, पोलीस कर्मचारी दोन हजार, होमगार्ड, शीघ्र कृतीदल, दंगानियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस दल. जिल्हा पोलीस बंदोबस्त – पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलीस अधीक्षक दोन, पोलीस उपअधीक्षक आठ, पोलीस निरीक्षक ३०, पोलीस उपनिरीक्षक ८०, पोलीस कर्मचारी २ हजार ५००, होमगार्ड ४००.

प्रक्षोभक संदेश पसरवू नका

ज्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर प्रक्षोभक संदेश पसरविले जातील, त्या ग्रुपच्या अ‍ॅडमिनवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे संदेश पसरवू नका, असे शहर सायबर शाखेचे पोलीस अधीक्षक देवराज बोरसे यांनी सांगितले.

संबंधितावर होणार कारवाई

ग्रामीण सायबर शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष अन्मुलवार यांनी असे सांगितले की, ‘जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ग्रामीण सायबर शाखा फेसबुक, हॉट्सअ‍ॅपवर करडी नजर ठेवून आहे. प्रक्षोभक संदेश, चित्र अपलोड केल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ संबंधितावर कारवाई केली जाणार आहे.’


अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here